अभिनेता सैफ अली खान सध्या त्याच्या करिअरसोबतच आणखी एका गोष्टीवरही कटाक्षाने नजर ठेवून आहे. ती गोष्ट म्हणजे त्याच्या मुलीचं म्हणजेच सारा अली खान हिचं बॉलिवूड पदार्पण. सारा सध्या ‘केदारनाथ’ आणि ‘सिम्बा’ या दोन मोठ्या चित्रपटांशी जोडली गेली आहे. पण, असं असलं तरीही तिच्या पदार्पणाच्या ‘केदारनाथ’ या चित्रपटाच्या वाटेत सुरुवातीला बऱ्याच अडचणी आल्याचं पाहायला मिळालं होतं. चित्रपटाचा दिग्दर्शक आणि निर्मात्यांमध्ये असणारा वाद कलाविश्वाचंही लक्ष वेधून गेला. पण, पुढे हा वाद मिटला आणि या चित्रपटाची वाट मोकळी झाली.

पहिल्याच चित्रपटासाठी मेहनत करतेवेळी साराच्या वाट्याला आणखी एक बिग बजेट चित्रपट आला. तो म्हणजे ‘सिम्बा’. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात साराची वर्णी लागणं ही तिच्या करिअरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब आहे. या चित्रपटासाठी साराची निवड होण्यामागे एका महत्त्वाच्या व्यक्तीचं नावही जोडलं जात आहे. ती व्यक्ती म्हणजे सैफ अली खान. खुद्द सैफनेच याविषयीचा खुलासा केला.

वाचा : प्रिन्स हॅरी- मेगन मार्कलच्या शाही विवाहसोहळ्याचा खर्च नेमका आहे तरी किती?

एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीदरम्यानच सैफने याविषयीचा खुलासा केला. ज्यावेळी ‘केदारनाथ’ चित्रपटाचा वाद सर्वांसमोर आला होता, त्यावेळी आपण प्रचंड चिंतेत असल्याचं त्याने स्पष्ट केलं. सारासाठी सर्व गोष्टी अधिक सुकर व्हाव्यात, तिला कोणत्याही गोष्टीचा त्रास होऊ नये, यासाठीच तो प्रयत्नशील होता. किंबहुना करण जोहरच्या निर्मितीत साकारणाऱ्या ‘सिम्बा’ या चित्रपटातही साराची निवड व्हावी यासाठी तो लक्ष देऊन होता. सध्याच्या घडीला साराकडे दोन मोठे चित्रपट असल्यामुळे सैफने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. एक वडील म्हणून त्याला साराची वाटणारी काळजी आणि त्या दृष्टीने तो उचलत असणारी पावलं या सर्व गोष्टी सध्या अनेकांचीच मनं जिंकत आहेत.