चित्र रंजन : रेश्मा राईकवार

पानिपत :– पेशवाईत विश्वासरावांना गादी मिळावी म्हणून चाललेला गोपिकाबाईंचा आटापिटा, मराठय़ांचा कर चुकवून मुघलांकडे आश्रयाला आलेला आणि त्याच गादीवर बसण्याची स्वप्न पाहणारा नजीब उद्दौला, देशभरात मराठय़ांची सत्ता असल्याने त्यांना कर चुकवावा लागू नये म्हणून सतत मोठय़ा सत्ताधाऱ्याला मग तो परकीय आक्रमक का असेना चुचकारणारे उत्तरेकडचे राजे-संस्थानिक या सगळ्यांच्या आशा-आकांक्षेचे एकेक धागे एकमेकांत गुंतले गेले. सत्तेच्या या महत्त्वाकांक्षी खेळात कारण नसताना दोन रथी या एकमेकांत गुंतल्या गेलेल्या धाग्यांनी कशिदा काढत गेले आणि त्यातून जे आकाराला आले ते होते पानिपतावर लढले गेलेले युद्ध.. इतिहासातील सगळ्यात मोठय़ा घनघोर युद्धाची कथा रुपेरी पडद्यावर मांडताना हे सगळे धागे जोडत हा शौर्यपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी उलगडला आहे.

ऐतिहासिक पट आणि त्याची बऱ्यापैकी वास्तवाच्या अंगाने जाणारी मांडणी यासाठी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची शैली प्रसिद्ध आहे. त्यांची ही शैली ‘पानिपत’मध्येही प्रामुख्याने जाणवते. ‘जोधा अकबर’ची आठवण होईल अशा पद्धतीचेच चित्रण यात पाहायला मिळते, मात्र तिथे जोधा आणि अकबर यांच्यातील वैयक्तिक ताणेबाणे आणि गृहकलहामुळे उभ्या ठाकलेल्या शत्रूचे नाटय़ होते. त्या तुलनेत ‘पानिपत’ची कथा मराठय़ांच्या शौर्याने रंगलेली असली तरी ती शोकांतिका आहे. त्यामुळे चित्रपट पाहताना तो नेमका कोणत्या दिशेने जाणार, याची प्रेक्षकांनाही कल्पना असते. आणि त्यात उगाच वळणे देण्याचा प्रयत्न दिग्दर्शकानेही केलेला नाही. उदगीरच्या विजयी मोहिमेवरून परत आलेल्या सदाशिवभाऊंना गोपिकाबाईंनी पेशव्यांना केलेल्या आग्रहामुळे अर्थमंत्री नेमले जाते. मुळातच, सत्त्वाने आणि तत्त्वाने वागणाऱ्या सदाशिवभाऊंना उत्तरेकडची अनेक राज्ये मराठय़ांचा कर चुकवत नाही आहेत, हे लक्षात आल्यानंतर ते त्यांच्याकडून कर चुकवण्यासाठीचे प्रयत्न सुरू करतात. यात अर्थातच दिल्लीच्या तख्तावर असलेल्या मुघल बादशहाचाही समावेश आहे. पानिपतच्या युद्धाची बीजे ही इथून रोवली गेली. त्यानंतरचा पानिपतच्या लढाईचा इतिहास हा आबालवृद्धांनी अभ्यासलेला आहे. इथे ती चित्रपटातून मांडताना या घटनांमागची कारणे उलगडून देण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. मात्र एका सरळसोट कथेपलीकडे ‘पानिपत’ आपल्याला नेत नाही.

