चित्ररंग : रेश्मा राईकवार

धुरळा :- सत्तासंघर्ष अनेकदा भडक असतो, अंगावर येतो आणि तो तसाच रुपेरी पडद्यावर आपण कित्येकदा अनुभवला आहे. मात्र, एकाच घरात सत्तासंघर्षांचा खेळ रंगला तर.. क्षितिज पटवर्धन लिखित आणि समीर विद्वान्स दिग्दर्शित ‘धुरळा’ चित्रपटात या तर.. नंतरची कथा पाहायला मिळते. घर फिरले की घराचे वासेही फिरले म्हणतात, ही म्हण ‘धुरळा’ चित्रपट पाहताना हटकून आठवते. हे सांगण्याचे कारण की इथला संघर्ष हा जास्त खरा वाटतो, तो कोणत्याही घरात पाहायला मिळेल असा आहे. सत्तेच्या गणितांमध्ये अनेकदा नाती, मानवी मूल्ये पणाला लागतात हे खरे आहे, पण हा धुरळा कधीतरी खाली बसतो आणि पुन्हा सगळे निरभ्र अगदी मोकळे करतो. संघर्षांच्या पलीकडे प्रत्येकाच्या आशा-आकांक्षांचे, प्रेमाचे-रागाचे, असण्या आणि नसण्याचे वैयक्तिक ताणेबाणे एकत्र येऊन जो धुरळा उडतो तो फार वास्तव आणि सहज पद्धतीने लेखक-दिग्दर्शकद्वयीने यात रंगवला आहे.

आंबेगावचे उभे कुटुंब यांच्याभोवती चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे. आंबेगावचे सरपंच निवृत्तीनाथ उभे पाटील यांचे निधन होते. आणि सरपंचपदासाठी नव्याने निवडणुकांचा खेळ रंगतो. निवृत्तीनाथ यांच्यानंतर त्यांचा मुलगा नवनाथ ऊर्फ दादा (अंकुश चौधरी) हा सरपंचपदाचा पहिला दावेदार असणे स्वाभाविक आहे. दादाही याच भूमिकेतून सगळ्या गोष्टी हातात घेतो. मात्र वर म्हटले तसे घर फिरले की.. या उक्तीने दादा आणि त्याचे कु टुंब निवृत्तीनाथांच्या निधनातून सावरतायेत न सावरतायेत तोच बाहेरची मंडळी या कुटुंबावर आणि त्यांच्याभोवती असलेल्या सत्तेवर अंकुश ठेवण्याची धडपड सुरू करतात. आणि त्यातून मग दादाला पहिला धक्का बसतो. सरपंचपदासाठी त्याची आई निवडणूक लढवण्याचा निर्णय घेते. आईचे प्यादे पुढे करून बाहेरची मंडळी घरात शिरतायेत हे समजल्यानंतर अधिक आक्रमक झालेला दादा आणि त्याच्या प्रत्येक उपायाबरोबर सुरू झालेले इतरांचे शह-काटशहांचे खेळ यांचा एकच धुरळा उडतो. त्यात मग अनेक गोष्टींचा नव्याने गुंता होत जातो. दादाची साधी-सरळ, आधुनिक विचारांची पत्नी बुरगुंडा (सई ताम्हणकर), आपले घर आणि माणसे यांच्यावर जीवापाड प्रेम करणारा त्याचा छोटा भाऊ हनुमंता (सिद्धार्थ जाधव), हनुमंताची महत्त्वाकांक्षी पत्नी मोनिका (सोनाली कुलकर्णी) आणि सगळ्यात असूनही आपले एक वेगळे स्वप्न पाहणारा, ते स्वप्न तुटते आहे याची जाणीव होताच सगळ्यांविरुद्ध बंड करून उठणारा घरातला शेंडेफळ भावज्या (अमेय वाघ) अशा अनेक व्यक्तिरेखा एकेक करून लेखक समोर आणतो. त्यांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षांचा वापर बाहेरचे करतात आणि मग घरच्या पटावर राजकारणाचा सारीपाट रंगू लागतो..

