16 October 2019

News Flash

Movie Review : सुबोध भावेच्या अभिनयाने सजलेला ‘..आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’

उत्तम संवाद ही सिनेमाची जमेची बाजू आहे

'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर'

काशिनाथ घाणेकर म्हणजे मराठी रंगभूमीवरचा पहिला सुपरस्टार. या माणसाच्या आयुष्यावर सिनेमा काढण्यासाठी धाडस लागणार हे निश्चित. ते धाडस दाखवण्यात आलं, ‘ … आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या सिनेमाच्या निमित्ताने. या सिनेमात सुबोध भावेने काशिनाथ घाणेकरांचं पात्र साकारलं आहे. या भूमिकेत तो चपखल बसला आहे. असं असलं तरीही सिनेमात भालजी पेंढारकारांच्या तोंडी एक वाक्य आहे. काशिनाथ म्हणजे सगळ्या धान्यांची सरमिसळ आहे त्यात खडेही आहेत. तसंच काहीसं या सिनेमाचंही झालं आहे. सिनेमा चांगला असला, मनोरंजन करत असला तरीही काही त्रुटी राहिल्या आहेत. मात्र सुबोध भावेचा स्वतःचा असा एक प्रेक्षक वर्ग आहे ज्याला हा सिनेमा नक्की आवडेल. आपल्या अभिनयाच्या जोरावर सुबोधने हा सिनेमा पेलून धरला आहे.

सुबोध भावेने साकारलेले काशिनाथ घाणेकर यांचे पात्र प्रभावी झाले आहे. मात्र इतर पात्रांना म्हणजे सुमित राघवन (श्रीराम लागू), सोनाली कुलकर्णी (सुलोचना), भालजी पेंढारकर (मोहन जोशी), मास्टर दत्ताराम (सुहास पळशीकर), वसंत कानेटकर (आनंद इंगळे) या सगळ्यांना फार वाव नाही. तेवढ्या लांबीच्या भूमिकाच त्यांच्या वाट्याला आलेल्या नाहीत. जे काम त्यांना दिलं आहे ते मात्र या सगळ्यांनी चोख पार पाडलं आहे. संपूर्ण सिनेमा फिरतो तो काशिनाथ घाणेकर (सुबोध भावे), प्रभाकर पणशीकर (प्रसाद ओक), इरावती घाणेकर (नंदीता पाटकर) आणि कांचन घाणेकर (वैदेही परशुरामी) या चार पात्रांभोवती. काशिनाथ घाणेकर यांच्या उदय-अस्ताचा हा प्रवास आहे. ते स्वतःच आपली कहाणी प्रेक्षकांना सांगत असतात. काशिनाथ घाणेकरांचा लुक, त्यांची संवाद फेकण्याची अदा, अस्वस्थता, माज, बेफिकीरी हे सगळं सुबोधनं चांगलं साकारलं आहे. त्याला उत्तम साथ दिली आहे ती प्रसाद ओकने. सिनेमा आपले चांगले मनोरंजन करतो. मात्र काळजाला हात घालत नाही असं कुठेतरी वाटून जातं. बायोपिक अर्थात चरित्रपटांचा ट्रेंड हिंदीत नंतर आला असला तरीही मराठीत तो बालगंधर्वपासूनच रुजला आहे. बालगंधर्व, लोकमान्य टिळक या व्यक्तिरेखा साकारल्यानंतर सुबोध भावे काशिनाथ घाणेकरांची व्यक्तिरेखा साकारू शकेल का? असा प्रश्न अनेकांना पडला होता ज्याचं उत्तर सुबोधनं त्याच्या अभिनयातून दिलं आहे.

