कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सध्या देशात लॉकडाउन सुरु आहे. या काळात अत्यावश्यक सुविधा सोडल्या तर सारं काही बंद आहे. त्यामुळे या बंदचा परिणाम साऱ्यांनाच सहन करावा लागत आहे. या बंदचा परिणाम तमाशा कलावंतानादेखील बसला आहे. अनेक गावच्या यात्रा रद्द करण्यात आल्यामुळे तमाशा कलावंतांना आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे. त्यामुळे या कलावंतांना मदतीचा हात देण्यासाठी ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक-लेखक प्रविण तरडे पुढे सरसावले आहेत. या दोघांनी मिळून तमाशा कलावंतांना आर्थिक मदत केली आहे.
होळी पौर्णिमा ते बुद्धपौर्णिमा या दरम्यान वेगवेगळ्या गावांमध्ये यात्रा भरविली जाते. या यात्रेत तमाशा फडाला आवर्जुन बोलावणं असतं. मात्र लॉकडाउनमुळे गावातील यात्राही रद्द झाल्या आहेत. परिणामी, तमाशा मंडळाचे अनेक शो रद्द झाले आहेत. त्यामुळे यात्रेच्या काळातील कार्यक्रमाची सुपारी बंद झाल्यामुळे या कलावंतांना अंदाजे नऊ कोटींचा फटका बसला आहे. त्यामुळे या काळात या कलावंतांना आर्थिक समस्यांना निर्माण होऊ नयेत यासाठी प्रविण तरडे आणि पुनित बालन यांनी मदत केली आहे. यावेळी तरडे आणि पुनीत बालन यांनी रेश्मा पुणेकर आणि अमर गफूरभाई पुणेकर यांच्याशी संवाद साधत मदत केली.
‘मुळशी पॅटर्न’चे निर्माते पुनीत बालन आणि आमच्या टीमने पडद्यामागील कामगारांना मदत केले तशीच आता तमाशा कलावंताना मदत केली आहे, होळी पौर्णिमा ते बुद्ध पौर्णिमा हा लोककलवंतांचा व्यवसायिक काळ असतो, नेमकं करोना याच काळात असल्यामुळे ते पूर्णपणे घरी असणार आहेत, आपल्यासाठी हा प्रश्न १५ दिवस- एक महिन्याचा असला तरी लोककलावंतासाठी संपूर्ण वर्षभराचा आहे, ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट समाजाने उचलून धरला आज समाज संकटात आहे, या काळात समाजाला मदत करणे आमचे नैतिक कर्तव्य आहे या भावनेतून आम्ही ही मदत करत आहोत’, असं प्रविण तरडे म्हणाले.
‘होळी पौर्णिमा ते बुद्ध पौर्णिमा हा आमच्या व्यवसायाचा कालावधी आहे, या काळातील उत्पन्नावरच आमचा वर्षभराचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. मात्र यंदाच्या यात्रांवर करोनाचं सावट असल्यामुळे सगळं मातीमोल झालं आहे, यामुळे आमच्या क्षेत्रातील सर्वच लोकांवर उपासमारीची वेळ ओढावली आहे, अशा काळात पुनीत बालन, प्रविण तरडे यांनी केलेली मदत बहुमोलाची ठरली आहे’, असं रेश्मा पुणेकर म्हणाल्या.
‘काही दिवसांपूर्वी आम्ही चित्रपट, नाट्य क्षेत्रातील ४५० पेक्षा अधिक पडद्यामागील कामगारांना मदत दिली, त्यावेळीच आम्हाला तमाशा कलावंताचा प्रश्न समजला, त्यावर आमच्या टीमने काम केले, आज आम्ही प्रातिनिधीक स्वरूपात मदत दिली आहे, महाराष्ट्रातील जास्तीत जास्त तमाशा कलावंतापर्यंत जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. परंतु मला एक सांगायचे आहे की, अशा संकट काळात समाजातील अनेकांनी पुढे येऊन गरजूंना मदत करावी’, असं पुनित बालन म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 11, 2020 3:32 pm