१९ वा जिओ मामि ‘मुंबई फिल्म फेस्टिव्हल विथ स्टार’ नुकताच मुंबईत विविध चित्रपटगृहांत साजरा झाला. या महोत्सवातील काही आवडलेल्या चित्रपटांविषयी आणि मामिच्या एकूण अनुभवाविषयी हा लेख..

‘फाइंड युअर स्टोरी’ अशी टॅगलाइन मिरवणारा ‘मामि’ चित्रपट महोत्सव म्हणजे चित्रपटरसिकांसाठी पर्वणीच. यापूर्वी मामिमध्ये ‘संहिता’, ‘द ब्राइट डे’, ‘शिप ऑफ थिसिअस’, ‘फँड्री’सारखे काही उत्कृष्ट चित्रपट मी पाहिले होते. पण सुट्टी टाकून मामिला हजेरी लावण्याची माझी ही पहिलीच वेळ. १९व्या जिओ मामि मुंबई फिल्म फेस्टिव्हलची घोषणा झाली आणि त्याचा ट्रेलर रिलीज झाला, तेव्हापासून माझ्या दिग्दर्शक मित्राला मी किती तरी प्रश्न विचारून भंडावून सोडलं. कोणते चित्रपट पाहायचे, एका दिवसात एवढे चित्रपट कसे पाहायचे, कोणते टाळायचे, या सगळ्या शंकांच्या निरसनासाठी या मित्राची मदत झाली. ‘मदर’, ‘कॉल मी बाय युअर नेम’, ‘२४ फ्रेम्स’ असे काही उत्तम चित्रपट इच्छा असूनही निसटले, याचं दु:ख तरीही आहेच.

prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
bade miyan chote miyan release date
‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि ‘मैदान’चे प्रदर्शन एक दिवस पुढे ढकलले, दोन्ही चित्रपट ११ एप्रिलला प्रदर्शित होणार
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा

‘फाइंड युअर स्टोरी’ ही मामिची समर्पक टॅगलाइन बरंच काही सांगून जाते. विविध देशांतले, विविध भाषांतले २०० चित्रपट म्हणजे एक विस्तीर्ण पसरलेला प्रदेशच जणू. कुठे ना कुठे तुम्हांला तुमची कथा मिळणारच. पडद्यावरच्या पात्रांशी तुम्ही कधी तरी जोडले जाल, एखाद्या चित्रपटात स्वत:चं प्रतिबिंब नक्कीच पाहाल. माझ्यासाठी मात्र हे मंतरलेले दिवस म्हणजे केवळ चित्रपट पाहण्यापलीकडचा एक वेगळा अनुभव होता. तुम्ही फक्त तुमचे डोळे आणि कान उघडे ठेवण्याची गरज आहे. मामिला येणाऱ्या माणसांचे नमुने पाहिले की तुमच्यात दडलेल्या लेखकाला नवीन कथाबीज नक्कीच सापडेल.

मामिला पहिल्यांदा येणाऱ्या नवथर तरुण-तरुणींचा एक गट असतो. चित्रपट पाहण्यापेक्षा आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर मिळणारा एकांत अशांना महत्त्वाचा असतो.  इथे येणारे स्ट्रगलिंग अ‍ॅक्टर्स आणि मॉडेल्स तर आपण सेलेब्रिटीच आहोत, अशा थाटात वावरत असतात. शूटचं लोकेशन किती छान मिळालं, गाणी किती टाकायची यावर फोनवर तारस्वरात चर्चा करत असतात. सगळी गर्दी नीट मॅनेज करणाऱ्या तरुण-तरुणींना न जुमानता बेशिस्तपणे क्यू मॅनेजरच्या खालून वाकून आत घुसणारेही काही महाभाग असतात. इतर कामधंदे नाहीत म्हणून कोणतेही वाट्टेल ते चार चित्रपट कुठल्याही स्क्रीनला पाहणारेही असतात आणि आवडत्या चित्रपटाला रांगेत उभं राहूनही सीट मिळाली नाही म्हणून हळहळणारेही असतात. एकीकडे खरंच सगळे चित्रपट कोळून प्यालेले लोकही इथे हजेरी लावतात, तसाच दुसरा एक अतिहुशार लोकांचाही गटही असतो. आपण फक्त स्कॉचच पितो अशा थाटात आपण फक्त तार्कोव्ह्स्कीच पाहतो, हे छाती फुगवत सांगणाऱ्यांचा आणि आणखी एक गट असतो परग्रहावरून आलेल्या एलियन्सचा, ज्या गटातील लोक मामि चालू असताना खाली तिकीटबारीवर ‘जुडवा २’चा शो किती वाजता लागलाय, याची चौकशी करायला आलेले असतात.

मात्र या सगळया गर्दीला मागे सारून आपण जेव्हा या फेस्टिव्हलचे चित्रपट पाहतो तेव्हा होणारा आनंदच काही और असतो.

