– देविका जोशी

कसदार अभिनय आणि दमदार, वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे अभिनेत्री मुक्त बर्वेने मराठी कलाविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नाटकांमध्ये रमणारी ही अभिनेत्री गेले काही दिवस नाट्यसृष्टीपासून लांब आहे. ‘लोकसत्ता’ला दिलेल्या एका मुलाखतीत तिने यामागचे कारण उलगडले. “नाट्यगृहाची सद्यस्थिती व अस्वच्छता’ हे नाटकांपासून लांब राहण्याचं मुख्य कारण आहे.” असं तिने सांगितलं.

बऱ्याच महिन्यांपासून नाट्यगृहांची अस्वच्छता, प्रयोगादरम्यान फोन वाजणं या मुद्द्यांवर बऱ्याच चर्चा होत आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेता सुमीत राघवनने देखील हाच मुद्दा उपस्थित केला होता. “मला आता नाटक करायचा कंटाळा आलाय. नाट्यगृहांमधील अस्वच्छतेचा मला खूप त्रास होतो. स्वच्छतेसारख्या मूलभूत गोष्टीसाठी आपल्याला मागणी करावी लागतेय ही माझ्यादृष्टीने लाजिरवाणी गोष्ट आहे. या विषयावर सतत चर्चा करण्याचा माझा स्वभाव नाहीये. जगाच्या दृष्टीने जर स्वच्छता महत्त्वाची नसेल तर मीच यापासून लांब राहिलेलं बरं.” असं मुक्ता म्हणाली.

ती असंही म्हणाली की, “एक अभिनेत्री म्हणून मला नाटकांपासून लांब राहण्याचा खूप त्रास होतोय. आपण प्रसन्न मनाने नाट्यगृहात जातो. पण, नाट्यगृहांची भीषण स्थिती पाहून सगळाच रसभंग होतो. नाटक ही समृद्ध कला आहे. महाराष्ट्रात ही कला जिवंत आहे म्हणून आपल्याला त्याची किंमत नाहीये. नाट्यगृहाची स्थिती पाहून मीच नाशिक, औरंगाबादसारख्या ठिकाणी प्रयोग करणं थांबवलं होतं. माझ्या चाहत्यांनी औरंगाबादहून मुंबईत नाटक बघण्यासाठी येण्यापेक्षा तिथलं नाट्यगृह स्वच्छ केलं तर मला जास्त आनंद होईल. त्यानंतर तिथे प्रयोग करायला माझी काहीच हरकत नाहीये.”

नाट्यगृहांमध्ये मोबाईल जॅमर बसवण्याच्या प्रस्तावाविषयी मुक्ताला विचारलं असता ती म्हणाली की, “जॅमर लावण्याची वेळच का यावी? प्रेक्षकांनी स्वतःहून मोबाईल बंद ठेवले पाहिजेत. प्रयोगादरम्यान मोबाईल वाजणं हा जागरूकतेचा अभाव आहे.”