नायिकाप्रधान चित्रपटांचा टक्का वाढला आहे हे गेले दोन वर्षे ठणकावून सांगता येईल इतक्या सातत्याने घडतंय. यावर्षी तर एकाच दिवशी शुक्रवारी बॉक्सऑफिसवर नायिकाच आमनेसामने लढतायेत हेही चित्र पाहायला मिळालं. तेच चित्र कॅमेऱ्यामागच्या नायिकांबाबत म्हणता येईल का? या शुक्रवारी दोन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. इरफान खान आणि मल्याळम अभिनेत्री पार्वती यांची मुख्य भूमिका असलेला ‘करीब करीब सिंगल’ हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. आणि त्याच्या जोडीला राजकुमार राव आणि क्रिती खरबंदा यांचा ‘शादी मे जरूर आना’ हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. या दोन्ही चित्रपटांचं वैशिष्टय़ म्हणजे या चित्रपटांच्या निमित्ताने दोन दिग्दर्शिकांच्या चित्रपटांमध्ये बॉक्सऑफिसचा खेळ रंगणार आहे. केवळ याच शुक्रवारी नाही तर गेले काही महिने सातत्याने महिला दिग्दर्शकांचे नवे-जुने चेहरे वेगवेगळ्या चित्रपटांच्या माध्यमांतून समोर येत आहेत. सतत दिसणाऱ्या या चेहऱ्यांमुळे महिला दिग्दर्शिकांचे प्रमाण वाढलेय, असा तर्क सहजी लागू शकतो. पण या दिग्दर्शिकांच्या कामात अजूनही सातत्य नसल्याची तक्रार खुद्द अलंकृता श्रीवास्तवसारख्या दिग्दर्शिके कडून होते आहे. त्यामुळे हे वाढते प्रमाण सातत्याने दिसले पाहिजे, असा सूर इंडस्ट्रीत विश्वासाने पाऊल टाकलेल्या या नव्या विचारांच्या दिग्दर्शिकांकडून लावला जातो आहे.

बॉलीवूडमध्ये महिला दिग्दर्शकांचे प्रमाण हाताच्या बोटांवर मोजण्याइतके आहे. मीरा नायर, दीपा मेहता, गुरिंदर चढ्ढा, अपर्णा सेन ही नावं गेली अनेक वर्ष हिंदीच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला दबदबा टिकवून आहेत. पण हेच चित्र बॉलीवूडमध्ये येणाऱ्या दिग्दर्शिकांच्या बाबतीतही खरं आहे असं म्हणता येत नाही. फराह खान, झोया अख्तर, गौरी शिंदे यांनी व्यावसायिक चित्रपटसृष्टीत आपलं स्थान बळकट केलं असलं तरी महिला दिग्दर्शकांचे प्रमाण अजूनही कमीच आहे हे वास्तव पचवले पाहिजे. कारण ज्या दिग्दर्शिकांनी इथे नाव कमावलं आहे त्यांचा एक चित्रपट आल्यानंतर दुसरा चित्रपट येईपर्यंत खूप वेळ जातो. त्यामागे अनेक कारणं आहेत, पण या गॅपमुळेच महिला दिग्दर्शकांच्या चित्रपटांमध्ये सातत्य राहत नाही, अशी खंत श्रीवास्तव यांनी व्यक्त केली आहे. ज्यात तथ्यही आहे. ‘करीब करीब सिंगल’ चित्रपटाचं उदाहरणच यासाठी बोलकं ठरावं. या चित्रपटाची दिग्दर्शिका तनुजा चंद्रा यांचं नाव ऐकल्यानंतर अनेकांचे कान टवकारतात. कारण हे नाव त्यांनी कुठेतरी ऐकलेलं असतं. काजोलची दुहेरी भूमिका आणि आशुतोष राणाने साकारलेला मनोविकृ त तरुण.. ‘दुश्मन’ची कथा आणि त्याची मांडणी पूर्ण वेगळी होती. पाठोपाठ आलेला ‘संघर्ष’ही तितकाच यशस्वी ठरला. ‘सूर’ हा लकी अलीची मुख्य भूमिका असलेला तनुजा चंद्रा दिग्दर्शित चित्रपटही गाजला होता. मात्र २००८ नंतर ‘करीब करीब सिंगल’ येण्यासाठी मधली नऊ वर्ष गेली आहेत. हीच गोष्ट गेल्यावर्षी बॉक्सऑफिस आणि सेन्सॉर दोघांनाही हादरवणाऱ्या ‘पाच्र्ड’ चित्रपटाच्या दिग्दर्शिका लीना यादव यांच्याबाबतही म्हणता येईल. लीना यादव यांचा ‘शब्द’ २००५ साली प्रदर्शित झाला होता. त्यानंतर २०१० मध्ये ‘तीन पत्ती’ आणि २०१६ मध्ये ‘पाच्र्ड’ प्रदर्शित झाला आहे. दिग्दर्शनापेक्षा लेखन, पटकथा लेखन आणि साहाय्यक दिग्दर्शन करणाऱ्यांचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. २००६ साली ‘हनीमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड’सारखा हलकाफुलका आणि आधुनिक काळातील पिढीचे चित्रण करणारा चित्रपट देणाऱ्या रीमा कागती यांनी २०१२ मध्ये आमिर खान आणि करीना कपूरला घेऊन ‘तलाश’ केला. त्यानंतर पुन्हा सहा वर्षांनी रीमा कागती अक्षय कुमारला घेऊन ‘गोल्ड’ चित्रपट दिग्दर्शित करतेय. हॉकीपटू बलबीर सिंग यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘गोल्ड’ हा त्यांचा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.

