भारतातील सर्वात मोठा पॉप कल्चर सोहळा मुंबई कॉमिक कॉन २२ आणि २३ डिसेंबर रोजी मुंबईमध्ये रंगणार आहे. पॉप कल्चर आणि फॅन्टासीशी निगडीत गोष्टींची रेलचेल या कार्यक्रमात राहणार आहे. कार्यक्रमांनी सज्ज मुंबई कॉमिक कॉन उपस्थितांना कॉमिक्स आणि ग्राफिक्सचा अद्भुत साठा न्याहाळायला मिळेल. यात अत्यंत प्रतिभावान अशा स्वतंत्र कलाकारांच्या व लेखकांच्या उत्कृष्ट कलाकृतीदेखील असतील. शिवाय नागरिकांना याठिकाणी खरेदीचाही मनमुराद आनंद लुटता येणार आहे. याठिकाणी गेमिंग झोन तसेच वेगवेगळ्या ब्रॅंडच्या स्तू आणि खेळणी यांचा समावेश असेल. गोरेगावमधील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, नेस्को येथे हे प्रदर्शन सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत होणार आहे.

मुंबई कॉमिक कॉन २०१८ मधील विशेष अतिथींमध्ये देश विदेशातील कॉमिक आणि मनोरंजन क्षेत्रातील नामवंत कलाकारांचा समावेश असेल. या समारंभात सना ताकिडा (मॉन्स्ट्रेस या फॅंटसी मालिकेसाठी प्रसिद्ध कलाकार) आणि याया हान (व्यावसायिक कॉस्प्लेअर) आणि विल कॉनरॅड (मार्व्हेल आणि डीसी कॉमिक्सचा कलाकार) तसेच भारतीय प्रकाशन वर्तुळातील लोकप्रिय कॉमिक बुक कलाकार विवेक गोयल, सौमिन पटेल, अभिजीत किणी, एलिसिया सूझा, राहील मोहसीन आणि अनिरुद्धो चक्रवर्ती व इतर बरेच नामवंत कलाकार उपस्थित असतील. यामध्ये विनोदाचा आनंद सामील करण्यासाठी लोकप्रिय स्टँडअप कॉमेडियन आणि ईस्ट इंडिया कॉमेडीचा सह-संस्थापक साहिल शाह अॅक्ट सादर करेल तर, रॉक ऑन आणि सेक्रेड गेम्ससाठी ओळखला जाणारा लुक केनी याचे एक रंजक सत्र मुंबई कॉमिक कॉन मध्ये असेल.

याबाबत सांगताना कॉमिक कॉन इंडियाचे संस्थापक जतिन वर्मा म्हणाले, “पॉप कल्चर चाहत्यांसाठी आणि या शहरातील उत्साही लोकांसाठी हा वीकएंड वर्षातला सर्वात मस्त वीकएंड असेल. दर वर्षीप्रमाणे,यंदाही या इव्हेंटमध्ये खूप जबरदस्त अनुभव, अॅक्टीव्हिटीज आणि या उद्योगातील उत्तमोत्तम कलाकारांशी चर्चा, गप्पा अशा कार्यक्रमांची रेलचेल आहे. शिवाय कॉमिक बुक्सच्या अद्भुत विश्वाशी निगडीत असलेले मोठमोठे कलाकार, चित्रकार, लेखक आणि प्रकाशक यांच्याशी मनमोकळ्या गप्पा आणि पॅनल चर्चा देखील यात असणार आहे.” याठिकाणी अनेक चाहते कॉमिक बुक्स, चित्रपट, टीव्ही शो आणि गेम्समधल्या आपल्या आवडत्या कॅरेक्टरसारखी वेशभूषा करण्याची संधी घेत असतात. यात सर्वात छान आणि व्यवस्थित डिझाइन केलेली वेशभूषा परिधान करणा-यांना रोख पारितोषिकही देण्यात येते. यात दोन्ही दिवशी एका भाग्यशाली विजेत्याला ५०,००० रुपयांचे रोख बक्षीस देखील देण्यात येईल. हे विजेते इंडियन कॉस्प्ले चॅम्पियनशिप २०१९ मध्ये दाखल होतील व त्यापुढे शिकागोमधील क्राऊन वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ कॉस्प्लेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील असेही आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.