लोकसभा निवडणुकीमुळे प्रदर्शन लांबणीवर पडलेला पी.एम. नरेंद्र मोदी हा बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २४ मे रोजी भारतासह तब्बल ४० देशांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मोदी यांची व्यक्तीरेखा साकारणारा अभिनेता विवेक ऑबेरॉयनं नागपूरात ही माहिती दिली. २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पी.एम. नरेंद्र हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पी.एम.नरेंद्र मोदी या चित्रपटाचं नवीन पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं. नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये हे पोस्टर लॉन्च झालं. यावेळी विवेकने या चित्रपटाविषयीच्या त्याच्या भावनादेखील व्यक्त केल्या आहेत. यासोबतच त्याने ट्विटवर या प्रसंगाचे काही फोटोदेखील शेअर केले.

“पी.एम.नरेंद्र मोदी या चित्रपटामध्ये कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे. त्यामुळे तो प्रेक्षकांच्या पसंतीत नक्कीच उतरेल. त्यासोबतच हा चित्रपट २४ मे रोजी तब्बल ४० देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे”, असं विवेकने यावेळी सांगितलं.

दरम्यान, अभिनेता विवेक ओबेरॉय मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट प्रथम  ११ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र या  तारखेमध्ये बदल करुन तो आता २४ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. सुरेश ओबेरॉय, आनंद पंडित आणि संदीप सिंग निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केले आहे.