एके काळी मुंबईत गँगवॉरचा धुमाकूळ होता. या काळात अनेक गँगस्टर्स उदयाला आले. यातील एक नाव म्हणजे अरुण गवळी, डॅडी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गवळींचा ‘दगडी चाळ’ हा मुंबईतील बालेकिल्ला. त्यामुळे येथे जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची चर्चा होत असते. अशातच मराठी चित्रपटसृष्टीतील दोन नावाजलेल्या अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि हेमांगी कवी यांनी दगडी चाळीला भेट दिली. त्यांच्या या भेटीनंतर सर्वत्र या दोघींची चर्चा सुरु झाली आहे.

मुक्ता आणि हेमांगीला या चाळीत पाहिल्यानंतर चाळकऱ्यांमध्ये एकच कुतूहल निर्माण झालं होता. मात्र मुक्ता आणि हेमांगी एका खास कारणासाठी येथे आल्या होत्या. गीता गवळी यांचं ‘करा फाऊंडेशन’ असून त्यांचं मुख्यालय याच चाळीमध्ये आहे. ही संस्था गरीब, होतकरु आणि गरजू महिलांसाठी रोजगार उपलब्ध करुन देते. या संस्थेचा महिला बचत गटदेखील असून येथील महिला वेगवेगळ्या कलेत प्रवीण आहेत. त्यामुळेच या महिलांची भेट घेण्यासाठी मुक्ता आणि हेमांगी दगडी चाळीत आल्या होत्या. चाळीत आल्यानंतर या दोघींनीही येथील महिलांशी गप्पा मारुन त्यांच्या कलाकुसरीचं कौतुक केलं.

दरम्यान, हेमांगी आणि मुक्ताचा बंदिशाळा हा चित्रपट येत्या शुक्रवारी म्हणजेच २१ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महिलांवरील अत्याचाराला वाचा फोडणाऱ्या तुरुंग अधिक्षिका माधवी सावंत ही व्यक्तिरेखा मुक्ता साकारत आहे. तर हेमांगी कवीने या चित्रपटामध्ये माधवी सावंतच्या मैत्रिणीची रुक्सानाची भूमिका साकारली आहे. रुक्साना बचत गटाच्या माध्यमातून गरीब महिलांना मदत करतांना दिसत आहे. त्यामुळेच या चित्रपटाच्या प्रसिद्धीचा भाग म्हणून त्यांनी या चाळीतल्या ‘करा फाऊंडेशन’मध्ये काम करणाऱ्या महिलांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या कामाविषयीची सविस्तर माहिती घेतली.

या महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे त्यांनी बारकाईने निरीक्षण करून विशेष कौतुकही केले. खास महिलांसाठी विविध वस्तूंची निर्मिती आणि या महिलांचे कलागुण पाहून त्या भाराऊन गेल्या. या चित्रपटातील व्यक्तिरेखांचे हुबेहूब चित्रण असल्याचं या महिलांशी बोलताना जाणवलं अशी प्रतिक्रिया मुक्ता बर्वे आणि हेमांगी यांनी दिली.