चित्रपटसृष्टी म्हणजे अनिश्चिततेचं एक न उमगणारं समीकरण असं अनेकजण म्हणतात ते खरंच आहे. इथे कधी कोणता चित्रपट, कोणता कलाकार प्रसिद्ध होईल आणि त्यामागची काय कारणं असतील याचा काहीच नेम नसतो. पण, या सर्व परिस्थितीला समजून घेत त्या अनुषंगानेच काही कलाकार मंडळी या कलाविश्वात निर्धास्तपणे वावरत असतात. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेता आमिर खान. प्रत्येक गोष्टीमधील बारकावे आणि खाचखळगे जाणत पुढची चाल करणारा आमिर ‘परफेक्शनिस्ट’ या नावानेही ओळखला जातो. चित्रपटाची निवड करण्यापासून ते अगदी त्याच्या नफ्यामध्ये असणाऱ्या भागीदारीत सर्व गोष्टींमध्ये त्याचा हा परफेक्टपणा दिसून येतो. अशा या आमिरने चित्रपटसृष्टीत ३० वर्षे गाजवली आणि अजूनही गाजवत आहे. मुख्य म्हणजे या सर्व गणितामध्ये आमिर स्वत:च्या चित्रपटांसाठी कोणतेही मानधन आकारत नाही.

स्वत:चे म्हणजेच त्याच्या निर्मिती संस्थेअंतर्गत साकारणाऱ्या चित्रपटांसाठी आमिर एक अभिनेता म्हणून कोणतेही मानधन आकारत नसल्याचं त्याने एका पत्रकार परिषदेत सांगितलं. कलाकारांनी त्यांच्या मानधनात कपात करण्यासंबंधीचा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. याच प्रश्नाचं उत्तर देत आमिर म्हणाला, ‘मी चित्रपटासाठी मानधन घेत नाही. कित्येक वर्षांपासून माझ्या चित्रपटांसाठी मी मानधनच घेत नाहीये. जर माझ्या चित्रपटाने कमी कमाई केली, तर माझ्या वाट्याला कमी पैसे येणार आणि जर माझ्या चित्रपटाने जास्त कमाई केली, तर माझ्या वाट्याला जास्त पैसे येणार’, हे असं अगदी सोपं गणित त्याने समजावून सांगितलं.

Photos : याड लावणारा पडद्यामागील ‘सैराट’

मुख्य म्हणजे आमिर चित्रपट निर्मिती क्षेत्रातही सक्रिय असल्यामुळे एक अभिनेता म्हणून तो मानधन आकारत नसला तरीही निर्माता म्हणून मात्र चित्रपटाच्या नफा आणि तोट्यात त्याचाहा भाग असतो हे तितकंच खरं. त्यामुळे निर्मिती खर्च, निर्मिती संस्था आणि चित्रपटाच्या नफा, तोट्याची गणित आमिरने खऱ्या अर्थाने समजून घेतली आहेत असं म्हणायला हरकत नाही. आमिर सध्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे.