News Flash

Movie Review : गुंजन सक्सेना- वास्तवाला गेलेला छेद नव्हे भलमोठा तडा!

अपेक्षाभंग, रसभंग सगळंच एकवटलंय...

समीर जावळे

‘गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल’ हा सिनेमा दोन दिवसांपूर्वीच नेटफ्लिक्सवर रिलिज झालाय. हा सिनेमा आहे कारगिल गर्ल गुंजन सक्सेना यांच्यावर आधारित. मात्र ही निव्वळ थाप आहे हे सिनेमा पाहून आपल्याला कळतं. गुंजन सक्सेना हे नाव आणि त्यांच्या कुटुंबीयांचे संदर्भ सोडले तर सिनेमा पाहून दोन वेगळ्या गुंजन सक्सेना डोळ्यासमोर उभ्या राहतात. एक खरीखुरी गुंजन सक्सेना ज्या आपल्या देशाची शान आहेत.  दुसरी कचकड्याची गुंजन सक्सेना म्हणजे जान्हवी कपूरने साकारलेली गुंजन. अत्यंत विश्वासाने आणि अपेक्षा ठेवून तयार झालेली कलाकृती पाहण्यास जावं आणि प्रत्यक्ष कलाकृती पाहिल्यावर आपल्या अपेक्षांना तडा जाऊन त्याच्या ठिकऱ्या व्हाव्यात तर आपल्या मनाची अवस्था काय होईल? ठिकऱ्यांमधून काही आपले वाटणारे तुकडे आपण शोधू कदाचित आणि त्यात काही वास्तवाची काही प्रतिबिंबं सापडतात का? ते पाहू पण वास्तव अपेक्षेच्या ठिकऱ्या, चिंधड्या होतात हे शल्य सिनेमा पाहताना बोचत राहतं.

 

 

या सिनेमाची सुरुवात होते ती एका धडाकेबाज सीनने भारतीय लष्कराचे जवान एका खोऱ्यातून चालत असतात. त्यानंतर त्यांच्यावर अचानक हल्ला होतो. अशावेळी एअरफोर्सला पाचारण करण्यात येतं. एअरफोर्सकडे असणारे पायलट्स सगळे हवाई मोहिमांसाठी गेलेले असतात. पर्याय उरलेला असतो तो फक्त एकच. गुंजन सक्सेना… ती धावत येते विमानात बसण्यासाठी… त्यानंतर सुरु होतो फ्लॅशबॅक. आता या प्रसंगापर्यंतचं एक वर्तुळ पूर्ण होईपर्यंत आता काहीतरी चांगलं पाहू आता काहीतरी चांगलं पाहू अशी अपेक्षा तुमच्या माझ्यासारखा प्रेक्षक ठेवतो आणि आपल्या अपेक्षांच्या चिंधड्या होतात.

जान्हवी कपूर संपूर्ण सिनेमाभर बथ्थड आणि चौकोनी चेहऱ्याने वावरली आहे. जान्हवी कपूर १० वीत गेल्यावर, १२ वीत गेल्यावर, पदवी परीक्षा दिल्यावर आणि एअरफोर्समध्ये गेल्यावर सेम टू सेम दिसते हे पाहून हसू आवरत नाही. किमान तिच्या दिसण्यात काही तरी बदल अपेक्षित होते. मात्र इथे दिग्दर्शकाने प्रेक्षकांना गृहित धरलंय. दहावीच्या परीक्षेत ९४ टक्के मिळालेली जान्हवी खुश होते तरीही चौकोनीच दिसते आणि एअरफोर्स पायलट होते तरीही चौकोनीच दिसते. चौकोनी दिसण्याचं.. चेहऱ्यावर कोणत्याही भावाचा अभाव असण्याचं सातत्य जान्हवी कपूरने संपूर्ण सिनेमाभर जपलंय. दिग्दर्शक शरण शर्मा यांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली असावी बहुदा. सिनेमाचं सर्वात मोठं अपयश हेच आहे की जान्हवी कपूर ही गुंजन सक्सेना वाटतच नाही. ही भूमिका तिला झेपलेलीच नाही. त्यामुळे या अशोभनीय भूमिकेसह आपण तिला सहन करत राहतो… भाव खाऊन गेलेत ते दोन कलाकार.. एक म्हणजे अंगद बेदी. दुसरा पंकज त्रिपाठी. अंगदने जान्हवीच्या भावाचं काम केलंय आणि पंकज त्रिपाठीने जान्हवीच्या वडिलांचं. आपल्या मुलीला विमान उडवायचं आहे हे तिचं स्वप्न तिच्या वडिलांनीही उराशी बाळगलंय. लहानपणीचा एका प्रसंगातून ते ध्वनित होतं आणि पुढे ते त्या दोघांच्या संवादातून उलगडतही जातं. एक वडील आपल्या मुलीला इतकं प्रेमाने वाढवत आहेत.. मोठं करत आहेत हे पाहून कौतुक वाटतं. पंकज त्रिपाठीने सुंदर अभिनय केला आहे. मात्र जान्हवी कपूर इथेही चौकोनीच वाटते. बरं हे प्रसंगही पुन्हा स्वप्नरंजन करणारेच आहेत. कारण जगातले कोणतेच वडील मुलीला फक्त प्रेमाने, आपुलकीनेच समजवत नाहीत. ते तिला रागवतात तो प्रसंगही एकदाच दाखवण्यात आला आहे. तो छान जमलाय.. पण अवघ्या काही फ्रेम्स आणि काही संवादांसाठी सिनेमा पाहणं ही खरोखर शिक्षा ठरते.

