चित्रीकरणापोटी २४.९७ लाख भाडे; गेल्या वर्षांत १८ चित्रीकरणांतून ८१ लाख रुपयांचा महसूल
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘बागी’ या चित्रपटातील ‘छम छम छम’ या गाण्यावर ताल धरून नाचणारे अनेक आहेत. या गाण्यात पावसात भिजणारी श्रद्धा कपूर आणि तिचा नाचही बघण्यासारखा आहे, यात वाद नाही; पण या चित्रपटातील या धारानृत्याने रेल्वेवरही पैशांचा पाऊस पाडला आहे. हे गाणं रेल्वेच्या फलाटावर चित्रित झाल्याचे दाखवण्यात आले आहे. त्या चित्रीकरणासाठी निर्मात्यांनी रेल्वेला २४.९८ लाख रुपये एवढे भाडे दिले आहे. विशेष म्हणजे विविध स्थानकांवरील चित्रीकरणापोटी मध्य रेल्वेला २०१५-१६ या वर्षांत मिळालेल्या ८१.२१ लाख रुपयांपैकी जवळपास २५ लाख रुपये या एका गाण्यासाठीच मिळाले आहेत.
गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीदेखील आपटा स्थानकाने चित्रीकरणासाठी सर्वाधिक पसंती मिळवली आहे. ‘२४’ हा तामीळ चित्रपट आणि ‘बागी’ या दोन्ही चित्रपटांचे चित्रीकरण आपटा स्थानकात झाले असून त्याद्वारे रेल्वेला ३१.६० लाख एवढे उत्पन्न मिळाले आहे. आपटा स्थानकाबरोबरच वाडीबंदर यार्ड, मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस या ठिकाणी सर्वाधिक चित्रीकरण पार पडले. मुंबई उपनगरीय मार्गावरील स्थानकांवर चित्रीकरणासाठी रेल्वेकडून १.२५ लाख रुपये दर दिवसासाठी आकारले जातात, तर आपटा किंवा चौक अशा स्थानकांसाठी हे भाडे ५० हजार रुपये प्रतिदिन एवढे आहे. त्याशिवाय मध्य रेल्वेकडून गाडीही भाडय़ाने हवी असेल, तर गाडीच्या प्रत्येक डब्यासाठी ५० हजार रुपये सुरक्षेपोटी अनामत रक्कम म्हणून घेतली जाते. त्याशिवाय पाच डब्यांच्या गाडीचे भाडे एका दिवसासाठी ४.५ लाख एवढे असते, तर उपनगरीय किंवा लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये जाऊन धावत्या गाडीत चित्रीकरण करण्यासाठी ३० हजार रुपये प्रतिदिन एवढे भाडे रेल्वेकडून आकारले जाते. चित्रीकरणासाठी जागा भाडय़ाने देणे, हा रेल्वेचा व्यवसाय नाही. त्यामुळे आम्ही स्वत:हून कोणाकडेही जात नाही. मात्र विचारणा झाल्यास आम्ही सर्व सहकार्य करतो, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले. हे भाडे २००७ मध्ये ठरवण्यात आले होते. त्यात त्यानंतर वाढ करण्यात आलेली नाही. वास्तविक अशी वाढ केली, तरी हिंदी चित्रपटांचे निर्माते नक्कीच पैसे देण्यास तयार होतील, कारण सध्याचे शुल्क नाममात्र आहे; पण वाढ झाल्यास त्याचा फटका इतर छोटय़ा चित्रपट निर्मात्यांना बसेल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

जाहिरात मोहिमांसाठीही स्थानकांचा वापर
गेल्या आर्थिक वर्षांत चित्रपट, मालिका किंवा माहितीपट यांसाठी मध्य रेल्वेवर १८ वेळा चित्रीकरण करण्यात आले. यात मराठी चित्रपट ‘झिपऱ्या’पासून, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘बाघी’ अशा चित्रपटांचा समावेश आहे. त्याशिवाय ‘स्वच्छ भारत अभियान’ आणि ‘अतिथी देवो भव’ या जाहिरात मोहिमांसाठीही मध्य रेल्वेवरील काही स्थानकांचा वापर करण्यात आला होता. रेल्वेच्या नियमावलीनुसार या सर्व निर्मात्यांना पसे आकारण्यात आले आहेत. त्यातून रेल्वेला ८१.२१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यापकी सर्वाधिक उत्पन्न ‘बागी’ या चित्रपटाने मिळवून दिले आहे. त्याखालोखाल अरुण साधू यांच्या कादंबरीवर आधारित ‘झिपऱ्या’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ९.८५ लाख रुपये रेल्वेला देण्यात आले. या चित्रपटाचे कथानक रेल्वे स्थानकावर आणि रेल्वे डब्यांमध्ये बुटपॉलिश करणाऱ्या मुलावर आधारित असल्याने हा खर्च अपेक्षित होताच. ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटानेही ८.०९ लाख रुपये रेल्वेला दिले.