15 December 2019

News Flash

‘क्षितिज’झेप

सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘वायझेड’ची चर्चा झाली, त्याचा फायदा चित्रपटाच्या चमूने करून घेतला.

नाटककार, चित्रपट पटकथा-संवाद लेखक, गीतकार, जाहिरातींसाठी कॉपी रायटर, दिग्दर्शक, विविध पुरस्कार सोहळ्यांसाठी संहिता लेखन अशा विविध भूमिकांमधून आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटवणारा चेहरा म्हणून क्षितिज पटवर्धन याची ओळख आहे. मराठी चित्रपट आणि नाटय़सृष्टीत क्षितिजने अल्पावधीतच आपली ओळख निर्माण केली आहे. तरुणाईची नेमकी नस त्याने पकडली असल्याने आणि तो स्वत:ही तरुण असल्याने त्याचे लेखन हे तरुणाईला आवडते व ते ताजे-टवटवीतही वाटते. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या आणि प्रदर्शनापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेत राहिलेल्या ‘वायझेड’ या मराठी चित्रपटाचे लेखनही क्षितिजनेच केले आहे.
‘दोन स्पेशल’ या अनेक पुरस्कारप्राप्त नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन अशा दोन्ही भूमिका त्याने यशस्वीपणे पार पाडल्या. ‘नवा गडी नवं राज्य’ हे नाटकही त्यानेच लिहिलेले होते. क्षितिज पटवर्धन व समीर विद्वांस या जोडीने यापूर्वी ‘टाईमप्लीज’ व ‘डबलसीट’ हे लोकप्रिय चित्रपट दिले आहेत. ‘वायझेड’ संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे १२० चित्रपटगृहांत झळकला असून सध्या त्याचे ३२५ खेळ सुरू आहेत. तरुणाईचा चित्रपट म्हणून त्याची ओळख आहे. काही तरी वेगळे करावे किंवा लक्ष वेधून घ्यावे म्हणून चित्रपटाचे नाव ‘वायझेड’ ठेवले का? या प्रश्नावर क्षितिज म्हणाला, ‘वायझेड’ हे नाव माझे एकटय़ाचे नाही. ती आमच्या चमूची सामूहिक सर्जनशीलता आहे. वेडेपणासाठी हा शब्द वापरला जातो. या शब्दाला नकारात्मक छटा जास्त प्रमाणात असली तरी आम्ही तो येथे सकारात्मक पद्धतीने घेतला आहे. एखाद्या विशिष्ट ध्येयाने काही व्यक्ती, संस्था काम करत असतात. निष्ठेने त्यांचे काम सुरू असते. चित्रपटाचे प्रमोशन म्हणून आम्ही नुकतेच असे झपाटून काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना ‘वायझेड’ पुरस्काराने गौरवले. त्यामुळे ‘सकारात्मक वेडेपणा’ यातून आम्ही अधोरेखित केला आहे.
सई ताम्हणकर व मुक्ता बर्वे यांनी भूमिकेची लांबी न बघता भूमिका वेगळी वाटली आणि आवडली म्हणून हा चित्रपट स्वीकारला.
एका वेगळ्या लुक व भूमिकेत त्या दोघी चित्रपटात पाहायला मिळतात, असे एका प्रश्नाच्या उत्तरात त्याने सांगितले.
सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘वायझेड’ची चर्चा झाली, त्याचा फायदा चित्रपटाच्या चमूने करून घेतला. याविषयी बोलताना क्षितिज म्हणाला, या माध्यमाची ताकद खूप मोठी असली तरी सोशल मीडिया म्हणजे सर्वस्व नाही. तो एक इंडिकेटर आहे. त्याचा वापर तुम्ही कसा करता त्यालाही महत्त्व आहे. फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून ‘वायझेड’च्या चमूने याचा योग्य उपयोग करून घेतला. चित्रपटाचा ट्रेलर, पोस्टर या मीडियाच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले व त्याचा आम्हाला खूप फायदा झाला. चित्रपट व नाटक या दोन्हीकडे यशस्वी मुशाफिरी केलेल्या क्षितिजने दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांसाठी अद्याप काम केलेले नाही व इतक्यात तो करणारही नाही. चित्रपट व नाटकांमध्ये क्षितिजला नाटक अधिक आव्हानात्मक वाटते. याविषयी त्याने सांगितले, नाटकाची एक वेगळी परिभाषा आहे. ते आतून स्फुरणे महत्त्वाचे. नाटक लिहिताना काही बंधने पाळावी लागतात. गीतकार म्हणून क्षितिजने लिहिलेले ‘आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ आहे’ हे गाणे लोकप्रिय आहे. ‘पोश्टर गर्ल’ चित्रपटातील हे गाणे वेगवेगळ्या माध्यमांतून कानावर पडत असते. त्याचे आजवरचे लेखन पाहिल्यानंतर हे गाणे क्षितिजने लिहिले असेल यावर विश्वास बसत नाही. त्यावर क्षितिज म्हणतो, मी आत्तापर्यंत बहुतेक प्रेमगीतेच लिहिली. हे थोडे वेगळ्या प्रकारचे व शैलीतील गाणे आहे. एक गीतकार म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे ‘जॉनर’ हाताळता आले पाहिजेत असे मला वाटते. मराठीत गेल्या काही वर्षांत तरुण निर्माते व दिग्दर्शक हे नवे विषय हाताळत आहेत. मराठी चित्रपटांना तरुणाईचाही प्रतिसाद मिळतो आहे. हे चित्र नक्कीच सुखावणारे आहे. मराठी चित्रपट कोणताही ‘टेकू’ न घेता स्वतंत्रपणे बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला पाहिजे, असे वाटते. क न्टेन्ट, कॉम्बिनेशन आणि कम्युनिकेशन हे तीन ‘सी’ त्यात असले पाहिजेत, असे मतही त्याने व्यक्त केले. ‘वायझेड’नंतर नवीन काय? यावर आदित्य सरपोतदारबरोबर एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट करतोय तसेच हिंदी चित्रपटाबाबतही बोलणी सुरू असल्याचे क्षितिजने सांगितले.

चत्रपट करताना एकच उद्देश डोळ्यासमोर असतो तो म्हणजे चित्रपट आपल्याला स्वत:ला बघायला आवडला पाहिजे. स्वत:ला स्वत:च्या प्रेमात पाडणारी गोष्ट असली पाहिजे. आमच्या पिढीतील प्रत्येकाला असे वाटते की, आमच्यापेक्षा लहान म्हणजे २ ते २० वर्षे वयोगटातील मुले जे काही करतात ते नवीन, थ्रिलिंग व क्रांतिकारी असते आणि चाळिशीच्या पुढच्या लोकांचे आम्हाला सर्व काही जुने व टाकाऊ वाटते; पण वास्तवात तसे नसत – क्षितिज पटवर्धन

First Published on August 14, 2016 1:02 am

Web Title: multi talented and creative kshitij patwardhan
Just Now!
X