एकाच घरातली जीवाभावाची माणसे, सत्तेच्या हव्यासापायी एकमेकांविरुद्ध उभी ठाकल्यावर काय होणार? उभे पाटील कुटुंब मुळातून संपणार? बाहेरचे जिंकणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देणारा हा चित्रपट कथा मांडणी आणि दिग्दर्शनाची शैली या दोन्ही बाबतीत वास्तवाच्या जवळ जाणारा आहे. मुळात समोरचा माणूस काळा नाहीतर पांढरा अशा दोनच रंगात पाहण्याची आपल्याला सवय असते. राजकारण असेल तर ती व्यक्ती एकतर त्यात मुरलेली असते, नाही तर दुसरी अगदीच ‘ढ’ असते किंवा तिसरी अगदीच संधिसाधू असते, अशा वर्गवाऱ्या आणि लेबलं लावायची आपल्याला सवय असते. इथे लेखक म्हणून क्षितिजने ही सवय मोडली आहे. परिस्थितीनुसार बरं-वाईट वागणारी माणसे इथे दिसतात. त्यामुळे त्यांच्यात रंगणारा खेळही तितकाच अस्सल वाटतो. दिग्दर्शक समीर विद्वान्स यांनी कथेची तितकीच सहजशैलीत वास्तव मांडणी केली आहे. त्यामुळे अनेकदा असा विषय हा भडक, नाटय़मय मांडणी करणारा असाच होण्याची शक्यता असते. इथे या चित्रपटात नाटय़ ठासून भरलेले आहे, पण त्याची अतिरंजित मांडणी करण्याचा मोह दिग्दर्शकाने टाळला आहे. त्यामुळे उभे पाटील हे मोठे प्रस्थ आहे, पण ते आंबेगावात मोठे आहेत. त्यामुळे गावातले त्यांचे घर, एकूणच गावातील त्यांचा विरोधक गाढवे (प्रसाद ओक) याचे घर, सभा, सगळ्याचे स्वरूप हे गावच्या राजकारणाला साजेसेच दिसते. उगाच मोठमोठय़ा सभा आणि आलिशान बंगल्यात राहणारे सत्ताकारणी चित्रपटात दिसत नाहीत. यामुळे वर म्हटल्याप्रमाणे ही कुठल्याही गावात घडणारी कथा वाटते.

उत्तम कथा आणि उत्तम दिग्दर्शनाला उत्तम अभिनयाची जोड मिळाली आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेसाठी कलाकारांची विचारपूर्वक केलेली निवड चित्रपटात दिसून येते. प्रत्येक कलाकार आपापल्या भूमिकेत चपखल बसला आहे. कोणी एकच कलाकार भाव खाऊन जातो असे काही यात होत नाही. उलट प्रत्येकाने आपापल्या वाटय़ाला आलेली व्यक्तिरेखा पुरेपूर निभावली आहे. दादाची व्यक्तिरेखा अनेकदा संदिग्ध वाटते, पण अंकुश चौधरीने ती उत्तमपणे साकारली आहे. सोनालीने नेहमीपेक्षा वेगळी व्यक्तिरेखा मोनिकाच्या रूपात साकारली आहे. सिद्धार्थ जाधवचा हनुमंता त्याने त्याच्या नेहमीच्या शैलीत रंगवला आहे, तीच गोष्ट अमेयने साकारलेल्या भावज्याची.. भावज्याच्या व्यक्तिरेखेतील गुंतागुंत त्याने कुठेही मेलोड्रॅमॅटिक न होऊ देता रंगवली आहे. प्रसाद ओकनेही गाढवेच्या भूमिकेला न्याय दिला आहे. अलका कुबल यांच्या वाटय़ाला म्हटले तर सोज्ज्वळ आणि म्हटले तर पक्की अनुभवी अशा अक्कांची भूमिका आली आहे. त्यांना या भूमिकेत पाहणे हाच सुखद अनुभव आहे, अर्थात त्यांची व्यक्तिरेखा लेखनात काहीशी मर्यादित झाली आहे. सईची बुरगुंडा ही व्यक्तिरेखा खूप चांगल्या पद्धतीने लिहिली गेली आहे आणि तिनेही त्याच प्रभावीपणे साकारली आहे. मराठीत आजच्या घडीला नावाजलेल्या या कलाकारांची ही एकत्र जुगलबंदी पाहणे हीच मुळात पर्वणी आहे.   राजकीय कथेवर आधारित चित्रपट म्हटले की त्यात नाटय़ अपेक्षित असतेच. इथेही ते आहे, मात्र चित्रपटाचा शेवट हा काहीसा ठरावीक पद्धतीनेच पुढे येतो. एका क्षणाला एका उंचीवर पोहोचलेल्या या नाटय़ातून आणखी काहीतरी पाहायला मिळेल, अशी आपली अपेक्षा वाढत जाते. शेवटाकडे मात्र काहीसा हळवा होणारा हा चित्रपट यापेक्षा वेगळे काही देऊ शकला असता, ही भावना डोके वर काढत राहते. मात्र त्यामुळे चित्रपटाची हव्वा.. कमी झालेली नाही. इतकी चांगली भट्टी चित्रपटात जमून आली असेल तर धुरळा उडणारच ना राव..!

दिग्दर्शक – समीर विद्वांस

कलाकार – अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, अलका कुबल, सिध्दार्थ जाधव, अमेय वाघ, प्रसाद ओक, उमेश कामत, उदय सबनीस, सुलेखा तळवलकर