 

गुंजन सक्सेना यांनी दाखवलेलं शौर्य आणि त्यांच्यामुळे एअरफोर्समध्ये मुलींना मिळालेली संधी ही बाब निश्चितच संपूर्ण देशासाठी अभिमानस्पद आहे. मात्र याच अभिमानास्पद महिलेची कारकीर्द दाखवताना सिनेमा अगदीच फिका झालाय. असंही बायोपिक म्हणजेच चरित्रपट करणं हे एखादं शिवधनुष्य पेलण्यासारखं असतं. गुंजन सक्सेना पाहताना हे शिवधनुष्य घेऊन दिग्दर्शक तोंडावर कसा पडलाय याचीच जाणीव होते.

सिनेमा आणि वाद

या सिनेमात गुंजन सक्सेनाला मोठं करण्यासाठी म्हणजे लार्जर दॅन लाइफ वगैरे करण्यासाठी एअरफोर्सची म्हणजेच भारतीय वायुदलाची प्रतिमा मलीन केली गेली आहे असा आरोप झाला आहे. हा आरोप तंतोतंत खरा आहे हे सिनेमा पाहिल्यावर कळतं. एअरफोर्समध्ये एक मुलगी आली आहे म्हणून तिला विमान उडवायला न देणं, तिची सतत हेटाळणी करणं, तिच्यासाठी स्वतंत्र स्वच्छता गृहाची व्यवस्था नसणं, तिला कायम पाण्यात पाहणं हे सगळं एअरफोर्सचे लोक करत असतात असं दाखवण्यत आलं आहे ते निश्चितच खटकतं. या संदर्भात आक्षेप घेणारं एक पत्रही भारतीय वायुसेनेने धर्मा प्रॉडक्शन आणि सेन्सॉर बोर्डाला पत्र लिहून नाराजीही दर्शवली आहे. एवढंच काय तर स्वतः गुंजन सक्सेना यांनीही सिनेमात दाखवण्यात आलेले हे प्रसंग नाकारले आहेत. वास्तवापासून फारकत घेऊन हा सिनेमा तयार करण्यात आला आहे. जे काही घडलंय ते गुंजन सक्सेनांनी नाकारलं आहे.

आपण गुंजन सक्सेना यांचं शौर्य त्यांचं आयुष्य पाहण्यासाठी सिनेमा सुरु करतो. सुमारे दोन तासांच्या या सिनेमात आपण हरवून जात नाही… आपल्याला वास्तव काहीतरी वेगळं आहे हे जाणवत राहतं. एक वेळ अशी येते की गुंजन सक्सेना सगळ्या पुरुष सहकाऱ्यांच्या वर्तणुकीला कंटाळून एअरफोर्स सोडून सुट्टी घेऊन घरी येते…रडत रडत. असं कधी होतं का? एअरफोर्समध्ये पहिली वैमानिक असलेल्या या व्यक्तीला कोणत्याही ऑफिशियल फॉर्मेलिटीशिवाय रजा मिळते? तर असे काही हास्यास्पद.. किव करावेसे वाटणारेही प्रसंग या सिनेमात आहेत. खरंतर ही भूमिका कंगना रणौत, तापसी पन्नू यांनी अत्यंत तडफेने साकारली असती. मात्र जान्हवी कपूरला ही भूमिका जमलेली नाही. उम्मीदसे दुगना मिळाल्यानंतर जी काही अवस्था होते… तशाच अविर्भावात ती वावरली आहे.

शेवटची २० मिनिटं उरतात तेव्हा पहिल्या सीनपासून सुरु झालेलं वर्तुळ पूर्ण होतं..त्या २० मिनिटात गुंजन सक्सेना. त्यांनी दाखवलेलं शौर्य यावर हलकंसं भाष्य करण्याचा ओझरता प्रयत्न झालाय. ज्यामुळे कदाचित तिथे नेमकं काय झालं असेल याची पुसटशी कल्पना प्रेक्षक म्हणून आपल्याला येते. करण जोहरने सिनेमाची निर्मिती केली आहे.. सुरुवातीला, मधे किंवा शेवटाकडे एखादं आयटम साँग घुसडलं नाही हे आपलं नशीबचं समजायचं. तेव्हा गुंजन सक्सेनांच्या बायोपिकच्या नावाखाली केलेली माती सुजाण प्रेक्षकाला कळते. लॉकडाउनमध्ये घरी असाल तरीही पाहू नका असा हा सिनेमा आहे. बाकी जान्हवी कपूरचे फॅन असाल आणि गुंजन सक्सेना कोण होत्या हे प्रश्न पडले असतील तर बघा.. पण आपल्या जबाबदारीवर!

sameer.jawale@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2020 3:21 pm

Web Title: movie review on gunjan saxena the kargil girl about story and acting and other things in the film scj 81
Next Stories
1 ‘सुशांतसोबत काय झालं सगळ्यांना कळायला हवं’, सुरज पंचोलीची सीबीआय चौकशीची मागणी
2 ‘या’ चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला सुशांतचा ‘दिल बेचारा’ चित्रपट
3 “पाकिस्तानी गाण्याची कॉपी केली नाही”; ‘सडक २’च्या संगीतकाराने तो आरोप फेटाळला
Just Now!
X