या सगळ्या जमेच्या बाजू असल्या तरीही चरित्रपटांमध्ये इतर भूमिका करणारी पात्रंही तेवढीच सशक्त असावी लागतात. डॉक्टर श्रीराम लागू आणि काशिनाथ घाणेकर यांच्यातल्या वादांचे एक-दोन प्रसंग सिनेमात दाखवण्यात आले आहेत. मात्र त्यातून हे द्वंद्व नेमकं कसं होतं ते लक्षात येतं पण स्पष्ट होत नाही. श्रीराम लागूंच्या नाटकाला डॉक्टर काशिनाथ घाणेकर गाजावाजा करत टेचात येऊन बसतात त्यामुळे श्रीराम लागूंना काही वेळासाठी संवाद विसरायला होतं, हा प्रसंग आणि काशिनाथ घाणेकर ‘आनंदी गोपाळ’ हे नाटक सादर करत असताना त्याच्या नाटकाला शांतपणे येऊन बसलेले डॉक्टर लागू आणि त्यांना पाहिल्यानंतर घाणेकरांना ‘मी होतो आणि तो असणार आहे’ वाटणं हे दोन प्रसंग अप्रतिम झाले आहेत.

जुना काळ उभारण्यात दिग्दर्शक काहीसे कमी पडले आहेत कारण बहुतांश वेळा नाटक घडतं ते फक्त शिवाजी मंदिरच्या बाहेरच. त्यामुळे शिवाजी मंदिरचा सारखा सारखा समोर येणारा सेट काहीसा पचनी पडत नाही. संवाद ही सिनेमाची जमेची बाजू आहे. दिग्दर्शक अभिजित देशपांडे आणि गुरु ठाकूर यांनी या सिनेमाचे संवाद लिहिले आहेत. संवाद लिहिताना आजच्या तरूणाईच्या तोंडी ते सहज बसतील आणि जुन्या काळाची जादू कायम राहिल याची काळजी घेण्यात आली आहे. त्यात या दोघांना यशही आलं आहे. कारण सिनेमाचा तीन मिनिटांचा प्रोमो आला तेव्हाच या सिनेमातले संवाद सगळ्यांच्या तोंडी रुळले.

रायगडाला जेव्हा जाग येते नाटकातला ‘संभाजी’, गारंबीचा बापू मधला ‘बापू’, अश्रूंची झाली फुले नाटकातला ‘लाल्या’ या घाणेकरांच्या गाजलेल्या भूमिका. या भूमिका करताना त्या त्यांनी कशाप्रकारे साकारल्या असतील हे दाखवण्यात सुबोध भावे यशस्वी झाला आहे. त्याच्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजलं आहे. घाऱ्या डोळ्यांमधल्या सुबोध भावेला काशिनाथ घाणेकरांच्या रुपात पाहणं ही एक ट्रीट आहे. त्याची संवादफेकही उत्तम! खासकरून ‘एकदम कडsssक’ आणि ‘उसमें क्या है..’ हे म्हणत स्वच्छंदपणे जगणारे काशिनाथ घाणेकर सुबोधनं उत्तमरित्या दाखवले आहेत.

एका प्रसंगात जेव्हा प्रेक्षक मनासारखी दाद देत नाही तेव्हा प्रयोग सोडून जाणारे काशिनाथ, प्रेक्षकांच्या गर्दीतून जाता आलं नाही म्हणून नाटक सोडणारे काशिनाथ हे सगळे प्रसंग चेहऱ्यावरच्या हावभावांवर खेचले आहेत. एकंदरीत काय तर तुमचे मनोरंजन करणाराच हा सिनेमा आहे. मध्यंतरापर्यंत सिनेमा वेगवान झाला आहे. काशिनाथ घाणेकरांचा उदय, त्यांची अभिनय करण्याची शैली, स्टेजवर एंट्री घेण्याचं कसब, मध्यंतराच्या वेळी झालेली डॉक्टर लागूंची एंट्री हे सगळं छान जमलं आहे. मात्र मध्यंतरानंतर सिनेमा काहीसा संथ होतो. शेवटाकडे जाता जाता काही वळणांवर वेग घेतो.

