उत्तर सिक्कीमच्या नाकु ला मध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाली. दोन्ही देशाचे सैनिक परस्परांना भिडले. या घटनेवरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षावर पंतप्रधान मोदींनी बाळगलेल्या मौनावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मागच्या अनेक महिन्यात पंतप्रधान मोदींनी चीन हा शब्द उच्चारलेला नाही. त्याचवेळी चीन भारतीय हद्दीत आपला विस्तार करत आहे असे राहुल यांनी म्हटले आहे.

“चीन भारतीय हद्दीत आपला विस्तार करत चालला आहे, पण मिस्टर ५६ यांनी गेल्या काही महिन्यात एकदाही चीन हा शब्द उच्चारलेला नाही. कदाचित आता ते चीन शब्द बोलायला लागतील” असे राहुल गांधी यांनी आपल्या  टि्वटमध्ये  म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताची अर्थव्यवस्था उद्धवस्त केलीय, त्यामुळे चीनमध्ये आज हिम्मत आली आहे असे राहुल गांधी यापूर्वी म्हणाले होते.

आणखी वाचा- भारतीय सैन्याने सिक्कीममध्ये चीनला शिकवला धडा, PLA चे २० सैनिक जखमी

सिक्कीममध्ये काय घडलं ?
पूर्व लडाख सीमेजवळ चीनच्या सैनिकांनी अतिक्रमण केलेले असतानाच आता सिक्कीमध्ये सुद्धा चीनच्या सैनिकांनी अतिक्रमणाचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. सतर्क असलेल्या भारतीय सैन्याने चीनचा अतिक्रमणाचा हा डाव उधळून लावला आहे. इंडियाने टुडेने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

मागच्या आठवडयात चीनच्या सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला पण भारतीय सैनिकांनी त्यांना आव्हान दिले. उत्तर सिक्कीमच्या नाकु ला येथे ही घटना घडली. भारताच्या जवानांनी पीएलएच्या सैनिकांना रोखल्यानंतर जोरदार हाणामारी झाली. सिक्कीमच्या नाकु ला येथे झालेल्या या घटनेमध्ये २० चिनी सैनिक जखमी झाले आहेत.