आजची तरुणाई नेमका काय विचार करते, तो विचार शब्दांत कसा मांडते, रंगमंचावर कसा साकारते.. या सर्व प्रश्नांची उत्तरं ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी सहज सापडली. काही वर्षांपूर्वीपर्यंत दहशतवाद, स्त्री-भ्रूणहत्या अशा नेहमीच्याच चक्रात अडकलेल्या एकांकिकांनी दोन-तीन वर्षांपासून पुन्हा एकदा नव्या विषयांचा मोकळा श्वास घेण्यास सुरुवात केली आहे. यंदाच्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत सादर झालेल्या आठही एकांकिकांचे विषय आणि त्यांची मांडणी यांचा विचार करता एक आशादायक चित्र पाहायला मिळालं..
एकांकिका स्पर्धा आणि तरुणाईचा जल्लोष हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या निमित्ताने २९ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान गेले १९ दिवस राज्यभरात हा जल्लोष चालू होता. राज्यभरातील आठ केंद्रे, या आठ केंद्रांवर दोन फेऱ्या आणि त्यातून निवडलेल्या आठ सर्वोत्तम एकांकिकांची महाअंतिम फेरी; या स्वरूपातील ही स्पर्धा खूपच उत्साहात पार पडली. गेल्या शनिवारी, १७ ऑक्टोबर रोजी मुंबईत झालेल्या महाअंतिम फेरीत राज्यातील आठही विभागांतील सर्वोत्तम एकांकिका सादर झाल्या. राज्याच्या विविध भागांतील विभिन्न सामाजिक, आर्थिक आणि राजकीय पाश्र्वभूमीसह वाढणारे हे तरुण वेगवेगळ्या विषयांकडे कसे पाहतात, याचा जणू कॅलिडोस्कोप या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळाला.
’ स्पर्धेची सुरुवात औरंगाबाद विभागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नृत्य विभागाच्या ‘भक्षक’ या एकांकिकेने झाली. जंगलांवर शहरांचे अतिक्रमण आणि त्यातून उद्भवणारा संघर्ष ही समस्या राज्यभरात जवळपास सर्वच ठिकाणी पाहायला मिळते. जंगलातील एक घटक बनून राहणारे आदिवासी या शहरी आक्रमणामुळे गढुळलेल्या जंगलातील वातावरणाचे जास्त बळी ठरतात. याच विषयावर आधारित ‘भक्षक’ या एकांकिकेने सुरुवातीलाच प्रेक्षकांना जबर झटका दिला. कमीत कमी संवाद आणि जास्तीत जास्त हालचाली असलेल्या या एकांकिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. जंगलात वाघ येत असताना इतर प्राण्यांची चलबिचल, बिथरलेल्या वाघाची तडफड, गावकऱ्यांची वाघाबद्दलची भीती, वाघ आणि गावकरी यांच्यातील झटापट या सगळ्याच गोष्टी चित्तथरारक होत्या. या एकांकिकेत वाघाचे काम करणाऱ्या रावबा गजमल या कलाकाराने वाघाच्या सगळ्या लकबी अत्यंत हुबेहूब उचलल्या होत्या.
’ स्पर्धेतील दुसरी एकांकिका होती अहमदनगरच्या पेमराज सारडा महाविद्यालयाची ‘ड्रायव्हर’! एका बडय़ा व्यावसायिकाच्या खासगी चालकाच्या घरात घडणारी ही एकांकिका तो चालक, त्याची पत्नी आणि मुलगी यांच्या नातेसंबंधांवर आधारित होती. केवळ संवादांच्या जोरांवर कोणतेही अंगविक्षेप न करता हशे वसूल करणाऱ्या या एकांकिकेने वेळप्रसंगी प्रेक्षकांना अंतर्मुखही केलं. गाडी चालवताना गाडी पंक्चर झाली की आत्मविश्वासाचा जॅक लावून पंक्चर झालेला टायर बाजूला काढायचा आणि नवीन टायर जोडून गाडी पुढे न्यायची, या जीवनावर भाष्य करणाऱ्या संवादालाही प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून दाद दिली. बाप-मुलगी यांचे नाते, चालकाच्या तुटपुंज्या पगारात घर भागवणारी गृहिणी आई, सरकारी नोकरी मिळण्याचे स्वप्न आणि त्यासाठी केलेली मेहनत व ते स्वप्न तुटल्यानंतर आशा हरपलेला बाप, त्याला त्यातून बाहेर काढणारी मुलगी; अशा प्रसंगांची गुंफण या एकांकिकेत पाहायला मिळाली.

