News Flash

मुव्ही रिव्ह्यूः न पटलेला ‘कौल’

आदिश केळुसकर लिखित आणि दिग्दर्शित 'कौल' हा सिनेमाही तुम्हाला याचीच जाणीव करुन देईल

सिनेमाची कथा कोकणाच्या पार्श्वभूमीवर घडते.

जगात असे अनेकजण असतात ज्यांना इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करायचे असते. आपल्या कृतीतून ते जगाला दाखवायचे असते. सिनेमा हे असे माध्यम आहे ज्या मार्फत आपण आपला संदेश अनेकांपर्यंत पोहोचवू शकतो. डोक्यातले विचार कागदावर उतरतातही. पण ते प्रत्यक्ष सिनेमात उतरतातच असे नाही. आदिश केळुसकर लिखित आणि दिग्दर्शित ‘कौल’ हा सिनेमाही तुम्हाला याचीच जाणीव करुन देईल.

सिनेमाची कथा कोकणात घडताना दिसते. मुंबईत नायकाच्या हातून अशी काही घटना घडते ज्यामुळे तो कोकणात येतो. कोकणात आल्यानंतर एका शाळेत शिक्षक म्हणून रुजूही होतो. त्याच्यासोबत तिथेही असे काही घडते ज्याच्यावर त्याचा विश्वास तर नसतो पण त्याच्या मनातले विचार त्याला स्वस्थ बसू देत नाहीत. आपल्या विचारांपासून दूर जाण्याच्या प्रयत्नात असताना तो कसा त्यात अधिक गुंतत जातो आणि शेवटी त्याच्या हाती काय येते या सगळ्याचा घेतलेला मागोवा म्हणजे कौल. आपल्या अस्तित्वाचा शोध घेताना नायकाची म्हणजे अभिनेता रोहीत कोकाटे याची धडपड यात दाखवण्यात आली आहे.

दुसऱ्यांपेक्षा वेगळे काही देण्याच्या अट्टाहासात दिग्दर्शकाच्या हातून खूप काही निसटल्यासारखे हा सिनेमा बघताना सतत जाणवते. अनेक गोष्टींमध्ये त्रुटी जाणवून येतात. सिनेमाचे संकलन अधिक चांगल्याप्रकारे करता येऊ शकले असते. सतत तिच दृष्ये दिसत राहिल्यामुळे प्रेक्षकांसाठी हा सिनेमा कंटाळवाणा वाटू शकतो. जस जसे कथानक पुढे जाते ते पहिल्या धाग्याला सोडून दुसऱ्या गोष्टीमध्ये अडकत जाते. त्यामुळे नक्की काय धरावे आणि काय सोडावे हेच शेवटपर्यंत कळत नाही. कथानकामध्ये अनेक प्रश्न अनुत्तरितच राहतात.

नायक आपल्या विचारांचा, अस्तित्वाचा शोध घेत असतो. बऱ्याचदा स्वत:चा आणि अस्तित्वाचा शोध घेताना, हिंसा अपरिहार्य होऊन बसते! ‘कौल’ सिनेमा नेमकी यावरच भाष्य करतो. चित्रपटगृहातून बाहेर पडताना जेवढा संभ्रम त्या नायकाच्या डोक्यात चाललेला असतो. तेवढाच किंबहूना त्याहून जास्त संभ्रम हा प्रेक्षकांच्या डोक्यातही सुरु होईल.
पुरस्कारांनी नावाजलेले सिनेमे सर्वसामान्यांना प्रत्येकवेळी पटतातच असे नाही. अशा धाटणीच्या सिनेमांसाठी अजून तसा भारतीय प्रेक्षक तयार व्हायचा आहे. असे असूनही दिग्दर्शकाच्या या धाडसी प्रयत्नाला दाद द्यावी लागेल.

– मधुरा नेरुरकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2016 1:10 am

Web Title: movie review kaul
Next Stories
1 फ्लॅशबॅक : ‘पोस्टर’ चित्रपट प्रसिध्दीचा आत्मा
2 …म्हणून ‘बेफिक्रे’मध्ये अदित्यने रणवीरला दिली पसंती
3 दीपिकासोबत हा सीन करण्यासाठी सोनाक्षी उत्सुक
Just Now!
X