05 March 2021

News Flash

जिव्हारी लागणारी थप्पड

एकच थप्पड असेल, पण तो नाही मारू शकत.. इतकी थेट आणि सरळ भावना आहे.

चित्र रंजन : रेश्मा राईकवार

थप्पड

कितीही स्त्री-पुरुष समानतेचा नारा लगावला तरी सभ्यता आणि  संस्कृतीच्या नावाखाली पांघरलेला तो एक बुरखा आहे आणि कधी ना कधी तरी तो टराटरा फाटणारच. नव्हे तो फाटायला हवा. त्या बुरख्यामागचे वास्तव समानता नाकारणाऱ्या आणि स्वीकारल्याचा दावा करणाऱ्याही पुरुषांनाच दिसायला हवे असे नाही. मुळात ते स्त्रीचे स्त्रीला जाणवायला हवे. सगळे काही आदर्शवत आहे असा बुरखा समाजाने त्यांना घातला आहे म्हणण्यापेक्षा तो पिढय़ान्पिढय़ा स्त्रियांनीही आपल्या डोळ्यावर चढवला आहे हे वास्तव आहे. अनुभव सिन्हा दिग्दर्शित, मृण्मयी लागू-अनुभव लिखित ‘थप्पड’ इतकी जोरदार आहे की आवाज न करताही ती दोन्ही बाजूंना मुळातून हादरवण्याचे काम करते.

एकच थप्पड असेल, पण तो नाही मारू शकत.. इतकी थेट आणि सरळ भावना आहे. आत दबलेला इतक्या वर्षांचा तो आवाज आहे जो पडद्यावर आणण्याचे काम दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी केले आहे. मात्र इथे अनुभव सिन्हांबरोबरच वारंवार लेखक म्हणून मृण्मयी लागूचा उल्लेख प्रामुख्याने करावासा वाटतो, कारण मुळात क थेतच तो विचार स्पष्टपणे उतरला आहे. कुठलेही आढेवेढे न घेता, भीडभाड न बाळगता, एक शब्दही न कचरता प्रामाणिकपणे आहे ती भावना व्यक्त करण्याचे धाडस नायिका करताना दिसते. तिचा विचार, तिची स्वत:बद्दलची जाणीव इतकी स्पष्ट आहे की तिला कोणत्याही अलंकारिक शब्दांचा आधार घ्यावा लागत नाही, एक क्षणही ती आपल्या विचारावरून ढळत नाही. स्वत:ला जे जाणवते आहे ते योग्य आहे की नाही, याची चाचपणी ती नक्की करते. मात्र एकदा त्यातला प्रामाणिकपणा जाणवल्यावर ती परिणामांचा विचार करत बसत नाही, ती त्यांना सामोरे जाण्याचे धैर्य बाळगून आहे. स्त्री ही उपभोग्य वस्तू नाही. तीही माणूस आहे. तिलाही पुरुषाप्रमाणेच भावभावना आहेत, आवडीनिवडी आहेत, स्वातंत्र्य आहे, असल्या कुठल्याही गुळमट उपदेशाचा आधार ती घेत नाही. थप्पड मारणे ही चूक आहे आणि ती मला मान्य नाही, इतका थेट विचार पहिल्यांदाच चित्रपटातून उमटला आहे आणि त्यासाठी लेखक-दिग्दर्शक जोडगोळीचे कौतूक करायलाच हवे. आपली स्वप्ने बाजूला सारून, नवऱ्याच्या स्वप्नपूर्तीसाठी झटणारी गृहिणी होण्याचा निर्णय अमृताचा (तापसी पन्नू) स्वत:चा आहे. तिला त्या निर्णयाबद्दल कुठलाही पश्चात्ताप नाही, उलट ती सकाळी उठल्यापासून दूध-पेपर, नवऱ्याचा नाश्ता, सासूचे बीपी तपासणे ते नवऱ्याला हातात पाकीट, घडय़ाळ, डब्बा, रुमाल देत हसतमुखाने ऑफिससाठी निरोप देईपर्यंत सगळे काही एका तालात करते आहे. तिची नृत्याची आवड अगदी दुधाची तहान ताकावर भागवल्यासारखी तीही भागवून घेते आहे. या एवढय़ा धबडग्यात सकाळचा एक कप चहाचा वेळ हा तिचा स्वत:साठीचा वेळही ती जपते आहे. यातला एकसुरीपणा तिला जाणवतच नाही, असंही नाही, पण ते तिने मनापासून स्वीकारले आहे. ही सगळी सुरेल, आनंदी दैनंदिनी एका बेसूर थप्पडेने उद्ध्वस्त होते. हा कथेचा मुख्य धागा म्हणता येईल, पण त्याचे इतके असंख्य पदर कथेत विणलेले आहेत की आपणही त्याकडे दुर्लक्ष करत आलो आहोत हे प्रत्येक स्त्रीला जाणवल्याशिवाय राहणार नाही.

