महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारीत ‘एमएस धोनीः दि अनटोल्ड स्टोरी’चे प्रदर्शन जस जसे जवळ येत आहे तसे या सिनेमाचे प्रमोशन अधिक जोर लावून करण्यात येत आहे. याचा सिनेमाला किती फायदा होईल हे आत्ताच सांगणे थोडे मुश्किल आहे पण या प्रमोशनमुळे धोनीचे फॅन्स मात्र नक्कीच खूष होतील यात काही शंका नाही. या सिनेमाचा अजून एक टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यात धोनी एक शानदार फटकार मारताना दिसत आहे. पण तो बॅटला कॅमऱ्याच्या समोर आणतो तेव्हा धोनीऐवजी तिथे सुशांतसिंग राजपूत तोच फटकार मारताना दिसतो. पहिल्यांदा हा व्हिडिओ मॉफिंग केलेला वाटतो पण तंत्रज्ञानाचा सर्वोत्तम वापर करत या दोन शॉट्सना जोडले आहे. यात फक्त माहीचा चेहराच बदलतो असे नाही तर त्याचे पूर्ण शरीरही बदलते. हा व्हिडिओ इतक्या चांगल्या प्रकारे संकलित केला आहे की नीट लक्ष दिले तरच या बारिक गोष्टींकडे लक्ष जाते.

नीरज पांडे दिग्दर्शित हा सिनेमा ३० सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. नीरजने या सिनेमात धोनी न घेण्याच्या त्याच्या निर्णयाचाही यावेळी खुलासा केला. शिवाय नीरजचा आवडता अभिनेता अक्षय कुमारला या सिनेमात घेणे का शक्य नव्हते याबद्दलही बोलताना तो म्हणाला की, धोनीची १६ ते १७ वर्षांची युवा खेळाडूची व्यक्तिरेखा साकारणे अक्षयला शक्य नव्हते. यामुळे त्याला ‘एमएस धोनी’ सिनेमात घेतले नाही असे स्पष्टिकरण त्याने यावेळी दिले.

सिनेमाची निर्मिती फॉक्स स्टार स्टुडियोच्या बॅनर अंतर्गत झाली आहे. नीरज पांडे याच्या दिग्दर्शनात बनलेल्या या सिनेमात कियारा आडवाणीने धोनीच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. तर दिशा पटानीने धोनीची पूर्व प्रेमिकाची व्यक्तिरेखा साकारली आहे. ‘एमएस धोनीः दि अनटोल्ड स्टोरी’ सिनेमा सुरुवातीला २ सप्टेंबर २०१६ला प्रदर्शित होणार होता. पण नंतर प्रदर्शनाची तारीख पुढे नेऊन ती आता ३० सप्टेंबर केली आहे.