19 October 2018

News Flash

रिव्ह्यू : ‘बाळकडू’ – आवाज रूपातील बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आपल्या स्टाईलने पोहोचविण्याचा प्रयत्न आणि मराठी जनमानसाला जागृत करण्याचा प्रयत्न बाळकृष्ण पाटील या व्यक्तिरेखेद्वारे चित्रपटकर्त्यांनी केला आहे.

| January 23, 2015 01:15 am

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भारावून टाकणारे व्यक्तिमत्व, वक्तृत्व आणि करिश्मा याचा अनुभव अवघ्या महाराष्ट्राने अनुभवला. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवरील चित्रपट म्हणून ‘बाळकडू’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण होणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील चित्रपटात बाळासाहेबांची भूमिका कोण साकारणार इथपासून ते बाळकडू म्हणजे नेमकं काय याची उत्कंठा प्रेक्षकांना लागून राहिली होती. व्हॉट्सअ‍ॅपवरही याची चर्चा रंगली होती. ‘बाळकडू’ या चित्रपटाद्वारे चित्रपटकर्त्यांनी ध्वनिरूपाने बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्व दाखवले आहे. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे २३ जानेवारी या बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी तो प्रदर्शित झाला आहे. तान्ह्य़ा बाळाची तब्येत चांगली राहावी म्हणून त्याला बाळकडू पाजले जाते. या चित्रपटाद्वारे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे बाळकडू आजच्या पिढीतील तरुणाईपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा प्रयत्न ‘बाळकडू’ या चित्रपटाद्वारे करण्यात आला आहे.

फोटो गॅलरी : ‘बाळकडू’ 

शिवसैनिकांशी, अवघ्या मराठी माणसांशी भाषणांतून नेमका संवाद साधण्याचा शिवसेनाप्रमुखांचा करिश्मा सगळ्यांनीच अनुभवला, पाहिला आहे. त्यांच्या व्यंगचित्रांनी केलेले शरसंधान, मार्मिक या व्यंगचित्र साप्ताहिकातून विरोधकांचे वस्त्रहरण केले याच्या सचित्र आठवणी अनेकांच्या स्मरणात आहेत. ‘बाळकडू’ या चित्रपटाच्या प्रारंभीच्या टायटल्समधून रूपेरी पडद्यावर बाळासाहेबांनी रेखाटलेली गाजलेली व्यंगचित्रे प्रेक्षकाला पाहायला मिळतात, आणि चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढते.
balkadumovie1

बाळकृष्ण पाटील नालासोपारा येथे राहणाऱ्या व शाळेत इतिहासाचा शिक्षक असलेल्या तरुणाला अचानक स्वातंत्र्यपूर्व काळ गाजविलेल्या अनेक नेत्यांचे आवाज ऐकू येऊ लागतात. इतिहासाच्या पुस्तकातील धडय़ांमधील व्यक्तींचे आवाज आपल्याला का ऐकू येतात म्हणून तो मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचारही करवून घेतो. तेव्हा त्यातले काही आवाज ऐकू येणे बंद होते परंतु एक आवाज त्यानंतरही ऐकू येत राहतो आणि त्याला अस्वस्थ करतो. ही अस्वस्थता आणि हा आवाज ऐकू येणे थांबवायचे असेल तर काही ठोस कृती करायला हवी याची जाणीव त्याला हा आवाजच करून देतो. मग त्या आवाजरूपी आदेशानुसार बाळकृष्ण पाटील हा शिक्षक कृती करतो आणि विजयी होतो.
balkadumovie2

शिवेसनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आवाजरूपाने चित्रपटातून प्रगटले आहेत हे या सिनेमाचे खास वैशिष्टय़ आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आपल्या स्टाईलने पोहोचविण्याचा प्रयत्न आणि मराठी जनमानसाला जागृत करण्याचा प्रयत्न बाळकृष्ण पाटील या व्यक्तिरेखेद्वारे चित्रपटकर्त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे सबंध चित्रपटात आजची शिवसेना, आजचे शिवसेनेचे नेते यापैकी काहीच नाही याचे आश्चर्य वाटू शकते.
शुद्ध काल्पनिक व्यक्तिरेखा आणि सिच्युएशन्सची रचना करून नकळत बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मांडण्याचा प्रयत्न चित्रपटकर्त्यांनी केला आहे. उत्तम छायाचित्रण, उत्तम अभिनय आणि उत्कृष्ट निर्मितीमूल्ये असलेल्या या सिनेमात नवं काही सांगण्याचा प्रयत्न चित्रपटकर्त्यांनी केलेला नाही. पोवाडा हा आजच्या तरुणाईलाही नक्की आवडेल असा तयार केला आहे.

संजय राऊत प्रस्तुत
बाळकडू
निर्माती – स्वप्ना पाटकर
कथा – स्वप्ना पाटकर
कथाविस्तार, पटकथा-संवाद – गणेश पंडित, अंबर हडप
दिग्दर्शक – अतुल काळे
छायालेखक – अजित रेड्डी
संकलक – आशीष म्हात्रे, अपूर्वा मोतीवाले
संगीत – अजित-समीर
कलावंत – उमेश कामत, नेहा पेंडसे, टिकू तलसानिया, प्रसाद ओक, सुप्रिया पाठारे, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, शरद पोंक्षे, भाऊ कदम, महेश शेट्टी, रमेश वाणी, जयवंत वाडकर, अभय राणे व अन्य.

First Published on January 23, 2015 1:15 am

Web Title: movie review marathi movie balkadu