वर म्हटल्याप्रमाणे नवऱ्याने सगळ्यांसमोर थप्पड मारल्यानंतर आपल्या आत नेमकी काय उलथापालथ झाली आहे, हेच अमृताला कळत नाही. काही न कळण्यापासून ते नेमके काय झाले आहे हे समजण्यापर्यंतचा अमृताचा स्वत:चा प्रवास, तिचे गोंधळलेपण, तिचा शोध आहे. सत्य एकदा गवसले की सगळे काही सुरळीत होत नाही, उलट आजवर स्वीकारलेला खोटेपणाच इतका मोठा असतो की सगळ्याच गोष्टी बिनसत जातात. अमृताला गवसलेले सत्य तिच्या नवऱ्याच्या लेखी काहीही नाही. रागाच्या ओघात थप्पड मारली, झाले ते झाले. पुन्हा होणार नाही. त्यात काय मनाला लावून घ्यायचे? हा नवऱ्याचा विचार एकीकडे आहे. तो जो विचार करतो आहे त्याच पद्धतीचा विचार अमृताचा दीर, तिचा भाऊ, तिचे सासरे अगदी तिची वकीलही (माया सराओ) करताना दिसते. दुसरीक डे एवढय़ाशा छोटय़ा गोष्टीवरून कोणी संसार मोडत नाही, हे सांगणारी आई. स्त्रियांनी अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढे जायला हवे म्हणणारी सासू, रोजच्या रोज नवऱ्याकडून मार खाणारी तिची मोलकरीण याच व्यक्ती तिच्या अवतीभवती आहेत. तिला जे वाटते आहे ते योग्य आहे असा आवाज आतून येत असेल तर तेच योग्य आहे, असा धीराचा सल्ला तिला वडिलांकडून (कुमुद मिश्रा) मिळतो. मात्र इथेही आदर्शवाद आणि वास्तवातला फोलपणा दिग्दर्शकाने जाणवून दिला आहे. एरवी पत्नीवर खूप प्रेम करणाऱ्या, तिला आदराने वागवणाऱ्या अमृताच्या वडिलांना तुम्ही माझ्या आवडीनिवडींना विरोध नाही केला पण त्या जप म्हणून पाठिंबाही दिला नाही, असे पत्नीकडून (रत्ना पाठक शाह) ऐकवले जाते, तेव्हा तेही निरु त्तरच होतात. अमृताच्या एका निर्णयाने तिच्याबरोबरच्या या स्त्रियांचेही जग बदलते, त्यांचेही विचार बदलतात. आणि त्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यातील पुरुषांवरही होतो. अर्थात, तो जितक्या सहजपणे होताना दाखवला आहे तो खटकणारा आहे. पण या एका थप्पडीमागे स्त्रियांना गृहीत धरले जाणे, सभ्यता आणि संस्कृतीच्या नावाखाली तिच्यावर आशाअपेक्षांचे नियमांचे ओझे लादणे, आदर्श मुलगी-सून-पत्नी-आई अशा विविध नात्यांतून तिच्या जगण्यासाठी आखलेल्या असंख्य चौकटी या सगळ्याचा गोंगाट आहे. पण तो आवाज ऐकू येत नाही, कारण मुळात तिला स्वत:चा आवाज आहे, हेच ती या गोंगाटात विसरून गेली आहे. तो दबलेला तिचा हुंकार बाहेर काढण्याचे काम या एका थप्पडने केले आहे. तापसी पन्नूने सगळ्या ताकदीनिशी ही अमृता साकारली आहे. फार न बोलता आपल्या देहबोलीतून, कमीत कमी शब्दांत आपली भावना समोरच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या अमृताची प्रत्येक भावछटा तिने अप्रतिम रंगवली आहे. तिला अशीच अबोल पण नेमकी साथ रत्ना पाठक शाह, तन्वी आझमी, माया सराओ, नायला ग्रेवाल, दिया मिर्झा या नायिकांच्या फौजेने दिली आहे. आपल्या मुलीच्या भावना नेमकेपणाने समजून घेणारा पिता, आपणही चुकलो याची जाणीव झाल्यानंतर खजील नजरेने पत्नीकडे पाहणारा पती असे कित्येक उत्तम क्षण कुमुद मिश्रांनी आपल्या सहज अभिनयाने रंगवले आहेत.

कुठलेही भडक नाटय़ नाही, आरडाओरडा नाही, नको तो ताणतणाव नाही. गाण्यांचा इमोशनला मारा नाही. या कुठल्याच तकलादू गोष्टींचा आधार न घेता तिला प्रेमाने आणि आदराने वागवायलाच हवे हे पुन्हा पुन्हा सांगणारा हा चित्रपट आहे. लग्नसंस्थेच्या नावाखाली सगळ्या जबाबदाऱ्या तिच्यावर ढकलून देत, आपल्या रागलोभ, वासनेच्या आविष्कारासाठीच तिचा जन्म झाला आहे. आपला तिच्यावर मालकी हक्क आहे या भ्रामक विचाराने वावरणाऱ्या पुरुषसत्ताक व्यवस्थेला चपराक देणारा हा ‘थप्पड’ सामाजिक संदर्भानेच नाही तर चित्रपट इतिहासातही महत्त्वाचा ठरला आहे.

 दिग्दर्शक – अनुभव सिन्हा

कलाकार – तापसी पन्नू, पावेल गुलाटी, कुमुद मिश्रा, रत्ना पाठक शाह, तन्वी आझमी, नायला ग्रेवाल, माया सराओ, दिया मिर्झा, राम कपूर, अंकुर राठी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 29, 2020 12:09 am

Web Title: movie review thappad movie akp 94
Next Stories
1 Video : वरुण धवनच्या गाडीखाली आला फोटोग्राफरचा पाय अन्…
2 आंबे कसे खाता याऐवजी रात्री शांत झोप कशी लागते हे विचारा; ‘दंगल गर्ल’चा सणसणीत टोला
3 होय मी प्लास्टिक सर्जरी केली आणि मला त्याची लाज वाटत नाही; श्रुती हासनचं ट्रोलर्सना उत्तर
Just Now!
X