मुंबई महापालिका मुख्यालयाच्या जवळ असलेला हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळला. या घटनेत सहा जण मृत्युमुखी पडले, तर ३० जण जखमी झाले आहेत. यापूर्वी लोअर परेल येथेदेखील अशाच प्रकारे पादचारी पूल कोसळला होता. त्यामुळे या घटनेनंतर मुंबईकरांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे. काल झालेल्या घटनेनंतर सामान्य नागरिकांपासून ते कलाविश्वापर्यंत सारेच पीडितांच्या दु:खात सहभागी आहे. त्यात काही बॉलिवूड सेलिब्रिटींनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून या दुर्घटनेविषयी त्यांचं मत व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबईमध्ये आतापर्यंत अनेक दुर्घटना घडल्या असून काल हिमालय पूल कोसळून या दुर्घटनांच्या संख्येत वाढ झाली आहे. आतापर्यंत मुंबईवर जी काही संकटे ओढावली आहेत. त्या प्रत्येक संकटानंतर बॉलिवूड सेलिब्रिटींनी या घटनेतील पीडितांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यासोबतच सोशल मीडियाचा आधार घेत आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. यावेळी देखील हिमालय पूल कोसळल्यानंतर अवघ्या काही तासांनी बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांच्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. यामध्ये अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, रितेश देशमुख,अशोक पंडित या कलाकारमंडळींनी ट्विटरवर त्यांचं मत मांडलं आहे.

“मुंबईतील हिमालय पूल कोसळून झालेल्या अपघातामुळे साऱ्यांवरच शोककळा पसरली आहे. मी पीडितांच्या दु:खात सहभागी आहे”, असं अमिताभ बच्चन यांनी म्हटलं आहे. तर चित्रपट दिग्दर्शक अशोक पंडित यांनी या घटनेनंतर राजकीय पक्षांवर नाराजी व्यक्त केली आहे. “या घटनेमुळे अनेक जणांनी आपले प्राण गमावले आहेत, कित्येक जण जखमी झाले आहेत. मात्र आपले राजकीय नेते घटनास्थळावर जाऊन पीडितांची मदत करण्यापेक्षा निवडणुकीचा प्रचार करत आहेत”.

मराठमोळा कलाकार रितेश देशमुखनेही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. “मन हेलावून टाकणारी ही घटना आहे. पूल कोसळण्याचं वृत्त कानावर आल्यानंतर मन काही काळ विषण्ण झालं. ज्यांनी या दुर्घटनेत आपल्या प्रियजनांना गमावलं आहे, या कुटुंबियांच्या दु:खात मी त्यांच्या सोबत आहे. तसंच जखमी झालेले लवकरच बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करेन.जर या पुलाकडे वेळीच लक्ष दिलं असतं तर ही दुर्घटना नक्कीच टाळता आली असती.हे सारं बेजबाबदारपणामुळे झालं आहे”.

“यावेळी झालेल्या अपघात हा मुंबईच्या हृदयावर झाला आहे, असं म्हणायला हरकत नाही. या हल्ल्यात काही जणांनी त्यांचे प्राण गमावले,तर काही जण जखमी झाले आहेत. मी या साऱ्यांच्या दु:खात सहभागी आहे”, असं अभिनेत्री हेमामालिनी म्हणाल्या.

त्या प्रमाणेच अभिनेत्री तापसी पन्नूनेदेखील केवळ एका ओळीत तिच्या भावना व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. “ही घटना मनावर घाव घालणारी आहे”.

दरम्यान, अभिनेता अनुपम खेर सध्या लंडनमध्ये त्यांच्या चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यस्त आहेत. मात्र या घटनेनंतर त्यांनी तात्काळ त्याची प्रतिक्रिया नोंदविल्याचं पाहायला मिळालं. “हिमालय पूल कोसळ्याची माहिती मिळाली. ही घटना खरंच हृदय पिळवटून टाकणारी आहे. मी पीडितांच्या दु:खात सहभागी आहे. या घटनेतून सारेच लवकर सावरावेत यासाठी मी देवाकडे प्रार्थना करेन”, असं त्यांनी म्हटलं आहे.

तर “या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ पाहून मन हेलावून जात आहे. मी घटनेतील पीडित व्यक्तींच्या दु:खात सहभागी आहे. लवकरच या परिस्थितीत सुधारणा व्हावी,” असं अभिनेता विवेक ओबेरॉय म्हणाला आहे. हिमालय पूल कोसळल्यानंतर सोशल मीडियावर सध्या #MumbaiBridgeCollapse हा हॅशटॅग ट्रेण्ड होताना पाहायला मिळत आहे.