’ स्पर्धेत रंगत आणली, ती ठाणे विभागातून महाअंतिम फेरीत आलेल्या ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या ‘मित्तर’ या एकांकिकेने! नक्षलवाद, त्यात भरडला जाणारा सामान्य माणूस आणि हिंसा-अहिंसा यांचा झगडा या विषयावरील ही एकांकिका उत्तम सादरीकरणामुळे प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली. ‘बंदुकीतून गोळी सुटते, प्रश्न नाही!’ अशा चोख गोळीबंद आणि काहीशा बटबटीत संवादांची पेरणी एकांकिकेभर असली, तरी योग्य ठिकाणी हशा आणि टाळ्या वसूल करत एकांकिकेने चांगलीच छाप पाडली. एकांकिकेत दखल घेण्याजोगी गोष्ट म्हणजे गौतम बुद्धाच्या पुतळ्याची भूमिका करणाऱ्या मुलाचा अभिनय! रंगमंचावर सलग दहा मिनिटे एकाच स्थितीत बसून राहणे, डोळ्यांची पापणीही न हलवणे हे नक्कीच सोपं नाही! पण या मुलाने ही जबाबदारी चोख पार पाडली. प्रेक्षकांनीही हा ‘बुद्ध’ नावाजला.
’आजच्या तरुणाईच्याच नाही, तर बहुतांश सर्वाच्याच आयुष्यातील महत्त्वाचा घटक म्हणजे ‘व्हॉट्सअ‍ॅप’! याच विषयावर आधारित याच नावाची एकांकिका नाशिकच्या कर्मवीर थोरात हिरे मुरकुटे महाविद्यालयाने सादर केली. या एकांकिकेची सुरुवात खूपच फ्रेश आणि वेगळ्या पद्धतीने करण्यात आली. तसंच सुरुवातीचा बराच वेळ तरुणाईच्या दैनंदिन जीवनाशी निगडित व्हॉट्सअ‍ॅपवरील अनेक गोष्टींवर उत्तम भाष्य करणाऱ्या या एकांकिकेला प्रेक्षकांचा प्रतिसादही उत्तम मिळत होता. ग्रुप चॅट विंडो, पर्सनल चॅट विंडो आणि स्टेट्स अशी ठिकाणे रंगमंचाचा आणि लेव्हल्सचा वापर करून दिग्दर्शकाने वेगवेगळी दाखवली. मात्र अखेर ही एकांकिका व्हॉट्सअ‍ॅपवरून पसरणाऱ्या समाजविघातक संदेशांवर आणि पर्यायाने हिंदू-मुस्लीम दंगलींवर आली आणि एकांकिकेचे तारू फुटले! तरीही अत्यंत वेगळ्या पद्धतीने मांडलेल्या या एकांकिकेने एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न नक्कीच केला.

ravi02’ पाचव्या एकांकिकेसाठी पडदा उघडण्याआधीच एका दगडावर काही तरी लोखंडी वस्तू घासून धार काढल्याचा आवाज यायला लागला. पडदा उघडला आणि धुसर प्रकाशात समोर एक वडाचे झाड, कमरेला पाला बांधून कोपऱ्यात आपल्या सुऱ्याला धार काढत बसलेला एक माणूस, लहानग्या मुलीला घेऊन आलेली एक बाई दिसायला लागली. रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘भोग’ या एकांकिकेची सुरुवातच परिणामकारक झाली होती. पैशांचा पाऊस पडावा, यासाठी आपल्या मुलीचा बळी द्यायला एका भगताकडे आलेली बाई आणि त्या बाईच्या मानसिक कणखरपणाची चाचणी घेणारा तो भगत.. यातून निर्माण झालेला तणाव प्रेक्षागारात पसरला होता. एका क्षणाला त्या भगताने अर्ध जळलेलं एक प्रेत खेचत मंचावर आणलं आणि त्याचा हात कापून तो त्या बाईसमोर नाचवला आणि संपूर्ण प्रेक्षागारात शिसारीचा ‘संऽऽऽऽ’ असा ध्वनी पसरला. रंगमंचावर घडणाऱ्या गोष्टी खऱ्या भासायला लागल्या की, नाटक उत्तम परिणाम साधतं; असं म्हणतात. ‘भोग’ या एकांकिकेबाबत ही गोष्ट अगदी हुबेहूब खरी ठरत होती. शेवटच्या पाच मिनिटांत या नाटकाची गोष्ट ३६० अंशांत वळली आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देत संपली. मात्र त्यामुळे प्रेक्षकांवर या एकांकिकेचा झालेला परिणाम साफ पुसला गेला.
’ गेल्या वर्षी सआदत हसन मंटो याच्या जीवनावर आधारित एकांकिका महाअंतिम फेरीत धाडणाऱ्या नागपूर विभागातून यंदा ‘विश्वनटी’ ही एकांकिका महाअंतिम फेरीत दाखल झाली होती. ‘डॉ. विठ्ठलराव खोब्रागडे आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स’ महाविद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांनी ही एकांकिका डान्सिकल फॉर्ममध्ये सादर केली. बाईचा जन्मापासून आईपणापर्यंतचा प्रवास, हा या एकांकिकेचा विषय! मात्र त्यासाठी या कलाकारांनी ती मुलगी एका वेश्येची दाखवली होती. वेश्येच्या मुलीसाठी असलेल्या इतर मर्यादा, त्या मर्यादांवर मात करून शिकण्याची जिद्द, तिच्या माथी आलेली अवहेलना आणि अखेर तिचीही तिच्या आईसारखीच होणारी फरफट; हा विषय एकांकिका स्पर्धासाठी नवीन नाही. मात्र तो सादर करताना नागपूरच्या कलाकारांनी नृत्यनाटय़ाचा फॉर्म स्वीकारला. पांढऱ्या पडद्याच्या उभ्या पट्टय़ामागून प्रकाश टाकून केलेला सावल्यांचा खेळ, त्यातून दाखवलेले विविध विभ्रम या गोष्टी दाद देण्यासारख्या होत्या.

