dilip thakurकोणत्याही चित्रपटाची पहिली ओळख म्हणजे त्याचे नाव, पोस्टर डिझाईन व त्याची प्रभावी कॅचलाईन! म्हणजे हे सर्व एकमेकांना पूरक हवे. कॅचलाईन म्हणजे अवघ्या एक दीड ओळीत त्या संपूर्ण चित्रपटाचे व्यक्तिमत्त्व खुलवणे. या छायाचित्राबाबत सांगायचे तर निर्माता दिग्दर्शक राकेश रोशन ‘स्टुडिओ लिंक’ या संस्थेच्या आत्मा व विवेक यांच्याशी ‘कायनात’ या चित्रपटाची रसिकांसमोर पहिली ओळख कशी करुन द्यायची याची चर्चा करतोय. आता तुम्ही म्हणाल ‘कायनात’ नावाचा हा चित्रपट कोणता बरे? आम्ही तर कधी नावही ऐकले नाही. पण पोस्टर डिझाईन करताना हे नाव बदलून ‘करण अर्जुन’ (१९९४) असे करण्यात आले असे आत्मानंद यानीच सांगितले. काही वर्षांपूर्वीच त्यांचे सहकारी विवेक यांचे निधन झाले. ‘स्टुडिओ लिंक’च्या जवळपास पस्तीस वर्षांच्या चौफेर वाटचालीतील पोस्टर डिझाईनचे किस्से केवढे तरी. त्यातले एक दोन सांगायलाच हवेत.

तुम्हाला गुलजार दिग्दर्शित ‘अंगूर’ (१९८१) चित्रपट आठवतोय का? संजीव कुमार व देवेन वर्मा या दोघांचीही त्यात धमाल भूमिका असून त्यांची सतत कुठे ना कुठे टक्कर होउन हसे निर्माण होते, असे गुलजार यांनी सांगितल्यावर आत्मा व विवेक यांचे विचारचक्र सुरु झाले, वेगळे काय बरे करता येईल? दोन अंडी एकमेकांवर आपटून त्यातून ते दोघे दुहेरी रुपात बाहेर पडतात असे डिझाईन त्यांनी बनवले ते गुलजारजीना प्रचंड आवडले.

दिग्दर्शक एन. चंद्रा यांच्या ‘अंकुश’चा (१९८६) किस्सा यापेक्षाही वेगळाच! एन. चंद्रा यांनी ‘अंकुश’च्या चित्रीकरणाच्या वेळचा फोटो संग्रह ‘स्टुडिओ लिंक’कडे दिला. पण नवीन दिग्दर्शक आहेत म्हणून आपण काही दिवसांनी बघु काय ते असा विचार करतच तो बाजूला ठेवून आपल्या अन्य चित्रपटांकडे लक्ष दिले. थोडेसे मोकळे होताच ‘अंकुश’चे फोटो पहात जाताना त्याना त्यातच हा तात्कालिक सामाजिक परिस्थितीवर भाष्य करतानाच युवकांची व्यथा मांडणारा चित्रपट आहे हे लक्षात येताच चंद्रा यांच्याशी संपर्क साधून चार युवक धावताहेत असे चित्रपटाचा आशय स्पष्ट करणारे पोस्टर बनवलेही…

आत्मानंद यांच्या या अनुभवातून चित्रपट या माध्यम व व्यवसाय यातील छोट्या छोट्या गोष्टीतून कशा मोठ्या गोष्टी सुरु होतात याचाच छानसा प्रत्यय येतोय…
दिलीप ठाकूर