01 October 2020

News Flash

तंबूतल्या अंधाराला झगझगीत कोंदण!

तंबूतल्या खेळावर भर देण्याऐवजी तंबूबाहेरचा तंबू मालकांचा ‘खेळ’ दाखवल्याने टुरिंग टॉकीज हा माहितीपट न होता उत्तम चित्रपट झाला आहे. टुरिंग टॉकीजच्या मालकांची फरफट, या धंद्याला

| April 18, 2013 05:48 am

टुरिंग टॉकीज
तंबूतल्या खेळावर भर देण्याऐवजी तंबूबाहेरचा तंबू मालकांचा ‘खेळ’ दाखवल्याने टुरिंग टॉकीज हा माहितीपट न होता उत्तम चित्रपट झाला आहे. टुरिंग टॉकीजच्या मालकांची फरफट, या धंद्याला आलेली उतरती कळा, त्यातील आव्हाने, तंबूमालकांनी चित्रपट चालवण्यासाठी लढवलेल्या विविध क्लृप्ता हे दाखवण्यात गजेंद्र अहिरे आणि तृप्ती भोईर नक्कीच यशस्वी ठरले आहेत. पण हा चित्रपट दिग्दर्शकापेक्षाही संकलकाचा आहे, हे प्रत्येक फ्रेममधून जाणवते.

तृप्ती भोईर या तरुण निर्मातीने ‘टुरिंग टॉकीज’ या चित्रपटाची घोषणा केल्यापासूनच या चित्रपटाबद्दल वेगळीच उत्कंठा होती. दोन पिढय़ांमागच्या लोकांच्या भावविश्वात स्वप्नवत स्थान असलेल्या तंबूतल्या सिनेमावर हा चित्रपट बेतला असल्याने एका पिढीने कधीच न बघितलेले विश्व पाहायला मिळणार, याची उत्सुकता लागून होती. मात्र केवळ तंबूतला खेळ बघण्याचा आनंद लुटणाऱ्या प्रेक्षकांवर या चित्रपटाचा फोकस न ठेवता त्या तंबूबाहेरच्या अनेक गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्याने नव्या पिढीलाच नाही, तर तंबूतले खेळ पाहिलेल्या पिढीसाठीही हा एक वेगळाच अनुभव ठरतो. त्यातच छायाचित्रणकार अमोल गोळे याने हा अनुभव डोळ्यांसाठीही प्रचंड सुखद केला आहे.
महाराष्ट्रात वर्षभर होणाऱ्या जत्रांमध्ये तंबू ठोकून त्यात चित्रपटांचे खेळ दाखवणाऱ्या चित्रपटवेडय़ा तंबूच्या मालकांची ही गोष्ट आहे. चांदी टुरिंग टॉकीजची मालकीण असलेल्या चांदीचा (तृप्ती भोईर) बाप बापूशेट (सुहास पळशीकर) जुगारात स्वत:चा तंबू डावावर लावतो आणि हरतो. सहा महिन्यांत पैशांची परतफेड न केल्यास तो तंबू ताब्यात घेण्याची ताकीद सावकार चांदीला देतो. शहेनशाह टुरिंग टॉकीजचा मालक सुभान्या (मिलिंद शिंदे) याचा हा सगळा डाव आहे, हे चांदीला माहीत असते. मात्र पैसे देऊन तंबू सोडवण्याखेरीज तिच्या हाती काहीच नसते. त्यातच तिच्या तंबूत चाललेला चित्रपट निर्माता परत घेतो आणि तो सुभान्याला देतो. त्यामुळे चांदी आणखीनच अगतिक होते.
याच दरम्यान जत्रेत नवा चित्रपट घेऊन आलेल्या तरुण दिग्दर्शक अविनाशची गाठ चांदीशी पडते. चित्रपटाच्या व्यवहारात सुभान्याकडून फसवणूक झालेला अविनाश आपला चित्रपट चांदीला चालवायला देतो. मग सुरू होते चांदीची धडपड! यात तिच्या साथीला असतो कण्र्यावरून तिच्या चित्रपटांची जाहिरात करणारा रंग्या रंगिला (किशोर कदम) आणि तिचा लहान भाऊ चिन्मय संत.
दिग्दर्शक गजेंद्र अहिरे आणि निर्माती तृप्ती भोईर यांनी हा विषय खूपच चांगल्या पद्धतीने पडद्यावर मांडला आहे. मूळ कथा तृप्तीचीच असल्याने आणि तिने तंबूतल्या खेळांचा अनुभव स्वत:च घेतला असल्याने ही कथा अक्षरश: साजिवंत होऊन पडद्यावर उतरली आहे. यातील रंग्या रंगिलाचे पात्र तर किशोर कदम यांनी स्वत:च रेखाटले आहे आणि हे पात्र चित्रपटातील सर्वोत्तम म्हणावे, असे एक झाले आहे. संपूर्ण चित्रपट चांदीभोवती फिरत असूनही रंगिलाने प्रचंड भाव खाल्ला आहे.
पटकथेत एखाद दुसरा दोष वगळता फार दोष नाहीत. पण गावातील सावकार दोन खेळांचे पूर्ण पैसे देण्याचे मान्य करून नटीबरोबरच फक्त तंबूत खेळ पाहण्याची मागणी करतो. प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी स्वत:च नटी बनलेली चांदी हे मान्य करते. वास्तविक हा प्रसंग चित्रपटात नसता, तरी चालले असते. त्याशिवाय ‘सुखान्त’ करण्याच्या नादात चित्रपटाचा शेवटही काहीसा खटकणारा झाला आहे. तंबूंची संख्या कमी होत आहे, हे निर्मातीला आणि दिग्दर्शकाला ठसवायचे आहे. मग त्या अनुरूप शेवट केला असता, तर तो शेवट जास्त अंगावर आला असता. त्याशिवाय बापूशेट जुगारात नक्की किती रक्कम हरला आहे आणि चांदीला किती पैसे फेडायचे आहेत, हेदेखील शेवटपर्यंत कळत नाही.
मात्र हे दोष वगळता चित्रपट उत्तम झाला आहे. ‘एक बार यारी कर ली, तो गिनती काहेकी’, हा बापूशेटच्या तोंडी असलेला संवाद अप्रतिमच! संवादांच्या बाबतीत चांदीच्या तोंडी असलेले अतिशुद्ध संवाद खटकतात. लहानपणापासूनच गावोगाव फिरून खेडुतांना तंबूतले खेळ दाखवणाऱ्या मुलीची भाषा एवढी शुद्ध असेल, हे पटत नाही. पण अख्खी हयात या टॉकीजच्या धंद्यात घालवणाऱ्या बापूशेटच्या तोंडी सगळेच फिल्मी संवाद देण्यात संवाद लेखकाची कल्पकता दिसते. आर्ट फिल्म बनवणाऱ्या दिग्दर्शकाच्या तोंडी असलेले छापिल संवाद, त्याच्या मनात वाजणारी इंग्लिश गाणी हे सगळेच वातावरणाला पुरक आहेत.
दिग्दर्शनाच्या दृष्टीनेही हा चित्रपट चांगला झाला आहे. मात्र गजेंद्र अहिरे यांनी दिलेल्या कबुलीनुसार हा चित्रपट संपूर्णपणे संकलकाचा असल्याने त्यात त्यांचे कसब किती, हा प्रश्न आहे. तरीही काही जागा उत्तम आहेत. रंग्या रंगिला खासगीतही काही बोलायचे झाले, तरी कण्र्यावरूनच बोलतो. यातून दिग्दर्शक बरेच काही सूचवून जातो. त्याशिवाय जत्रेतले छोटेछोटे बारकावेही त्याने उत्तम टिपले आहेत. तिकिटे खपावीत म्हणून आकर्षक ऑफर्स देण्याचा प्रसंगही खूप चांगला आला आहे. नटीच्या हातून तिकिटे घेण्यासाठी उडालेली झुंबड आणि त्या वेळी लोकांच्या नजरांमधून दिग्दर्शक खूप काही बोलून जातो.
संगीत आणि संकलन या दोन्ही गोष्टींना चित्रपटात अनन्यसाधारण महत्त्व आहे. इल्लय्या राजा यांनी चित्रपटाला पूरक संगीत दिले आहे. इंग्लिश गाणीही अप्रतिम झाली आहेत. तसेच प्रोजेक्टर रूममध्ये येणारा आवाज वगैरे आवाजही चांगले पकडले आहेत. संकलनाच्या बाबतीत तर बल्लू सलुजा यांनी कमाल केली आहे. चित्रपटाची व्याप्ती एवढी प्रचंड असूनही त्यांनी तो ठरावीक काळात उत्तम बसवला आहे. अमोल गोळे यांनी छायाचित्रणात कमाल केली आहे. वेगवेगळ्या गावी, वेगवेगळ्या देवांच्या उत्सवात भरणाऱ्या जत्रा त्यांनी योग्य प्रकारे चित्रित केल्या आहेतच. पण त्याचबरोबर टुरिंग टॉकीजच्या गाडय़ांच्या प्रवासादरम्यानचे चित्रिकरणही उत्तम झाले आहे. तंबूतल्या अंधारावर असलेल्या या चित्रपटात प्रकाशाचा योग्य वापर केल्याने चित्रपट कुठेही अंधारा वाटत नाही.
कलाकारांच्या कामांच्या बाबतीत तर नेहा पेंडसे हा एकमेव अपवाद वगळता सगळ्यांनीच खूप उत्तम कामे केली आहेत. या चित्रपटात नेहाच्या भूमिकेची गरजच नव्हती. ती जेवढय़ा काळासाठी चित्रपटात आहे, त्याचीही गरज वाटत नाही. शंभरपैकी शंभर गूण तृप्तीला द्यायला हवे. तिने साकारलेली चांदी निव्वळ अप्रतिम. पण त्याहीपुढे जाऊन किशोर कदमच्या रंगिलाला शंभरपैकी तीनशे गूण द्यायला हवेत. आतापर्यंत विविध भूमिकांमध्ये दिसलेला किशोर या चित्रपटात सर्वात जास्त भाव खाऊन जातो. मिलिंद शिंदेची भूमिकाही प्रचलित धाटणीच्या खलनायकाची नाही. पण आपल्या व्यवसायातील प्रतिस्पध्र्यावर मात करण्याची ईर्षां, मुलींबद्दल मनात असलेली तुच्छतेची भावना आणि तरीही धंद्याबद्दलची निष्ठा याचा मेळ त्याने उत्तम साधला आहे. सुहास पळशीकर यांनीही आपली भूमिका चोख बजावली आहे. सुबोध भावेने तरुण दिग्दर्शक उत्तम साकारला असला, तरी त्याच्या या भूमिकेत कुठेतरी ‘भारतीय’मधील त्याचे पात्र दिसते. पण चांदीबद्दल त्याला वाटू लागलेले आकर्षण, टुरिंग टॉकीजबद्दल बदलत गेलेल्या त्याच्या भावना वगैरे गोष्टी त्याने आपल्या अभिनयसामर्थ्यांच्या जोरावर खूप चांगल्या दाखवल्या आहेत. चिन्मय संतनेही खूप चांगले काम केले आहे.
एकूणच हा चित्रपट नक्कीच बघायला हवा. काळाच्या रेटय़ापुढे मोडकळीस पडत चाललेल्या या एका वेगळ्याच विश्वाची सैर हा चित्रपट घडवतो.

टुरिंग टॉकीज

निर्माती – तृप्ती भोईर
दिग्दर्शक – गजेंद्र अहिरे
छायाचित्रण – अमोल गोळे
संकलन – बल्लू सलुजा
संगीत – इल्लय्या राजा
कलाकार – तृप्ती भोईर, किशोर कदम, मिलिंद शिंदे, सुहास पळशीकर, सुबोध भावे, चिन्मय संत, नेहा पेंडसे, वैभव मांगले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2013 5:48 am

Web Title: movie review touring talkies
Next Stories
1 ‘प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे, प्रेम असतं!?’ : प्रेमाची खुसखुशीत भट्टी!
2 मन्या सुर्वेच्या भूमिकेमुळे नवीन ओळख मिळेल – जॉन अब्राहम
3 रणवीर आणि दीपिकाचे लुंगीवरून भांडण
Just Now!
X