‘मन फकीरा’ हा ‘रोमँटिक ड्रामा’ असलेला मराठी चित्रपट १४ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून अभिनेत्री मृण्मयी देशपांडे या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहे.

सिनेमाचा पहिला टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला असून सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन आदी कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ‘प्रेम.. आहे, नाही, बहुतेक, वगैरे..’ ही या सिनेमाची टॅगलाइन असून यात काय आशय असेल याचा हलका अंदाज प्रेक्षकांना आला आहे; परंतु टिझरमुळे चित्रपटाबाबतची उत्कंठा अधिकच ताणली गेली आहे.

लग्न, पूर्वायुष्यातलं प्रेम, संसार आणि संसारात येणारे ते दोघे आणि पुन्हा मग संसाराचे विस्कटलेपण असा आशय या टिझरमधून समोर आला आहे; पण चित्रपटात नेमके काय पाहायला मिळणार, हे मात्र ’व्हॅलेंटाइन डे’ला उलगडेल.

‘मन फकीरा’ या सिनेमात सुव्रत जोशी हा भूषण’ तर सायली संजीव ही रिया पात्रे साकारत आहेत. तर अंजली पाटील, अंकित मोहन या कलाकारांचादेखील समावेश असणार आहे. भूषण-रिया यांचे मराठमोळ्या ‘कांदापोहे’ पद्धतीने लग्न होते आणि त्यानंतर सगळे काही सुरळीत सुरू असताना एका रात्री दोघांचेही भूतकाळ समोर येतात. हे दोघे या सर्व गोष्टीला कसे सामोरे जातात; पण अशा वळणावर पुढे जाताना ते नेमका काय निर्णय घेतात हे पाहण्यासाठी मात्र चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहावी लागणार आहे.

या चित्रपटाविषयी मृण्मयी म्हणते, ‘‘मी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला हा पहिला सिनेमा आहे. त्यामुळे निश्चितच प्रचंड उत्सुकता आहे. आजपर्यंत एक अभिनेत्री म्हणून मला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं, ते आताही मिळेल अशी आशा आहे.’’ पप्रेल बुल इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड आणि स्मिता फिल्म प्रॉडक्शन्स यांची प्रस्तुती असलेला ‘मन फकीरा’ या चित्रपटाची निर्मिती एस. एन. प्रॉडक्शन्स आणि स्मिता विनय गानु, नितीन प्रकाश वैद्य, ओम प्रकाश भट्ट, सुजय शंकरवार, किशोर पटेल यांनी केली असून चित्रपटाची सहनिर्मिती तृप्ती कुलकर्णी आणि प्रणव चतुर्वेदी यांची आहे.