’ मुंबईच्या म. ल. डहाणूकर महाविद्यालयाची ‘एक्स-प्रिमेण्ट’ ही एकांकिका शास्त्रज्ञ लुई पाश्चर आणि त्याचे रेबिजच्या लशीवरील संशोधन यावर आधारित होती. फ्रेंच राज्यक्रांतीच्या आधीचा हा कालखंड! समाजावर असलेला चर्चचा पगडा दोन दृश्यांत अधोरेखित करत दिग्दर्शकाने पुढील एकांकिका लुई पाश्चर, त्याचा सहकारी, त्यांच्या संशोधनात मोलाची भूमिका बजावणारा रेबिज कुत्रा चावलेला लहान मुलगा, त्या मुलाची आई, त्या दोघांमधील नातेसंबंध; या गोष्टींचा आधार घेत मांडली. उत्तम नेपथ्य असलेल्या या एकांकिकेच्या महाअंतिम फेरीतील प्रयोगाला मात्र संगीत व प्रकाशयोजना यांच्यातील समन्वयाची साथ मिळाली नाही. तसेच लुई पाश्चरचा संघर्ष पुढे न येता तो संघर्ष ती आई, तिचा लहान मुलगा आणि लुई पाश्चरच्या साहाय्यकाचा जास्त वाटला. तरीही अभियनाच्या बाबतीत सर्वच कलाकारांनी उत्तम परफॉर्मन्स दिला. ही एकांकिका अभिनयाच्या जोरावर चांगलीच झाली.

’ महाअंतिम फेरीतील शेवटची एकांकिका होती पुणे विभागातील गरवारे महाविद्यालयाची ‘जार ऑफ एल्पिस’! ग्रीक पुराणकथेवर आधारित या एकांकिकेत रंगमंचाच्या विविध शक्यता तपासण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला. एकांकिकेत घडणारं नाटक हा मुक्त फॉर्म असल्याने नायिकेची प्रेक्षकांमधूनच होणारी एण्ट्री, मध्येच ती प्रेक्षागारात उतरणे, नाटकातल्या नाटकातला सीन चालू असताना अचानक नायिकेने दिग्दर्शकाला भानावर आणणे; या गोष्टी चपखल जमून गेल्या. तसंच ग्रीक पुराणकथांना साजेसं संगीत, वेशभूषा आदी बाबीही उत्तम होत्या. ‘आशा’ ही गोष्ट महत्त्वाची असते. माणूस हरला, तरी आशा जिवंत असेल तर माणूस सर्व संकटांवर मात करू शकतो, हा संदेश या गोष्टीतून देण्याचा प्रयत्न दिग्दर्शक आणि लेखक यांनी केला.

‘सेल्फी स्टॅण्ड’ला उत्स्फूर्त प्रतिसाद!
‘लोकसत्ता-लोकांकिका’च्या महाअंतिम फेरीसाठी रवींद्र नाटय़ मंदिरात उभ्या करण्यात आलेल्या ‘सेल्फी स्टॅण्ड’ला उपस्थित रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या सेल्फी स्टॅण्डवर येऊन अनेक नाटय़प्रेमी रसिक आपले छायाचित्र काढून घेत होते. या सेल्फी स्टॅण्डवर महाअंतिम फेरीत ज्या आठ एकांकिका सादर होणार होत्या त्यांची एकाखाली एक अशी नावे लिहिण्यात आली होती. सादर होणाऱ्या एकांकिकेतून जी एकांकिका ‘महाराष्ट्राची लोकांकिका’ व्हावी, असे वाटत असेल त्या एकांकिकेच्या नावावर बोट ठेवून अनेक प्रेक्षक आपले छायाचित्र काढत होते. छायाचित्र काढून घेण्यामध्ये सर्व वयोगटांतील प्रेक्षकांचा विशेषत: महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी, युवक-युवती आणि कुटुंबासह आलेले रसिक यांचा मोठय़ा प्रमाणात सहभाग होता. याबाबत उपस्थित प्रेक्षकांनी ‘लोकसत्ता’ला ‘ट्वीट’करावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्याला सुमारे पाचशे रसिकांनी प्रतिसाद दिला.