करोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाउन जाहीर झाला. गेल्या दोन महिन्यांपासून लोक आपापल्या घरीच बंदिस्त झाले आहेत. संयमाची परीक्षा घेणारा हा काळ आहे. कुटुंबीयांसोबत मतभेद, वादावादी होण्याचेही बरेच प्रसंग उद्भवतात. अशा वेळी आपल्या रागावर कसं नियंत्रण मिळवायचं, याचा कानमंत्र अभिनेत्री मुक्ता बर्वेने दिला आहे. मुक्ताला हा कानमंत्र तिच्या वडिलांकडून मिळाला आहे आणि तिने तो चाहत्यांना सांगितला आहे.

वाढदिवसानिमित्त मुक्ताने इन्स्टा लाइव्हच्या माध्यमातून चाहत्यांशी गप्पा मारल्या. या लाइव्हदरम्यान मुक्ताने हा कानमंत्र सांगितला. “रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी माझ्या वडिलांनी एक चांगली युक्ती सांगितली. वाद होतोय असं वाटल्यास किंवा वाद झाल्यानंतर मनातल्या मनात एक, दोन, तीन असे आकडे म्हणायचे आणि चौथा आकडा येताच सगळं विसरून पुन्हा हसायचं. त्यामुळे एक, दोन, तीन हे मला सध्या मॅजिकल नंबर्स वाटत आहेत”, असं मुक्ता म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mukta Barve (@muktabarve) on

यावेळी चाहत्यांनीही मुक्ताला बरेच प्रश्न विचारले. मुक्ताने चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं मनमोकळेपणाने दिली. लॉकडाउनमध्ये काय करतेय, असा प्रश्न तिला एका चाहत्याने विचारला. त्यावर लॉकडाउनमधला संपूर्ण वेळ हा कामातच जात असल्याचं मुक्ताने सांगितलं. “दरवर्षी वाढदिवसाला मला काम करायला आवडतं. गेल्या वर्षीसुद्धा मी वेडिंगचा शिनेमा या चित्रपटाच्या कामानिमित्त ऑस्ट्रेलियाला होते. मात्र यावर्षीसारखं सेलिब्रेशन पुन्हा नको आयुष्यात असंच वाटतं,” अशी भावना मुक्ताने यावेळी व्यक्त केली.