बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा आदिपुरुष हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटात रावणाची मानवीय बाजू दाखवण्यात येईल अशी घोषणा सैफ अली खानने केली होती. या वादग्रस्त वक्तव्यामुळे सैफवर टीका केली जात होती. त्यानंतर सैफने विधान मागे घेत सर्वांची माफी मागितली होती. आता सैफवर अभिनेते मुकेश खन्ना यांनी संताप व्यक्त केला आहे.

‘महाभारत’ या मालिकेत भीष्म पितामहची भूमिका साकारणाऱ्या मुकेश खन्ना यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘सैफ अली खानने एका मुलाखतीमध्ये त्याला रावणाची भूमिका साकारताना आनंद होत आहे. आम्ही रावणाची मानवीय बाजू मनोरंजक पद्धतीने सादर करणार आहोत असे म्हटले होते. यावर मी इतकच बोलू इच्छीतो की जे चांगले आहेत त्यांना चांगले राहु द्या, जे वाईट आहेत त्यांना वाईट राहु द्या. तुम्ही तुमच्या पद्धतीने काहीही बदल करु नका. हिंमत असेल तर दुसऱ्या धर्माबद्दल असे करुन दाखव? आता सैफ माफी मागतोय. बाण सोडा, बॉम्ब फोडो आणि मग सॉरी म्हणा. पण आम्हाला तुझे सॉरी स्विकार नाही. बोलण्याआधी विचार का नाही केलास?’ असे मुकेश खन्ना हे व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत.

आणखी वाचा- ‘रावण खलनायक नव्हता’; सैफ अली खान होतोय ट्रोल

काय म्हणाला होता सैफ अली खान?
सैफ अली खान ‘आदिपुरुष’ या चित्रपटात रावणाची भूमिका साकारणार आहे. मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत सैफने या भूमिकेवर भाष्य केले होते. “रावणाला आजवर आपण केवळ खलनायकाच्या भूमिकेत पाहिले आहे. पण तो खलनायक नव्हता. तो देखील एक माणूस होता. रावण माणूस म्हणून कसा होता? याचं चित्रण आदिपुरुषमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल. रावणाने भगवान श्री राम यांच्यासोबत युद्ध केले हे सर्वांनाच माहित आहे. पण त्याला देखील एक पार्श्वभूमी होती. रामाचे भाऊ लक्ष्मण यांनी सुर्पनखाचं नाक कापले होते. त्यानंतर हे युद्ध होणारच होते. या चित्रपटात रावणाची विचारसरणी काय होती हे दाखवले जाणार आहे” असे सैफ म्हणाला होता.

सैफ अली खानने मागितली माफी
विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सैफ अली खानचे स्पष्टीकरण शेअर केले होते. ‘एका मुलाखतीदरम्यान माझ्या एका विधानामुळे वाद निर्माण झाला. मी अनेकांच्या भावना दुखावल्या असल्याची मला जाणीव झाली. माझा कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. मी सर्वांची माफी मागतो आणि माझे विधान मागे घेतो’ असे सैफ म्हणाला होता.