– प्राजक्ता कोळी, मोस्टली सेन – यूटय़ूबर

कला क्षेत्रात ताण येणं साहजिकच आहे. पूर्वी काम करताना एखाद्या गोष्टीचा ताण आला की अनेकदा मी माझं काम बंद करायची. लॅपटॉप बंद करून बाहेर जायचे, लोकांना भेटायचे. पण असे केल्यावर माझ्या लक्षात आले, अशा पद्धतीने काम बंद केल्यावर माझ्या कामातील लय भंगते. एखाद्या गोष्टीचा ताण येतो म्हणून आपण ती गोष्ट थांबवली की पुन्हा त्याच ठिकाणावरून एखादी सुरू करणे कठीण होते. ताणाच्या परीस्थितीत गोष्ट कितीही कठीण वाटली तरी ती गोष्ट थांबवल्यावर प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत. मग या ताणावर उत्तर काय? सुरू केलेले काम थांबवायचे नाही. हेच या ताणाचे उत्तर आहे. कितीही ताण आला तरी ते काम करणे मी थांबवत नाही.

काम करत राहिल्यावर हळूहळू त्या ताणाची उकल होत जाते. शेवटी ताण हा प्रत्येक गोष्टीचा अविभाज्य घटक आहे. ताण आहे म्हणून थांबण्यापेक्षा काम सुरू ठेवणे गरजेचे आहे. वाचन, लिखाण मी अर्थात वाढवलेच आहे. व्हिडीओसाठी अधिकाधिक विषय तयार करणे या सगळ्यामुळे माझ्या ताणावर भरपूर नियंत्रण येते.

पूर्वी मी फक्त घरी माझे व्हिडीओ बनवायचे. पण आता माझे कामाचे स्वरूपही बदलले आहे. मी कुठे बाहेर गेले तरी मला माझ्या प्रेक्षकांशी सतत जोडलेले राहावे लागते. अगदीच काम करायची इच्छा होत नसेल तरीही मी घराच्या बाहेर पडते. काहीच काम नसले तरी कार्यालयात जाते. कार्यालयात बसून कदाचित मी काम करणार नाही, पण ताणाच्या वेळी घराच्या बाहेर पडणे माझ्यासाठी खूप फायदेशीर ठरते. यूटय़ूबरना स्पर्धेची भीती नसली तरी दरवेळी काहीतरी वेगळे आणि नवीन करायचे असते. एकदा असा काळ आला होता की तीन-चार महिने मला काहीच नवीन सुचत नव्हते. तेव्हा मी माझ्या कुटुंबीयांबरोबर बाहेर गेल्यानंतर मला खूप गोष्टींची उकल झाली. ताण काही प्रमाणात ओसरला. ताण कमी करण्यासाठी फिरण्याच्या पर्यायाची मला नेहमीच मदत झाली आहे. पण प्रत्येकवेळी फिरणे हे काही खिशाला परवडणारे नसते. त्यामुळे ताणात न थांबणे हाच पर्याय उत्तम वाटतो.

(शब्दांकन- सायली रावराणे)