बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत हिच्या आगामी ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ या ऐतिहासिक चित्रपटाचा पहिला पोस्टर ‘स्वातंत्र्य दिना’निमित्त प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटाचा पोस्ट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांची या चित्रपटाविषयीची उत्सुकता कमालीची वाढली आहे. त्यातच आता चित्रपटाची स्क्रिप्ट एका अभिनेत्यासाठी बदलण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयीचे अनेक नवनवीन खुलासे होताना दिसत आहे.

‘फर्स्ट पोस्ट’नुसार, ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट झांशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित असून यात कंगना रणौत राणी लक्ष्मीबाईची भूमिका साकारत आहे. तिच्याबरोबरच अभिनेता सोनू सुद हादेखील स्क्रिन शेअर करणार असून खास त्याच्यासाठी चित्रपटाचं स्क्रिप्ट बदलली आहे.

सोनू ‘मणिकर्णिका’बरोबरच रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’ चित्रपटातही झळकणार आहे. ‘मणिकर्णिका’मध्ये सोनू सदाशिव राव भाऊ यांची भूमिका साकारणार असल्यामुळे या चित्रपटात त्याला मिशा वाढवायच्या होत्या. तर ‘सिम्बा’ चित्रपटामधील त्याची व्यक्तिरेखा वेगळ्या धाटणीची असल्यामुळे यात त्याला दाढी वाढवायची होती. मात्र या दोन वेगवेगळ्या लूकमुळे त्याला एकाचवेळी दोन्ही चित्रपटांचं चित्रीकरण करण्यात अडथळा निर्माण होत होता. याच कारणामुळे ‘मणिकर्णिका’च्या मेकर्सने चित्रपटाच्याच स्क्रिप्टमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला.

‘मणिकर्णिका’च्या स्क्रिप्टमध्ये बदल केल्यामुळे सोनूला आता दोन्ही चित्रपटांचं चित्रीकरण एकाचवेळी करता येणार आहे. मात्र स्क्रिप्ट बदलल्यामुळे सोनूला ‘मणिकर्णिका’मधील काही भागांचं चित्रीकरण पुन्हा एकदा करावं लागलं. झी स्टुडिओची प्रमुख निर्मिती असलेला हा बहुप्रतिक्षित चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होत आहे. त्यामुळे सोनू वेगळ्या अंदाज दिसेल यात शंका नाही.