Race 3 box office collection day 1 ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘रेस ३’ या चित्रपटाच्या निमित्ताने सलमान खान नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला आला. अर्थात त्याचा हा अंदाज फारसा नवा नसला तरीही सलमानच्या चाहत्यांसाठी त्यात बरंच नाविन्य होतं. त्याच्या मल्टीस्टारर ‘रेस ३’ या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरीही या चित्रपटाच्या कमाईचे आकडे मात्र काही वेगळच सांगून जात आहेत.

एखाद्या कलाकाराची लोकप्रियता आणि त्याची समीकरणं नेमकी कशी असतात याचा प्रत्यय ‘रेस ३’ने जमवलेला गल्ला पाहून येत आहे. अॅडव्हान्स बुकिंगपासून ते अगदी परदेशातील या चित्रपटाच्या लोकप्रियतेपर्यंत सर्वच मार्गांनी सलमानच्या या चित्रपटाचा ब्लॉकबस्टर ठरवलं आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी ‘रेस ३’ च्या कमाईविषयी एक ट्विट करत याविषयीची माहिती दिली. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जवळपास २७ कोटींचा गल्ला जमवला आहे. ज्यामुळे २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या आणि सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘रेस ३’ने बाजी मारली आहे. चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय कमाईविषयी सांगावं तर, अमेरिकेत या चित्रपटाने २.१ कोटी, ऑस्ट्रेलियामध्ये ७० लाख आणि न्यूझीलंडमध्ये ४७ लाखांचा गल्ला जमवला आहे. मुख्य म्हणजे चित्रपटाची इतक्या दणक्यात सुरुवात होईल याचा विचारही अनेकांनी केला नसेल. पण, या साऱ्याला कुठेतरी भाईजान सलमानवर असणाऱ्या चाहत्यांचं प्रेमच जबाबदार आहे, असं म्हटलं जात आहे.

बिग बजेट आणि तगडी स्टारकास्ट असणाऱ्या या चित्रपटाविषयी समीक्षकांनी फार चांगल्या प्रतिक्रिया दिल्या नसल्याचं पाहायला मिळालं. तर, काही प्रमाणात या चित्रपटाने चाहत्यांचीही निराशा केली. चित्रपटामध्ये बऱ्याच गोष्टींची अतिशयोक्ती करण्यात आली असल्याचीही प्रतिक्रिया अनेकांनी दिली. त्यामुळे आता येत्या काळात सलमानच्या चित्रपटाच्या कमाईचे आकडे अशीच उंची गाठणार की त्यांचा वेग मंदावणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.