रात्रीच्या अंधारात आकाशातून उडत अलगद हातात यावा असा तो ‘चिट्टा’. तो येतो कुठून, नेमक्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचतो कसा आणि कोणकोणत्या रूपाने याचा विचार करायला उसंतही मिळू नये आणि शोधू म्हटलं तर त्याचा मागमूसही लागू नये इतक्या शांतपणे पांढऱ्या नशेचा तो धूर पंजाबमधील एक पिढी गिळंकृत करतो आहे. एरवी वर्तमानपत्रांमधून पोलिसांनी इतके किलो ड्रग्ज जप्त केले, अमुक एका ड्रगमाफि याला नेस्तनाबूत केले या बातम्या वाचताना त्याच्यामागे दडलेल्या विनाशवाटांची जाणीव आपल्या गावीही नसते. हळहळून किंवा परिस्थितीबद्दल चुकचुक करून दुर्लक्ष करण्याजोगा वेळही आपल्या हातात न देता पंजाबमधील तरुण पिढी पूर्णपणे या धुरात नाहीशी होते आहे. नशेच्या विनाशवाटांवरून भविष्याचा एक काळ गोठताना हताशपणे पाहणारी एक गर्दी आणि आपला विनाश आपणच ओढवून घेतला आहे. समोरचा इच्छा असूनही आपल्याला वाचवू शकत नाही ही जाणीव हुंदक्यात लपवून रडणारी कोवळी पिढी.. नशेच्या धुरात दाटलेल्या या विनाशवेळांची सणसणीत जाणीव करून देण्याचा प्रयत्न दिग्दर्शक अभिषेक चौबेने केला आहे.
‘उडता पंजाब’ या नावामागची उकल सुरुवातीच्या काही सेकंदात प्रेक्षकांना होते आणि त्यांच्यासमोर पहिल्यांदा येतो तो या पांढऱ्या चिट्टाच्या नशेत खरोखरच कल्पनेच्या जगात उडणारा, या नशेला स्वातंत्र्याचं प्रतीक मानून आपल्या गाण्यांतून तरुण पिढीसमोर जाहीरपणे आदर्श निर्माण करणारा टॉमी (शाहीद कपूर) आपल्याला दिसतो. आकाशातून पडलेलं ते पाकीट नेमकं कशाचं आहे हे कळत नाही पण पंजाबमध्ये मजूर म्हणून आलेल्या बिहारी तरुणीला (अलिया भट्ट) त्याची किंमत मोठी आहे हे कळतं. आणि ती त्या अमली पदार्थाला उराशी धरते. अमली पदार्थाच्या या झपाझप विळख्याला ज्यांनी रोख लावायला हवा ते पंजाब पोलीस नाक्यावर तपासणीचा मिळणारा १० दहा हजार रुपये भत्ता गोळा करत सरताजच्या (दिलजीत दोसेन) रूपाने आला दिवस साजरा करताना दिसतात. भत्त्याच्या रूपाने वाचवलेली नशेची अडवणूक थेट सरताजच्या दारात त्याच्या छोटय़ा भावापर्यंत पोहोचते तेव्हा तो गोंधळतो. पण त्याला भानावर आणण्याचं काम डॉक्टर प्रीतीला (करीना कपूर) जाणीवपूर्वक करावं लागतं आहे. नशेच्या आहारी गेलेल्यांना त्यातून सोडवण्यासाठी काम करणारी प्रीती खऱ्या अर्थाने सरताजला परिस्थितीची जाणीव करून देते. मात्र पैशासाठी नशेचा प्रवाह घराघरात सोडणारा नेमका नळ कोणाच्या घरात आहे? प्रशासकीय, राजकीय व्यवस्थेने अमली पदार्थाचा हा प्रवाहो इतक्या बेमालूमपणे सरकारी व्यवस्थेत घुसवला आहे की त्याची उकल सामान्यांसाठी कठीण आहे. अशा परिस्थितीत टॉमी, बिहारी तरुणी, सरताज आणि प्रीती या चौघांच्या माध्यमातून या दुष्टचक्राचे वास्तव चित्रण दिग्दर्शकाने केले आहे.
मुळात या चित्रपटावर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप का घेतला असा प्रश्न पडतो. चित्रपटात पंजाबी भाषाच प्रामुख्याने वापरण्यात आली आहे. त्यांच्या तोंडी येणाऱ्या शिव्या हाही त्यांच्या रोजच्या जगण्याचा भाग आहेत. सुरुवातीपासूनच विषयाशी प्रामाणिक असलेला हा चित्रपट मध्यंतरात थोडा रेंगाळल्यासारखा वाटतो. मात्र या चित्रपटातून केवळ पैशापोटी लोकांना अंमली पदार्थाच्या विळख्यात ढकलणाऱ्या राजकीय सत्तेचा चेहरा दिग्दर्शकाने लोकांसमोर आणला आहे. आपल्या घरात काय चाललं आहे याची तसदीही न घेता केवळ पैशामागे पळणारी सरताज आणि त्याच्या घरच्यांसारखी मंडळी आहेत. नशेत हरवलेल्यांना आपण काय करतो आहोत याची शुद्धही राहत नाही. टॉमीला वास्तवाचे भान आणून देणारा प्रसंग दिग्दर्शकाने उत्तम साधला आहे. शाहीद कपूरनेही टॉमीला आपल्या पद्धतीने रॉकस्टार म्हणून उभं केलं आहे. या चित्रपटात खऱ्या अर्थाने कमाल केली आहे ती अलिया भट्टने. बिहारी संवादाचा लेहजा तिला अचूक जमलेला नाही पण एका चुकीमुळे तिच्यात घुसलेले नशेचं विष तिचं जीवन उद्ध्वस्त करतं. मोडेपर्यंत संकटं येतात तरी ज्या जिद्दीने ती ते विष काढून फेकून देण्याचा प्रयत्न करते तो अलियाने अफलातून रंगवला आहे. दिलजीत दोसेन हा पंजाबी कलाकारही सरताजच्या भूमिकेत भाव खाऊन जातो. त्याला प्रीतीच्या भूमिकेत करीनाची उत्तम साथ मिळाली आहे. मात्र शेवट करताना काही प्रसंग मुद्दाम घडवून आणले असावेत इतके अतिरेकी वाटतात. चित्रपटातला प्रतीकात्मक हुंदका आपल्याला विचार करायला लावतो. एकुणात विषयाशी प्रामाणिक राहत या विनाशवेळांची अस्वस्थ जाणीव करून देणारा ‘उडता पंजाब’ हा अभिषेक चौबेचा दिग्दर्शक म्हणून ‘इश्किया’ आणि ‘देढ इश्किया’ नंतरचा तिसरा चित्रपट असला तरी त्याची दिग्दर्शनाची वास्तव शैली अपेक्षित परिणाम साधून जाते.
उडता पंजाब
निर्माता – बालाजी मोशन पिक्चर्स, फँ टम फिल्म्स
दिग्दर्शक – अभिषेक चौबे
कलाकार – शाहीद कपूर, अलिया भट्ट, दिलजीत दोसेन, करीना कपूर, सतीश कौशिक