सात महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर कलाकार, तंत्रज्ञानांची लगबग

मुंबई : सात महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर रुळावर आलेली हिंदी चित्रपटांच्या चित्रीकरणाची गाडी आता जोरात धावते आहे. दीपिका पदुकोण, अलिया भट्ट, सलमान खान, आमिर खानपासून अर्जुन कपूर, आयुष्मान खुराणा, तापसी पन्नू, राजकु मार राव असे सगळेच कलाकार देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी चित्रीकरणात व्यग्र झाले आहेत.

करोनाचा धोका अद्याप पूर्णत: टळलेला नसल्याने मुंबईसह काही महत्त्वाच्या ठिकाणी चित्रीकरण करताना   अनेक र्निबध अजून कायम आहेत. त्यामुळे बऱ्याचशा चित्रपटांचे चित्रीकरण हे मुंबईबाहेर दिल्ली, चंडीगड, हिमाचल प्रदेश, लखनौ अशा वेगवेगळ्या राज्यांत सुरू झाले आहे. तर मुंबईत दोन-तीन मोठय़ा चित्रपटांबरोबर वेबमालिकांच्या चित्रीकरणाचे प्रमाण जास्त आहे.

मुंबईत गोरेगाव येथील चित्रनगरीत प्रामुख्याने हिंदी चित्रपटांचे सेट्स पाहायला मिळतात. टाळेबंदीपूर्वी चित्रनगरीत अलिया भट्टची मुख्य भूमिका असलेल्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होणार होते. मात्र त्यानंतर आलेली बंदी आणि पावसाचा मारा यामुळे हाही सेट चित्रनगरीतून बाहेर पडला. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण मालवणी भागात सुरू आहे. याशिवाय, अक्षयकु मारची मुख्य भूमिका असलेल्या यशराज प्रॉडक्शनच्या बहुचर्चित ‘पृथ्वीराज’ या चित्रपटाचे चित्रीकरणही यशराज स्टुडिओत सुरू झाले आहे. याही चित्रपटाच्या सेटचे बरेच नुकसान झाल्याने यशराज प्रॉडक्शनला हा सेट खर्चून नव्याने उभारावा लागला. यशराजच्या आणखीही काही चित्रपटांचे चित्रीकरण लवकरच मुंबईत सुरू होईल, मात्र सध्या अनेक छोटय़ा-मोठय़ा हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण मुंबईबाहेर सुरू असल्याची माहिती ‘फे डरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’चे अध्यक्ष बी. एन. तिवारी यांनी दिली.

सलमान खानच्या ‘राधे : द मोस्ट वॉण्टेड भाई’ या चित्रपटाचे अर्धवट राहिलेले चित्रीकरण कर्जतमध्ये त्याच्या फार्म हाऊस आणि जवळच्या परिसरात पूर्ण करण्यात आले. सिद्धार्थ मल्होत्राची मुख्य भूमिका असलेल्या ‘शमशेरा’ चित्रपटाचेही राहिलेले चित्रीकरण मुंबईतच स्टुडिओत पूर्ण करण्यात आले. मुंबईबाहेर मात्र मोठय़ा प्रमाणावर चित्रीकरण सुरू झाले आहे. दीपिका पदुकोण गोव्यात शकु न बात्रा दिग्दर्शित चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. चंडीगडमध्ये दोन चित्रपटांचे चित्रीकरण सुरू आहे. अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘चंदीगढ करे आशिकी’ या चित्रपटासह राजकु मार राव-क्रिती सननची मुख्य भूमिका असलेल्या अभिषेक जैन दिग्दर्शित चित्रपटाचे चित्रीकरण चंडीगडमध्ये सुरू आहे. ‘चंदीगढ करे आशिकी’ या चित्रपटात आयुष्मान खुराणा-वाणी कपूर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या ‘हंगामा २’चे चित्रीकरण हिमाचल प्रदेशमध्ये सुरू आहे. शिल्पा शेट्टी, मीझान, परेश रावल यांच्या यात महत्त्वाच्या भूमिका आहेत. अभिनेत्री विद्या बालननेही मध्य प्रदेशमध्ये ‘शेरनी’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू के ले आहे. जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते २’चे चित्रीकरण लखनौमध्ये, तर एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’चे चित्रीकरणही हैदराबादमध्ये सुरू झाले असून अलिया भट्ट लवकरच तिथे रवाना होणार आहे. आमिर खानच्या ‘लालसिंह चढ्ढा’चे दिल्लीतील चित्रीकरण पूर्ण झाले आहे. शाहरूख खान, अजय देवगण, सैफ अली खान हे मात्र आणखी थोडे दिवस थांबून या वर्षांअखेरीस चित्रीकरणाला सुरुवात करणार असल्याचे सांगितले जाते.

मुंबईत १५ टक्केच चित्रीकरण

मुंबईत सध्या ज्या चित्रपटांचे काही भागाचे चित्रीकरण बाकी आहे, अशांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.  अजूनही १५ ते २० टक्के च चित्रीकरण सुरू असल्याची माहिती ट्रेड विश्लेषक अतुल मोहन यांनी दिली.