करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. याचा आर्थिक परिणाम विविध क्षेत्रात रोजंदारीवर असलेल्या कामगारांच्या जीवनावर झाला आहे. यामध्ये मराठी चित्रपटसृष्टीचाही समावेश आहे. लॉकडाऊनमुळे मराठी चित्रपटांचे चित्रीकरण बंद आहे. परिणामी चित्रपटसृष्टीत रोजंदारीवर कार्यरत असणाऱ्या पडद्यामागील कामगारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचे निर्माते आणि युवा उद्योजक पुनीत बालन यांनी पुण्यातील कामगारांना साडे सात लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे.
या विषयी बोलताना पुनीत बालन म्हणाले, “सध्या सर्वत्र लॉकडाऊन असल्याने सिनेक्षेत्रात रोजंदारीवर काम करणाऱ्या व्यक्तींचे हाल होत आहेत. या लोकांसाठी मदत करण्याचे आवाहन ‘मुळशी पॅटर्न’चे लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण तरडे यांनी मला केले, त्याला प्रतिसाद देत ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी जे कामगार कार्यरत होते त्यांना अडीच लाख रुपयांची मदत केली. तसेच मी चित्रपट महामंडळाकडे पाच लाख रुपये देणगी स्वरुपात देत आहे. महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांना विनंती आहे की त्यांनी ही रक्कम पुण्यातील सिने – नाट्यक्षेत्र, दूरचित्रवाणी व सांस्कृतिक क्षेत्रातील बॅकस्टेज आर्टिस्ट आणि ज्युनियर अॅक्टर यांना वितरीत करावी जेणेकरून त्यांना किमान एक महिन्यासाठी किराणामाल, जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येतील.” तसेच भविष्यात लॉकडाऊनचा कालावधी वाढला तर आम्ही या सर्व कामगारांना आणखी मदत करणार आहोत.” असेही पुनीत बालन म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 6, 2020 6:34 pm