चंद्रपूर : कर्मयोगी बाबा आमटे व साधनाताई आमटे यांचे कार्य नोबल पारितोषिकापेक्षा मोठे व महान आहे. या कार्याची पिढय़ान्पिढय़ा दखल घेणार आहे. त्यांचे कार्य सीमित व्हायला नको. याकरिता बाबा व साधनाताई यांच्या आयुष्यावर चित्रपट काढून त्यांचे सामाजिक कार्य जगभर पोहोचवणार असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी केले.

आनंदवनातील स्वरानंदवन ऑर्केस्टा सभागृहात नाना पाटेकर यांनी सोमवारी कलावंतांशी संवाद साधला. शहरातील मुलांना आनंदवनात काय सुरू आहे हे माहिती नाही. सहलीला येतात आणि निघून जातात. आता जाताना बाबांच्या कार्याची प्रेरणा घेऊन गेले पाहिजे. त्यासाठी बाबांवर चित्रपट करणार आहे. चित्रपट करून बाबांना मोठे दाखवायचे नाही तर त्यांच्या कार्याचे मोठेपण चित्रपटाच्या माध्यमातून जगात पोहचवायचे आहे. यासाठीच बाबांच्या आयुष्यावर चित्रपट निर्मित केली जाणार आहे. ज्यांनी काहीच केले नाही ते जगभर पोहचले. परंतु बाबांचे कार्य नोबल पारितोषिकापेक्षा मोठे असताना त्यांचे कार्य जगभरात गेले पाहिजे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही नाना पाटेकर म्हणाले.

यावेळी महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे, आनंदवनचे सरपंच सुधाकर कडू, स्वरानंदवन आर्केस्ट्राचे व्यवस्थापक सदाशिव ताजने उपस्थित होते. यावेळी नाना पाटेकर यांनी आनंदवनातील हस्तकला विभाग, मूकबधिर, अंध विद्यालयासह इतर प्रकल्पांना भेट देत आनंदवनातील अंध, मूकबधिर विद्यार्थ्यांशी संवाद साधला.