– सुहास जोशी

ही सरळसाधी गोष्ट नाही. पण तसं पाहिले तर ही प्रस्थापित भांडवलदारांचे जोखड उलथवून टाकण्याचा प्रयत्नांची गोष्ट आहे असेदेखील म्हणता येईल असा आशय त्यात दडलेला आहे. पण ती त्या पद्धतीने थेट कधीच उलगडत नाही. कारण गोष्ट सांगण्याची पद्धत सरधोपट नाही. या गोष्टीचा सूत्रधार म्हटले तर थेट तुमच्या समोरच वावरत असतो, पण तोच सूत्रधार आहे याची खात्री तुम्हाला असतेच असे होत नाही. दिग्दर्शक कधी थेट काहीतरी सांगतो आणि कधी कधी निव्वळ सूचकपणे काही तरी दाखवतो देखील. कधी ही गोष्ट भूतकाळात असते तर कधी भविष्यकाळात, पण तिचे परिणाम दिसतात ते वर्तमानकाळात. हे सारं वाचून कोणालाही वाटेल की हे खूप काहीतरी किचकट वगैरे प्रकरण आहे. पण पडद्यावर पाहताना ते अजिबातच किचकट नसते. किंबहुना दिग्दर्शक त्याच्या अनोख्या मांडणीशैलीतून तुम्हाला एका वेगळ्या विश्वात घेऊ न जात असतो. आणि हेच या सिरिजचे वैशिष्टय़ आहे. सॅम इस्माइल लिखित, दिग्दर्शित ‘मि. रोबो’ या सिरिजचे आत्तापर्यंत तीन सिझन प्रदर्शित झाले आहेत. त्यातील पहिल्या सिझनमधील सुरुवातीच्या काही भागांमध्ये तुम्ही बहुतांशपणे वर उल्लेखलेल्या मानसिकतेत असतात. तरीदेखील तुम्ही ते सारं मन लावून पाहू शकता, त्याचे कारण म्हणजे तुम्ही हे सारं पाहताना तुम्ही स्वत:च त्या कथानकात गुंतून जाता. प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छांना तो वाव देतोच, पण त्याची दुसरी बाजूदेखील दाखवत असतो.

ही सिरिज बेतली आहे ती एलिएट या संगणक अभियंत्यावर. एलिएट हा ‘ऑलसेफ’ या सायबर सुरक्षा पुरवणाऱ्या कंपनीत काम करत असतो. ही कंपनी ‘एल कॉर्प’ या बलाढय़ अशा बहुराष्ट्रीय कंपनीला सायबर सुरक्षा पुरवत असते. ‘एल कॉर्प’ इतकी बलाढय़ असते की अमेरिकेतील बहुतांश नागरिकांच्या जगण्याशी तिचा पदोपदी संबंध येत असतो. एलिएट हा तसा कोणाच्या अध्यातमध्यात न पडणारा कर्मचारी आणि कसलेही पाश नसलेला एकटा जीव. वडील त्याच कंपनीशी संबंधित एका प्रकल्पातील अपघातात मृत्युमुखी पडलेले. कालांतराने आईदेखील. काही प्रमाणात अमली पदार्थाचे सेवन करणारा एलिएट कामात मात्र अतिशय हुशार. तो संगणकाशी इतका जोडलेला असतो की कोणत्याही व्यक्तीला पाहिल्यावर प्रत्यक्ष व्यक्तीपेक्षा त्याला त्या व्यक्तीची संगणकीय ओळखच अधिक झालेली असते. कारण तो ‘ऑलसेफ’च्या कामाशिवाय इथिकल हॅकिंगशी जोडलेला असतो. त्यातून तो काही व्यक्तींना कायद्याच्या ताब्यातदेखील सोपवतो. ‘ऑलसेफ’मुळे एलिएट ‘एल कॉर्प’च्या ग्राहक जाळ्याशी अगदी थेट जोडलेला असतो. एका सायबर हल्ल्यातून तो कंपनीला खूप मोठय़ा धोक्यातून वाचवतो. पण त्याच वेळी त्याची भेट मि. रोबोशी होते आणि एका अनामिक अशा समूहाशी त्याचा संबंध येतो. हा समूह भांडवलवादी रचना उलथून टाकण्यासाठी सायबर हल्ल्याचा विचार करणारा असतो. या समूहाला साथ द्यायची की नाही या संभ्रमात एलिएट पुरता भंजाळून जातो. त्याच वेळी त्याची लहानपणीची मैत्रीण आणि जुनी सहकारी, त्याला अंमली पदार्थ पुरवणारी शेजारीण अशांच्या आयुष्यातदेखील अनेक गोष्टी घडत असतात. पण या नव्या अनामिक समूहाशी त्याची जवळीक वाढत जाते. भांडवलशाही व्यवस्था उलथवून टाकण्यासाठी हा समूह अतिशय आक्रमक असतो. सर्व ग्राहकांचा डेटा उडवून टाकायचा, सर्वाची कर्ज माफ करायची अशी त्यांची योजना असते. एफ सोसायटी या नावाने तो समाजात लोकप्रियदेखील होऊ  लागतो. पण त्याचवेळी एलिएटमध्ये एक द्वंद्व जन्माला येते.

