अभिनेते सयाजी शिंदे आणि भाऊ कदम यांची मुख्य भूमिका

‘चौर्य’ या चित्रपटातून लक्ष वेधून घेतलेला दिग्दर्शक समीर आशा पाटील “यंटम” हा चित्रपट करत असल्याचं सर्वांनाच माहीत आहे. शार्दूल फिल्म्सचे अमोल ज्ञानेश्वर काळे हे या चित्रपटाची निर्मिती करत असून यापूर्वी अमोल काळे यांनी निर्मिती केलेला ‘दगडी चाळ’ हा चित्रपट गाजला होता.

‘यंटम’चा मुहुर्त नुकताच जुन्नर इथं झाला असून जुन्नर आणि परिसरात चित्रपटाचं चित्रीकरण सुरु आहे. ‘यंटम’ चित्रपटात अभिनेते सयाजी शिंदे आणि भाऊ कदम यांच्या महत्वपूर्ण भूमिका असून एकूण  ९२ नवोदित कलाकारांनाही या चित्रपटाच्या माध्यमातून निर्माते अमोल ज्ञानेश्वर काळे आणि दिग्दर्शक समीर आशा पाटील यांनी सुवर्णसंधी दिली आहे हे या चित्रपटाचे एक वैशिष्ट्य म्हणता येईल.  समीरसह मेहुल अघजा यांनी “यंटम” चित्रपटाचं लेखन केलं आहे. डबलसीट, राजवाडे अँड सन्स फेम  अर्जून सोरटे सिनेमॅटोग्राफर ,राष्ट्रीय पुरस्कार विजेते परेश कामदार संकलन,  कुणाल लोलसूर साऊंड डिझाईन आणि मीलन देसाई वेशभूषेची जबाबदारी निभावत आहेत.

‘यंटम’सारखा चित्रपट करणं माझ्यासाठी आव्हान आहे. खूप  मेहनत आम्ही या चित्रपटासाठी घेतली असून सर्वोत्तम कलाकार-तंत्रज्ञांना घेऊन मला हा चित्रपट करायचा होता तीही इच्छा पूर्ण होतेय.”यंटम” हा बोलीभाषेतला शब्द आहे. ग्रामीण भागात हा शब्द प्रचलित आहे. ही एक म्युझिकल फिल्म आहे.”यंटम” च्या रूपाने  मनातली एक गोष्ट आज मोठ्या पडद्यावर साकारायला सज्ज झाली असून यासाठी निर्माते अमोल ज्ञानेश्वर काळे यांनी जे सहकार्य केले त्यासाठी मी त्यांचा आभारी असून “यंटम” नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल याचा विश्वास वाटतो,’ असं समीरनं सांगितलं.

मराठी चित्रपटसृष्टीत नव्या दमाचे लेखक दिग्दर्शक नव्या धाटणीचे विषय सादर करत आहेत. त्या बरोबरच नव्या दमाचे निर्माते वेगळ्या विषयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहात आहेत. निर्माते अमोल, ज्ञानेश्वर काळे आणि दिग्दर्शक समीर आशा पाटील  ही त्याचीच दोन उदाहरणं. अमोल ज्ञानेश्वर काळे यांनी  ‘दगडी चाळ’ या वेगळ्या चित्रपटातून यश मिळवलं तर समीरनं चौर्य हा धाडसी विषय हाताळला. हे दोघं ‘यंटम’च्या निमित्तानं एकत्र येत असल्यानं प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी वेगळं पहायला मिळणार आहे. अमोल काळे यांच्यासह संजय अभिमान पवार या चित्रपटाचे सहनिर्माता आहेत. ‘यंटम’ या चित्रपटात संगीत हा खूप महत्त्वाचा घटक आहे.