गोव्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वगळण्यात आलेल्या न्यूड चित्रपटाच्या प्रदर्शनातील अडथळे अद्याप थांबण्याचे नाव घेत नाही आहे. या चित्रपटावरून नवीन वाद सुरू झाला आहे तो म्हणजे कॉपीराईट्सचा. याची कथा ‘कालिंदी’ या पुस्तकातून उचलली असल्याचा आरोप पटकथा लेखक मनीष कुलश्रेष्ठचा यांनी केला आहे. कालिंदी ही मूळ हिंदीतील कथा असून २००८ पासून ही कथा वेबसाइटवर उपलब्ध असल्याचे कुलश्रेष्ठ यांनी सांगितले. या कथेचे कॉपीराइट आपल्याकडे असल्याचे सांगितल्यानंतर आणखी एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.

या प्रकरणानंतर आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आणखी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. हा चित्रपट २७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. पण आता तो पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे वृत्त ‘आऊटलूक’ने दिले आहे. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाच्या ज्यूरींनी संमती देऊनही प्रत्यक्ष फेस्टीव्हलमधून हा सिनेमा वगळला होता. त्यावरुन चित्रपटसृष्टीत बरीच चर्चा आणि वादही झाले होते. चित्रपटाला जानेवारी २०१८ मध्ये या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाचं ‘अ’ प्रमाणपत्र मिळालं होतं. त्यानंतर आता २७ एप्रिलला तो प्रदर्शित होणार होता. परंतु आता कॉपीराइटचा नवा वाद समोर आल्याने चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. हा विषय न्यायालयात गेल्याने दिल्ली न्यायालयाने सिनेमा आता प्रदर्शित न करण्याचा निर्णय दिला आहे.

‘न्यूड’ या चित्रपटातून चौकटीबाहेरचा विषय हाताळण्यात आला आहे. या चित्रपटाची कथा रवी जाधवची असून, पटकथा आणि संवाद सचिन कुंडलकरने लिहिले आहेत. न्यूड मॉडेल असलेल्या एका महिलेचा जगण्यासाठीचा संघर्ष यात रेखाटण्यात आला आहे. वादात सापडलेल्या या चित्रपटाला न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ओपनिंग चित्रपटाचा सन्मान मिळाला होता. यामध्ये कल्याणी मुळ्ये, छाया कदम मुख्य भूमिकेत तर नसिरुद्दीन शहा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत.