19 December 2018

News Flash

मुलांना घडवण्याची जबाबदारी पालकांची

हम पंछी एक डाल के’ या कार्यक्रमासाठी अभिनेत्री मृणाल देव नागपुरात आल्या असता पत्रकारांशी बोलत होत्या

बाल कलावंतासोबत अभिनेत्री मृणाल देव-कुळकर्णी.

मृणाल देव-कुळकर्णी यांचे मत

चित्रपटसृष्टीत किंवा मालिकांमध्ये अनेक नवीन कलावंत येतात. त्यांना झटपट प्रसिद्धी, पैसा मिळवायचा असतो. या क्षेत्रात प्रवेश करीत असताना आपल्या मुलांना कसे घडवले पाहिजे, याची जबाबदारी पालकांचीही असून त्यांनी वेळ द्यायला हवा, असे मत अभिनेत्री मृणाल देव-कुळकर्णी यांनी व्यक्त केले.

बालदिनाच्या निमित्ताने आई भवानी क्रिएशनच्यावतीने आयोजित ‘हम पंछी एक डाल के’ या कार्यक्रमासाठी अभिनेत्री मृणाल देव नागपुरात आल्या असता पत्रकारांशी बोलत होत्या. गेल्या २६ वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत असून काम करताना स्वतची चौकट ठरविली आहे. त्यामुळे बिनधास्तपणे वावरते. हॅशटॅग मीटू या समाज माध्यमावरील अभिनयामुळे महिला त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडत आहेत. ही अभिव्यक्तीच्या दृष्टीने चांगली घटना असली तरी त्याचा गैरवापर होण्याची अधिक शक्यता आहे. स्त्री व पुरुषांनी आपल्या सीमारेषा ठरवून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना अशा घटनांना सामोरे जावे लागणार नाही. चित्रपटाच्या प्रदर्शित होण्याच्या आधी त्यावर प्रतिक्रिया दिली जाते. मुळात चित्रपटाला चित्रपट म्हणून बघितले पाहिजे. पद्मावती चित्रपटातील वाद सुरू आहे. मात्र, तो चित्रपट बघितल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणे योग्य होईल. चित्रपट परीनिरीक्षण महामंडळाने पारित केलेल्या चित्रपटाला विरोध केला जातो, हे योग्य नाही, असे त्या म्हणाल्या.

दरम्यान, बालदिनाचे औचित्य साधून आई भवानी क्रिएशनच्यावतीने ‘हम पंछी एक डाल के’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी मृणाल देव यांनी सर्व बालक कलावंतांच्या कलागुणांचे कौतुक केले. कार्यक्रमाची संकल्पना शांभवी रांगणेकर यांची होती तर संगीत संयोजन अनुश्री रांगणेकर यांचे होते. सेबी जेम्स, सिया जेम्स, वीरा पारालकर, आद्या पोद्यार, सावी तेलंग, सानवी जहागिरदार, गार्गी सेनाड या बालकलाकारांनी सुरेल गीते सादर केली. कार्यक्रमाचे संयोजन मो. सलीम यांनी केले. संचालन सय्याद शिरीन यांनी केले.

First Published on November 15, 2017 4:12 am

Web Title: mrinal dev kulkarni attend event in nagpur on children day