रेश्मा राईकवार

‘संदीप और पिंकी फरार’ हे नाव काहीसं ‘बंटी और बबली’ चित्रपटाचा भास करून देणारं, त्यामुळे याही चित्रपटात तशीच काहीशी लबाडीची कथा असेल असा सहज ग्रह होतो. चित्रपटही यशराजचा आणि अर्जुन कपूर, परिणीती चोप्रा हे दोन हुक मी चेहरेही यशराजच्याच कं पूतले.. पण इथे लेखक-दिग्दर्शक म्हणून दिबाकर बॅनर्जीचं नाव जोडलं गेलं आहे. अर्थात सुरुवातीची काही सेकं दं गेल्यावर हे लक्षात येतं, तोवर या चित्रपटाच्या पहिल्या फ्रे मपासून पडद्यावर खिळलेली आपली नजर आपण चुकीच्या चित्रपटासाठी तर बसलेलो नाहीत ना, या विचाराने आपल्याला आतल्या आत चुचकारत असते. यशराजची उत्कृष्ट निर्मितीमूल्ये आणि दिग्दर्शक म्हणून दिबाकर बॅनर्जी यांची संवेदनशील, वेगळ्या पद्धतीने गोष्ट पाहणारी नजर या दोन गोष्टींचा मिलाफ ‘संदीप और पिंकी फरार’ चित्रपटात पाहायला मिळतो.

तर पहिल्याच फ्रे ममध्ये आपल्याला गाडीत बसलेल्या दोनच तरुणांचे चेहरे दिसतात, त्यांच्या आपापसात चाललेल्या गप्पा, मध्येच बंद होणारा आवाज, त्या शांततेला जोडून घेणारी सुरावट, पुन्हा त्याच चेहऱ्यांच्या गप्पा.. हा खेळ काही सेकं द आपल्यासमोर सुरूच राहतो. तो थांबतो तेव्हा आपल्याला पहिला झटका हा चित्रपट देतो. दुसरा इथे संदीप आणि पिंकी या व्यक्तिरेखांनी नावापासूनच फारकत घेतली आहे. कॉर्पोरेट विश्वाचे प्रतिनिधित्व करणारी, अर्थशास्त्रात सुवर्णपदक पटकावलेली, आपल्या हुशारीवर बँके ला गाळातून बाहेर काढून वर आणणारी आणि याच हुशारीमुळे जीवावरचे संकट ओढवून घेतलेली संदीप कौर (परिणीती चोप्रा) ही चित्रपटाची एकाअर्थी नायक आहे. आणि संदीपला हॉटेलमधून बाहेर काढण्याच्या कामगिरीवर पाठवला गेलेला आणि काही मिनिटांत तिच्याचमुळे आपणही मृत्यूच्या दाढेत ओढलो गेलो आहोत, याची जाणीव झालेला हरयाणातील निलंबित पोलीस अधिकारी पिंकी दाहिया (अर्जुन कपूर) यांची ही गोष्ट आहे. एका दुर्दैवी आणि विचित्र परिस्थितीत अडकलेले संदीप आणि पिंकी दोघेही फरार होतात. एकाच परिस्थितीत सापडलेले हे दोघेही एकाच देशात असलेल्या दोन वेगवेगळ्या विश्वांचे प्रतिनिधी आहेत. संदीपच्या हातात दोन लाखांची बॅग आहे, तीस हजाराचे घडय़ाळ आहे आणि कितीही अडचणीत सापडलो तरी आपण बँके तून दहा लाख सहज काढून देऊ शकतो हा तिचा आत्मविश्वास आहे. त्याउलट, आपली गेलेली नोकरी परत मिळवण्याच्या प्रयत्नात असलेला पिंकी मनापासून संदीपचा तिरस्कार करतो आहे. दोघेही भ्रष्टाचारी व्यवस्थेचे बळी आहेत, डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार आहे आणि तरीही हे दोघे एकत्र येण्यापेक्षा एकमेकांशी फटकू नच वागतात. लपण्यासाठी जागा शोधणाऱ्या संदीप आणि पिंकीची ओळख एका वृद्ध दाम्पत्याशी होते. या दाम्पत्याचा सच्चेपणा, त्यांचं प्रेम कु ठेतरी संदीपला आतून हलवून सोडतं आणि आपणच हुशारीने विणलेल्या भ्रष्टाचाराच्या जाळ्याची तिला जाणीव होते, गोष्टी आपोआपच बदलू लागतात.

सत्ताकारण आणि त्यासाठी खेळले जाणारे अर्थकारण, लोकांचा के ला जाणारा वापर या सगळ्या गोष्टी आपल्याला नवीन राहिलेल्या नाहीत. मात्र दिग्दर्शक इथे हा खेळ दाखवत नाही. तो या खेळात स्वार्थासाठी सहभागी झालेल्या, या खेळाशी संबंध नसतानाही यात अडकलेल्या अशा व्यक्तिरेखांच्या माध्यमातून या खेळापलीकडल्या मानवी भावभावनांच्या गोष्टी उलगडतो. आर्थिक सुबत्ता कमावण्यासाठी मागेपुढे न पाहता, तत्त्वं-मानवी संवेदना धाब्यावर बसवून काम करणारी तरुण फळी यात दिसते, तशी तत्त्वांना धरून बसलेली-व्यवस्थेवर विश्वास असलेली जुनी पिढीही दिग्दर्शक दाखवतो. या दोन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा चुकीचे बरोबर होण्याच्या प्रक्रियेची शक्यताही दिग्दर्शक दाखवून देतो. अर्थात, हे सगळं दिबाकर बॅनर्जीच्या वास्तववादी शैलीतून समोर येतं. त्यामुळे इथे प्रेमकथा नाही, भडक नाटय़ नाही, धमाके दार गाणी नाहीत.. नाही म्हणायला एका गाण्यात पिंकी भाईसारखा ताल धरताना दिसतो. पण त्यातही भडक अवास्तवपणा दिग्दर्शकाने टाळलेला आहे. या चित्रपटाची नायकच संदीप आहे, त्यामुळे परिणीती चोप्रावर जबाबदारी अधिक आहे. ती समर्थपणे पेलण्याचा प्रयत्न तिने के ला आहे. अर्जुनची व्यक्तिरेखा त्या तुलनेत काहीशी पठडीबाज आणि संदीपभोवती घुटमळणारी आहे. आपल्या मनातील भावना दाबून ठेवणारा, फटकळ पण मनाने निर्मळ अशा पिंकीची व्यक्तिरेखा अर्जुनने अचूक साधली आहे. नीना गुप्ता आणि रघुवीर यादव या दोन अप्रतिम कलाकारांचा वावरही चित्रपटाला एक वेगळाच आयाम देऊन जातो. अर्थात, सतत व्यावसायिक मसाला चित्रपटांची सवय झालेल्या रसिकमनांना या चित्रपटाची संयत-शांत मांडणी खटकू  शकते. पण त्यामुळेच हा चित्रपट वेगळा ठरला आहे. स्त्री-पुरुष असमानता, व्यवस्थेतला भ्रष्टाचार, चांगल्या माणसांनाही विनाकारण हतबल करणारी परिस्थिती हे सगळं एका वेगळ्याच दृष्टीने दिग्दर्शक  दाखवत राहतो. संदीप आणि पिंकीची ही गोष्ट वरवरच्या दिखाऊ-भडक नाटय़ापलीकडल्या गोष्टींची अनुभूती देते.

संदीप और पिंकी फरार

दिग्दर्शक – दिबाकर बॅनर्जी

कलाकार – परिणीती चोप्रा, अर्जुन कपूर, रघुवीर यादव, नीना गुप्ता, जयदीप अहलावत.