एका हरहुन्नरी कलाकाराचं जगणं म्हणजे व्यक्तीगत आयु्ष्य आणि नाटकातलं पडद्यावरचं आयुष्य साकारण्याचं शिवधनुष्य सुबोध भावेनं लिलया पेललं आहे.इरावती घाणेकर आणि काशिनाथ घाणेकर, कांचन घाणेकर आणि काशिनाथ घाणेकर यांच्यातले प्रसंग उत्तम झाले आहेत. वैदेही परशुरामी नाजूक आणि सुंदर दिसली आहे तिचा अभिनय सहजसुंदर आहे. नंदीता पाटकरनेही इरावतीच्या पात्राला योग्य न्याय दिला आहे. काशिनाथ घाणेकर कसे होते? काय प्रकारे विचार करायचे? त्यांच्या आयुष्यात नाटकाचे स्थान काय होते? उतरती कळा लागल्यावर त्यांनी काय आणि कसे निर्णय घेतले या सगळ्याचा लेखाजोखा या सिनेमात मांडला गेला आहे.

आपल्या सार्थ अभिनयाच्या जोरावर सुबोध भावेने या सगळ्या छटा उत्तमरित्या साकारल्या आहेत. ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल’ या गाण्यात अमृता खानविलकरची छोटीशी झलक दिसते. तिने संध्या यांची भूमिका साकारली आहे. जी बाब अमृता खानविलकरची तिच आशा काळे साकारणाऱ्या प्राजक्ता माळीची. एका गाण्यातच ती दिसते. गोमू संगतीनं हे गाणं रिक्रिएट करण्यात आलं आहे. तर लाल्या हे गाणं सिनेमातलं एक लक्षात राहणारं गाणं आहे. इतर दोन गाणी सिनेमाची लांबी वाढवतात. सुबोध भावेला वगळून इतर कोणाचाही विचार आपण काशिनाथ घाणेकरांच्या भूमिकेसाठी करू शकत नाही. त्यामुळे या सिनेमाचा एकमेव USP आहे तो म्हणजे सुबोध भावे. त्याच्या अभिनयासाठी एकदा का होईना हा सिनेमा बघायला हरकत नाही.

सिनेमा का पाहावा? सुबोध भावेच्या अभिनयासाठी, काशिनाथ घाणेकर ज्यांना ठाऊक नाही त्यांना ते माहीत होण्यासाठी, उत्तम संवादांची ट्रीट ऐकण्यासाठी.

सिनेमा का पाहू नये?: काशिनाथ घाणेकर माहित असतील, त्यांचा अभिनय पाहिला असल्यास

दिग्दर्शन कसं आहे? : दिग्दर्शन चांगलं झालं आहे दिग्दर्शकाचा पहिला प्रयत्न आहे काही त्रुटी टाळता आल्या असत्या

संगीत कसं आहे? : पार्श्वसंगीत उत्तम झालं आहे, दोन गाणी श्रवणीय झाली आहेत

सिनेमाला किती स्टार्स? : सिनेमाला ५ पैकी ३ स्टार्स

सिनेमा : … आणि काशिनाथ घाणेकर 

लेखक दिग्दर्शक : अभिजित शिरीष देशपांडे 

निर्माते सुनील फडतरे

स्टुडिओ : Viacom 18 Motion Pictures and Shree Ganesh Marketing and Film

पात्र परिचय
सुबोध भावे – काशिनाथ घाणेकर
सोनाली कुलकर्णी- सुलोचना
सुमित राघवन – श्रीराम लागू
आनंद इंगळे- वसंत कानेटकर
मोहन जोशी – भालजी पेंढारकर
प्रसाद ओक – प्रभाकर पणशीकर
सुहास पळशीकर – मास्टर दत्ताराम
नंदीता पाटकर-इरावती घाणेकर
वैदेही परशुरामी – कांचन घाणेकर

 

समीर चंद्रकांत जावळे

First Published on November 7, 2018 3:49 pm

Web Title: movie review ani kashinath ghanekar marathi movie