News Flash

मृण्मयी देशपांडे ‘फर्जंद’मध्ये साकारणार हेरगिरीची भूमिका

मृण्मयी सुंदर आहे, तसेच दर्जेदार अभिनेत्री आणि नर्तिकाही आहे, पण या सिनेमात तिचा लढवय्या बाणा पाहायला मिळणार आहे.

मृण्मयी देशपांडे

कोणत्याही भूमिकेला योग्य न्याय देण्याचं कसब अंगी असलेल्या अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने आजवर बऱ्याच अवघड भूमिकाही अगदी सोप्या पद्धतीने सादर करीत रसिकांची मनं जिंकली आहेत. मृण्मयी आता लेखक- दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘फर्जंद’ या आगामी सिनेमात एका कलावंतीणीच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘स्वामी समर्थ मुव्हीज क्रिएशन एलएलपी’ ची प्रस्तुती आणि अनिरबान सरकार यांची निर्मिती असलेला ‘फर्जंद’ १ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘फर्जंद’ची सहनिर्मिती संदिप जाधव, महेश जाऊरकर आणि स्वप्निल पोतदार यांनी केली आहे.

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने ‘फर्जंद’ या आपल्या महत्त्वाकांक्षी सिनेमात स्वराज्यासाठी खारीचा वाटा उचलणाऱ्या शिवरायांच्या लहानात लहान सैनिकालाही प्रकाशझोतात आणलं आहे. कोंडाजी फर्जंदवर आधारित असलेल्या ‘फर्जंद’ चित्रपटामध्ये मृण्मयीने स्वराज्यासाठी कार्य करणाऱ्या अशाच एका छुप्या सैनिकाची भूमिका साकारली आहे. या सिनेमात मृण्मयीने केसर नावाच्या एका कलावंतीणीची भूमिका साकारली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी हेरगिरी करणाऱ्या गुप्तहेर बहिर्जी नाईक यांच्यापर्यंत शत्रूंची खबरबात पोहोचवण्याचं काम केसर करीत असते.

दिग्पाल आणि मृण्मयी तसे कॉलेजपासूनचे मित्र आहेत. दोघांनी बऱ्याचदा एकांकिकांच्या निमित्ताने एकत्र कामही केलं आहे. त्यामुळे ‘फर्जंद’मध्ये केसरच्या भूमिकेसाठी दिग्पालच्या मनात केसरच्या भूमिकेसाठी जेव्हा मृण्मयीचा विचार आला, तेव्हा त्याने तिला याबाबत सांगितलं. स्वराज्यासाठी हेरगिरी करतानाच ही केसर ‘हनी ट्रॅप’चं काम करत बहिर्जींना मदत करते, असं दिग्पालने जेव्हा मृण्मयीला सांगितलं, तेव्हा तिने अक्षरश: उडीच मारली. या सिनेमासाठी मृण्मयीने १५ दिवस दररोज चार तास तलवारबाजीचा सराव केला.

मृण्मयी सुंदर आहे, तसेच दर्जेदार अभिनेत्री आणि नर्तिकाही आहे, पण या सिनेमात तिचा लढवय्या बाणा पाहायला मिळणार आहे. सिनेमाच्या शेवटी तिच्यावर खूप छान फाईट सिक्वेन्स चित्रीत करण्यात आले आहेत. याशिवाय दिग्पालने या सिनेमात मृण्मयीवर भालजी पेंढारकरांच्या शैलीतील ‘राखू द्या ना मर्जी स्वारीची…’ ही घरंदाज लावणीही चित्रीत केली आहे. क्षितीज पटवर्धन यांनी लिहिलेली ही बहारदार लावणी वैशाली सामंतने गायली असून संगीतकार अमितराजने संगीतबद्ध केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 4:07 pm

Web Title: mrunmayee deshpande will play detective kesar in marathi movie farzand
Next Stories
1 Video: थक्क करणारा ‘ब्ल्यू प्लॅनेट II’ चा ट्रेलर प्रदर्शित
2 ‘स्टुडंट ऑफ द इयर २’मध्ये नव्या- जुन्या स्टुडंट्सचं गेट-टुगेदर?
3 अमिताभ बच्चन यांच्यामुळेच माझ्यासारख्यांना काम मिळतंय- ऋषी कपूर
Just Now!
X