हे द्वंद्वच खरे तर संपूर्ण कथानकाचा पाया आहे. एलिएट हा नेमका कोण आहे, त्याला हे सर्व काही करण्यास भाग पाडणारे घटक कोणते आहेत, ते प्रत्यक्षात आहेत की ते एलिएटच्याच मनोभूमिकेचा भाग आहेत अशा अनेक प्रश्नांमधून मालिका पुढे सरकत जाते. या साऱ्या द्वंद्वाची मांडणी करताना लेखकाने एलिएटच्या संपूर्ण आयुष्याचा ताबा घेतला आहे. त्याचं जगणं तो ज्या पद्धतीने मांडतो त्यातूनच एक अनामिक थरार सतत जाणवत राहतो. कथा पुढे सरकते तसे काही गोष्टी उलगडू लागतात पण केवळ त्या उलगडण्याने सारे प्रश्न सुटतात असे होत नाही. कारण तोपर्यंत वर्तमानकाळातील नायक आणखीन पुढे गेलेला असतो आणि त्यातून आणखीन नवीन प्रश्न निर्माण होत असतात.

कथानकाचा हा पायाच इतका भक्कम आहे की संगीत, संवाद, छायाचित्रीकरण वगैरे गोष्टी केवळ पूरक म्हणूनच उरतात. सारं श्रेय जाते ते लेखन, दिग्दर्शन आणि संकलनाला. थेट गोष्ट सांगायची नसते तेव्हा तुम्हाला नुसते फ्लॅशबॅक वगैरे वापरून फायदा नसतो, तर त्या जोडीला मांडणी महत्त्वाची ठरते. एक वातावरण तयार करायचे असते आणि त्यात प्रेक्षकाला खिळवून ठेवायचे असते. यामध्ये सिरिजकर्ता पूर्णपणे यशस्वी झाला आहे.

एरवी सरळसाधी गोष्ट, अभिनय, संवाद, छायाचित्रीकरण, स्पेशल इफेक्टस अशा माध्यमांतून प्रभावीपणे मांडण्याची आणि पाहण्याची आपल्याला सवय झालेली असते. अशा वेळी हे काही तरी वाकडेतिकडे वाटणारे; पण तरीदेखील गुंतवून ठेवणारे कथानक पाहायला सुरुवातीला जड वाटू शकते, पण एकदा त्यात शिरलात की मात्र तुम्ही त्यातच पुरते गुंतून जाऊ शकता हे निश्चित आणि हे गुंतणे हाच या कथानकाचा खरा उद्देश आहे.

  • मि. रोबो
  • ऑनलाइन अप – अमेझॉन प्राइम
  • सिझन पहिला