विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे समस्त देशाचं लाडकं जोडपं.. ते प्रेमात पडले काय, त्यांच्यात भांडणं झाली काय आणि ते परत एकत्र आले काय.. त्यांची प्रत्येक बारीकसारीक गोष्ट टिपणाऱ्या त्यांच्या चाहत्यांना जेव्हा त्यांच्या अचानक ठरलेल्या विवाह सोहळ्याबद्दल माहिती मिळाली तेव्हा नाही म्हटलं तरी धक्का बसलाच! एरवी मोठमोठय़ाने ओरडून, जाहिरात करीत आपला प्रत्येक सोहळा वदवून घेणारे बॉलीवूड कलाकार आणि सेलिब्रेटी असं गुपचूप लग्न करतात म्हटल्यावर थोडं नवल वाटणारच. विवाहाचं ठिकाण, भटजींबरोबरची छायाचित्रं अशा सगळ्या गोष्टी इंटरनेट नावाच्या माध्यमातून पुरावे म्हणून गोळा झाल्या तरी या दोघांनीही आम्ही नाही हो ते म्हणत.. लग्नाबद्दल नकारघंटाच वाजवली. हाही नव्या प्रसिद्धीतंत्राचा भाग असावा पण अखेर देशाचं नव्हे तर सगळ्या जगाचं लक्ष ज्या सोहळ्यावर होतं तो लग्न सोहळा पार पडला, अगदी पन्नास माणसांच्या उपस्थितीत पार पडला. त्या दोघांनाही आपल्या आयुष्यातला हा अगदी जिव्हाळ्याचा खासगी क्षण त्याच प्रेमाने जपता आला आणि त्यांच्या चाहत्यांनीही ते गोड मानून घेतलं. आपलं सेलिब्रिटीपणही जपायचं आणि खासगी आयुष्यही तितक्याच शानदारपणे अनुभवायचं हा नवा पायंडा चांगलाच रुजत चालला आहे. समाजमाध्यमांमुळे नियंत्रित पद्धतीने आपल्याला हवे असणारे क्षण लोकांसमोर आणणं हे आता सेलिब्रिटींना सहजशक्य झालं आहे.

बॉलीवूडचे शाही विवाह सोहळे आणि त्यात होणारा गोंधळ असा विषय निघाला की आठवण होते ती ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन यांच्या लग्नाची.. अमिताभ बच्चन हेच मोठं प्रस्थ असल्याने अभिषेकच्या लग्नाला अवघं गाव नाही, जग गोळा होणार हे अपेक्षित होतं. त्यात ऐश्वर्या स्वत: आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेली असल्याने त्यांच्या लग्नाची मोठीच चर्चा होती. त्या वेळी अभिषेकच्या वरातीपासून ते ऐश्वर्याच्या गृहप्रवेशापर्यंत सगळं काही टिपण्यासाठी मुंबईच्या भर गर्दीतल्या रस्त्यांवर माध्यमांचे कॅमेरे रोखले होते, तशाच लोकांच्या नजराही.. मग कुठे गोंधळ, माध्यम प्रतिनिधींना धक्काबुक्की ते अगदी अमिताभ बच्चन यांनी या लग्न सोहळ्यातील छायाचित्र देण्यासाठी केलेले करारमदार सगळ्या गोष्टी चवीचवीने चर्चिल्या गेल्या. पण हा सारा प्रकार टाळण्यासाठी ‘डेस्टिनेशन वेडिंग’ हा आता सेलिब्रिटींना मोठा आधार ठरू लागला आहे. मायानगरीतील या कलाकारांना तर मुंबईत कुठली गोष्ट करणं अवघडच असल्याने त्यांनी मुंबईबाहेर लग्न करण्यासाठी जास्त पसंती दिली आहे. पूर्वीसारखं लग्न असो वा छोटे-मोठे प्रसंग जाहीर करण्यापेक्षा अगदी गुपचूप, आपल्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत सणवारांपासून सगळ्या गोष्टी साजऱ्या केल्या जातात. कोंबडं झाकलं तरी उगवायचं राहत नाही.. या म्हणीनुसार आपल्या ‘सेलिब्रिटी’ स्टेटसनुसार आयुष्यात घडणारी कुठलीही गोष्ट लोकांपासून लपणार नाही. येनकेनप्रकारेण ती त्यांच्यापर्यंत पोहोचणार यापेक्षा स्वत:च या गोष्टींची सूत्रं हातात घेत, अत्यंत नियंत्रित पद्धतीने स्वत:च या गोष्टींची छायाचित्रं, तपशील जाहीर करण्याकडे कलाकारांचा कल वाढला आहे. विराट आणि अनुष्का दोघांनी देशात कुठंही लग्न केलं असतं तरी त्यांना हा खासगीपणा जपणं अंमळ जड गेलं असतं. कारण एक भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार तर दुसरी बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री असल्याने त्यांना इथं गोंधळ न होऊ देता लग्न करणं कठीणच झालं असतं. त्यामुळे या दोघांनीही सातासमुद्रापार इटलीत जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या लग्नाची वर्दी ही दोघांनीही एकमेकांना वरमाला घातल्यानंतर आपापल्या ट्विटर अकाऊंटवरून ठरल्या पद्धतीने दिली. त्यांच्या लग्न सोहळ्याची काही मोजकी छायाचित्रं ज्याने या दोघांच्या लग्नासाठी वस्त्राभूषणे तयार केली त्या फॅशन डिझाईनर सब्यसाचीच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आली. आता तर हनिमूनचंही एखाददुसरं छायाचित्र हे या दोघांच्या इन्स्टाग्रामवरूनच पाहायला मिळत आहे.

नियंत्रित प्रसिद्धीचं हे तंत्र सध्या या सेलिब्रिटींकडून इतक्या गपगुमान आणि सहजी राबवलं जातंय. विरानुष्काच्या या सोहळ्याआधीही यशराज प्रॉडक्शनचा सर्वेसर्वा आदित्य चोप्रा आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांनीही इटलीत जाऊन विवाह केला. ते तर भारतात परतले तरी आदित्य चोप्रा आपल्या पत्नीसह आजवर माध्यमांसमोर आलेला नाही. त्यांच्या मुलीचं छायाचित्रही खुद्द राणीने जेव्हा समाजमाध्यमांवर टाकलं तेव्हाच चाहत्यांना पाहता आलं. शाहीद कपूर आणि मीरा राजपूत यांचं लग्न ठरवलं जात होतं तेव्हापासून चर्चाना उधाण आलं होतं. मात्र शाहीदनेही गुरगावमध्ये लग्न सोहळा केला आणि त्या सोहळ्याची छायाचित्रं समाजमाध्यमांवरून लोकांसमोर आली. अभिनेत्री सागरिका घाटगे आणि क्रिकेटपटू झहीर खान, युवराज सिंग आणि हेजल, बिपाशा बासू-करण ग्रोव्हर या सगळ्याच मंडळींनी फार गाजावाजा न करता आपल्याला हव्या त्या पद्धतीने लग्न समारंभ केले. एवढंच नाही तर आत्ताही सागरिका-झहीरच्या मधुचंद्राची छायाचित्रं समाजमाध्यमांवरून प्रकाशित होत आहेत. बिपाशाने आपल्या लग्नाच्या वाढदिवसाची वार्ताही समाजमाध्यमांवरून दिली आहे.

सेलिब्रिटींसाठी समाजमाध्यमं मोठा दुवा ठरली आहेत. नको त्या पद्धतीने छायाचित्रं किंवा माहिती लोकांपर्यंत जाण्यापेक्षा दिवाळी पार्टी असेल, वाढदिवस असेल, गणेशोत्सव असेल नाही तर आपल्या आयुष्यातील असे अनेक छोटे-मोठे प्रसंग आनंदाचे वा दु:खाचे त्याची छायाचित्रं, माहिती आपणच समाजमाध्यमांवरून चाहत्यांपर्यंत पोहोचवण्यावर सेलिब्रिटींकडून भर दिला जातो आहे. त्यामुळे चाहत्यांपर्यंत त्यांच्या आवडत्या कलाकारांची माहितीही पोहोचते आणि सेलिब्रिटींनाही त्यांचा खासगीपणा जपता येतो. सर्वार्थाने फायदेशीर ठरणारा हा फंडा येत्या काळात सेलिब्रिटी आणि चाहते यांच्यातलं अंतरच पुसून टाकत त्यांना खऱ्या अर्थाने जवळ आणणारा ठरणार आहे.