बॉलीवूड असो वा हॉलीवूड दोन्हीक डे पुरुषप्रधान संस्कृ तीच असल्याने अजूनही महिला दिग्दर्शकांवर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे त्यांना सातत्याने निर्माता, वितरक मिळण्यात अडचणी येतात. पण त्या तुलनेत निदान बॉलीवूडमध्ये अनेक नव्या दिग्दर्शिकांचे चेहरे पाहायला मिळतायेत हेही सुखदायक चित्र असल्याचे मत ‘द हंग्री’ या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेल्या दिग्दर्शिका बोर्निला चॅटर्जीचे म्हणणे आहे. ‘द हंग्री’ हा चित्रपट टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चांगलाच गाजला. सप्टेंबरमध्ये हा चित्रपट रीतसर देशभरात प्रदर्शित होणार होता. मात्र सध्या त्याचे प्रदर्शन डिसेंबपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. महिला दिग्दर्शकांचे चित्रपट आहेत हे समजल्यानंतर ते फक्त स्त्रियांच्या समस्यांपुरतीच मर्यादित असतील, असा अर्थ अनेकदा काढला जातो. म्हणूनच सेन्सॉर बोर्डाकडून अलंकृता श्रीवास्तव यांचा ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ हा चित्रपट ‘लेडीज ओरिएंटेड’ असा शिक्का मारत नाकारला गेला. याच वृत्तीमुळे चित्रपट निर्मितीसाठी अर्थसाहाय्य न मिळणे, चित्रपटाला प्राइम शोज न मिळणे असे प्रकार होतात. त्याचा परिणाम अर्थातच चित्रपटाच्या व्यवसायावर होतो. त्यामुळे साहजिकच दुसऱ्या चित्रपटासाठी जमवाजमव होईपर्यंत अनेकजणींची दमछाक होते, असे मत अलंकृता श्रीवास्तव यांनी ‘मामि’च्या व्यासपीठावरून मांडले होते. महिला दिग्दर्शिकांचे चित्रपट, विषय-मांडणी सगळ्याक डे पाहण्याचा दृष्टिकोन अजूनही संकुचित असल्याने समस्यांचा आकडा मोठा आणि गुंतागुंतीचा आहे. पर्यायाने पुन्हा एकदा ही जबाबदारी प्रेक्षकांकडे येत असल्याचे त्या म्हणतात. जोपर्यंत प्रेक्षक या चित्रपटांना प्रतिसाद देत नाहीत तोवर निर्मात्यांचा दृष्टिकोन बदलणार नाही, असे त्यांनी सांगितले. या पाश्र्वभूमीवर निदान गेल्या दोन वर्षांत महिला दिग्दर्शकांच्या चित्रपटांना बॉक्सऑफिसवर मिळालेल्या यशाची टक्केवारी सुखावह आहे. २०१६ मध्ये ८२ चित्रपटांपैकी १० चित्रपट हे महिला दिग्दर्शिकांचे आहेत. २०१५ मध्ये हा आकडा अवघा चार चित्रपटांचा होता. मात्र गेल्यावर्षीपासून अनेक दिग्दर्शिकांचे चित्रपट व्यावसायिकरीत्या प्रदर्शित असून टक्केवारीचा हा आलेख चढता असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले आहे. या यशामुळे सातत्याने नवनवीन दिग्दर्शिकांचे चित्रपट चित्रपटगृहांमधून झळकतायेत. त्यांना निर्माते मिळतायेत. गेल्याच आठवडय़ात प्रदर्शित झालेल्या ‘रिबन’ या चित्रपटाचे दिग्दर्शन राखी शांडिल्य यांनी केले आहे. ‘शादी मे  जरूर आना’च्या निमित्ताने रत्ना सिन्हा हे नाव समोर आलं आहे. अश्विनी अय्यर तिवारी यांनी गेल्यावर्षी ‘नील बटे सन्नाटा’ने सुरुवात केली. त्यानंतर एक दाक्षिणात्य चित्रपट पूर्ण करत यावेळी ‘बरेली की बर्फी’सारखा वेगळा प्रयोग त्यांनी केला. ज्याला प्रेक्षकांनीही डोक्यावर घेतलं. ‘बार बार देखो’ची दिग्दर्शिका नित्या मेहरा, ‘आयेशा’ची दिग्दर्शिका राजश्री ओझा, ‘मार्गारिटा विथ स्ट्रॉ’ फेम सोनाली बोस या नव्या चेहऱ्यांबरोबरच गौरी शिंदे, मेघना गुलजार, अभिनेत्री ते दिग्दर्शन असा प्रवास करणारी कोंकणा सेन शर्मा, झोया अख्तर असे अनेक जुने चेहरेही सध्या व्यावसायिक चित्रपटांच्या चौकटीत राहूनही आपल्याला हवं ते सांगण्याचा प्रयत्न आपल्या चित्रपटांतून करतायेत. या सगळ्या प्रयत्नांमुळे कमी टक्केवारीचे हे दुष्टचक्र लवकरच भेदले जाईल, अशी आशा निर्माण झाली आहे.