बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या ‘हॅप्पी भाग जाएगी रिटर्न्स’ सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. याचदरम्यान, सोनाक्षीचा हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. बँकॉक पोलिसांनी सिनेमाशी निगडीत ‘इंडी बँकॉक कंपनी लिमिटेड’ या प्रोडक्शन कंपनीवर पॉर्न सीन चित्रीत करण्याचा आरोप केला आहे. ‘हॅप्पी भाग जाएगी’ या सिनेमाचा हा सिक्वल असणार आहे. या सिनेमात सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत दिसणार असून काही दिवसांपूर्वी सोनाक्षीने थायलंडमधील तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

द नेशनच्या रिपोर्टनुसार, बुधवारी सिनेमाचे चित्रीकरण सुरू असताना एका महिलेला नग्न अवस्थेत ‘अडल्ट टॉय’ आणि ‘सेक्स टॉय’सह पाहण्यात आले. एका स्थानिक नागरिकाने ते चित्रीकरण रेकॉर्ड केले. थोड्याच वेळात थायलंडमध्ये तो व्हिडिओ व्हायरल झाला. एका स्थानिक पोलिस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ‘सिनेमाशी निगडीत प्रोडक्शन टीमने एक दिवसआधीच चित्रीकरणासाठी परवानगी घेतली होती. तसेच थायलंड टुरिझमवर चित्रीकरणाचा कोणताही परिणाम होऊ नये याची सक्त ताकिद प्रोडक्शन हाऊसला देण्यात आली होती.’

बँकॉक पोलिस अधिकारी पॉलच्या मते, ”हॅप्पी भाग जाएगी रिटर्न्स’चे चित्रीकरण ज्या परिसरात होत होते, तेथे आपत्तीजनक सामान सापडल्यामुळे सिनेमाच्या टीमला ताबडतोब चित्रीकरण थांबवावे लागले होते. तसेच प्रोडक्शन टीमने नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.’ २०१६ मध्ये आलेल्या ‘हॅप्पी भाग जाएगी’ हा सिनेमा हिट ठरला होता. या सिनेमात डायना पेंटीने मुख्य भूमिका साकारली होती.