‘पानिपत’च्या लढाईमागे अशा अनेक घटना आहेत. त्यामागचे राजकारण, त्याहीपेक्षा सत्ताकारण मांडण्याच्या प्रयत्नात चित्रपटाचा पूर्वार्ध चांगलाच खर्ची पडला आहे. उत्तरार्धात प्रत्यक्ष पुणे ते यमुनेच्या काठा-काठाने होत गेलेला प्रवास आणि भाऊंचे उत्तरेकडील राजांना घेऊन सेना वाढवण्याचे प्रयत्न, त्यात त्यांना आलेले शह-काटशहांचे अनुभव अशा सगळ्या घटनाक्रमाने आपण शेवटच्या भागात युद्धापर्यंत येऊन पोहोचतो. या चित्रपटाची कथा पहिल्यांदाच नायिकेच्या पार्वतीबाईंच्या तोंडून उलगडत जाते. मात्र, ही मांडणी उगाचच वळणे घेणारी नसली तरी ती उत्कंठा वाढवत नेणारीही झालेली नाही. पानिपतच्या लढाईभोवती अनेक दंतकथा आरूढ झाल्या आहेत. विश्वासरावाचा मृत्यू, सदाशिवभाऊं चे बेभान होऊन अब्दालीच्या सैन्यात घुसणे, त्याहीआधी अब्दालीने अडवलेली मराठय़ांची रसद अशा अनेक गोष्टी कथानकाच्या ओघात सहज येऊन जातात. शेवटच्या काही मिनिटांमध्ये मात्र प्रत्यक्ष लढाईचा प्रसंग, सदाशिवभाऊंची झालेली फसवणूक आणि त्यांनी शौर्याने लढलेली अंतिम लढाई या सगळ्या गोष्टी आपली पकड घेतात. व्हीएफएक्सचा वापरही दिग्दर्शकाने माफक प्रमाणात केला असल्याने त्याची मांडणीही वास्तव वाटते, यासाठी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचे कौतुक करायला हवे.

सदाशिवभाऊंच्या भूमिकेसाठी अभिनेता अर्जुन कपूरने घेतलेली मेहनत पडद्यावर दिसते. अर्जुन कपूर आणि क्रिती सनन यांच्या तोंडी येणारे मराठी संवादही तितक्याच सहजतेने येतात, मात्र पार्वतीबाई म्हणून क्रितीचा पडद्यावरचा वावर सहज असला तरी मराठमोळी देहबोली रंगवण्यात ती कमी पडली आहे. अनेक मराठी कलाकार यात आहेत, मात्र त्यांना पुरेसा वावच मिळालेला नाही. पद्मिनी कोल्हापुरे यांना गोपिकाबाईंच्या भूमिके त अधिक वाव मिळाला असता, तर ती भूमिका आणखी प्रभावी ठरली असती. रवींद्र महाजनी, गश्मीर महाजनी, मिलिंद गुणाजी असे कित्येक मराठी कलाकार यात आहेत. संजय दत्तनेही आपल्या पद्धतीप्रमाणे अब्दालीची भूमिका रंगवली आहे. अर्थात, हा कोणा एका व्यक्तिरेखेचा चित्रपट नाही. तो पानिपतच्या युद्धाची कथा सांगणारा चित्रपट आहे. त्यामुळे इथे युद्धकथाच प्रामुख्याने केंद्रस्थानी आहे. अजय-अतुल यांनी आपल्या नेहमीच्या धाटणीपेक्षा वेगळे संगीत दिले आहे. त्याचाही प्रभाव पडतो, मात्र अनेकदा या चित्रपटावर गोवारीकरांच्या ‘जोधा अकबर’ची छाप जाणवते. सदाशिवभाऊ आणि पार्वती यांच्यातील बहरत गेलेले नाते, पार्वतीबाईंचा मानीपणा, त्यांचा विवाहसोहळा आणि त्यांच्यावर चित्रित झालेले गाणे पाहताना ‘जोधा अकबर’ आठवत राहतो. मुघल बादशहासाठीही तोच सेट वापरला असल्याने हा प्रभाव जास्त जाणवतो. अर्थात, या छोटय़ा-छोटय़ा गोष्टी सोडल्या तर ‘पानिपत’ची शौर्यकथा गोवारीकर यांच्याच नजरेतून आणि त्यांच्या वास्तववादी शैलीत पाहण्याची संधी हा चित्रपट देतो.

 दिग्दर्शक – आशुतोष गोवारीकर

 कलाकार – अर्जुन कपूर, क्रिती सनन, संजय दत्त, मोहनीश बहल, पद्मिनी कोल्हापूरे, रविंद्र महाजनी, गश्मीर महाजनी, मिलिंद गुणाजी.