पुष्कर पुराण : कमल स्वरूप

‘ओम दरबदर’सारख्या सर्वस्वी वेगळ्या सिनेमाचे दिग्दर्शक कमल स्वरूप यांचा ‘पुष्कर पुराण’ हा माहितीपट म्हणजे रंगांचा आणि प्रकाशाचा उत्सव आहे. वर्षांतून एकदा अजमेरपासून २९ किलोमीटरवर असलेल्या पुष्कर येथे जत्रा भरते. तेथील कुंडात स्नान करण्यासाठी हजारो लोक येतात. या दिवसांत तिथे स्वर्ग उतरतो आणि त्या कुंडात स्नान केल्यास मोक्षप्राप्ती मिळते, अशी समजूत आहे. या यात्रेत आपल्या गाई, घोडे, उंट विकण्यासाठी हजारो गावकरी येतात. लोककला सादर करणारे कलाकार, गायक, जायंट व्हील्स यांच्या नेत्रसुखद चित्रीकरणातून या माहितीपटात स्वर्गच प्रत्यक्ष पुष्करला उतरल्याचा भास होतो. ब्रह्मदेवाशी संबंधित सगळ्या पुराणातल्या कथा त्या अनुषंगाने कथन करताना चित्रीकरण अशा गूढरम्य पद्धतीने करण्यात आलं आहे की, त्या कथांची तिथल्या वास्तवात सरमिसळ होऊ न जावी. म्हणूनच हा माहितीपट कुठेही कंटाळवाणा होत नाही.

टेक केअर गुड नाइट

एकीकडे गुन्हय़ांचं स्वरूप बदलत असताना त्याचं प्रतिबिंब चित्रपटांतही उमटू लागलंय. भयपट आणि रहस्यपट यांतील सीमारेषा पुसून टाकत थराराचा एक मेंदूचा भुगा करणारा अनुभव गिरीश जोशी यांचा ‘टेक केअर गुड नाइट’ हा चित्रपट देतो. गिरीश जोशी यांचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट. पण तो मास्टरस्ट्रोकच म्हणायला हवा, इतका उत्तम जमून आलाय. एका सुखवस्तू चौकोनी कुटुंबाची एका सायबर गुन्हेगारामुळे कशी वाताहत होते, याची चक्रावून टाकणारी ही कथा आहे. सचिन खेडेकर, इरावती हर्षे, आदिनाथ कोठारे यांचा अभिनय उत्तम. पण वेगळे उठून दिसतात ते पर्ण पेठे आणि महेश मांजरेकर. एका गुन्हय़ाची कथा सांगणारा हा चित्रपट नकळत आजच्या पिढीच्या प्रश्नांविषयीही भाष्य करून जातो आणि म्हणूनच वेगळा ठरतो.

गुड लक

स्टार टीव्हीसाठी तयार केलेली ‘कहानी’ फेम सुजॉय घोष यांची ‘गुड लक’ ही टेलिफिल्म सर्वार्थाने वेगळी आहे. गोव्यामध्ये ‘कॅफे चालवणाऱ्या एका घटस्फोटित तरुणीला गुड लक विकण्यासाठी एकदा एक तरुण तिच्या कॅफेत येतो. तीन महिन्यांची फ्री ट्रायल घेण्यास सांगतो. आपल्या कॅफेमधल्या इतर गिऱ्हाईकांना त्याचा चांगला अनुभव आलेला पाहून तीही तयार होते. पण एकदा गुड लक विकत घेतलं की त्याची एक वेगळीच किंमत तिला चुकवावी लागणार आहे. ती काय आहे आणि त्याचे परिणाम काय होतात, हे चित्रपटातच पाहणं योग्य ठरेल. कुठलीही वस्तू किंवा सेवा विकत घेताना अटी आणि नियम पूर्ण न वाचता डोळेझाकपणे पटकन सही करण्याच्या आपल्या वृत्तीवर या कथेत सहजपणे भाष्य करण्यात आलं आहे. ‘तनू वेड्स मनू’, ‘रांझना’ अशा चित्रपटांतून साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेल्या राहुल शांकल्य यांचा ‘निम्मो’ हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट. एखाद्या परीकथेइतकी सुंदर अशी ही प्रेमकहाणी आहे. हेमू आठ वर्षांचा. निम्मोचं लग्न ठरलंय. सतत निम्मोबरोबर वावरणाऱ्या हेमूला निम्मो आता दुसऱ्या कुणाची तरी होणार, या भावनेनेच अस्वस्थ व्हायला होतं. लग्न, संसार या संकल्पनाही माहीत नसलेल्या हेमूचं जग इतकं निरागस आहे की लग्नात नवरा-बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो हे कळल्यावर चुंबकाचं दोऱ्यात ओवलेलं मंगळसूत्र तयार करून तो निम्मोच्या गळ्यात घालतो. तिचं लग्न मोडल्यावर खूश होतो. या कथेला कुठेही वासनेचा स्पर्श नाही. चित्रपट पाहताना सतत प्रकाश नारायण संतांचा ‘लंपन’ आठवत राहतो.

द फोरसेकन

जगाच्या आणि कायद्याच्या नजरेत तो एक प्रशांत नावाचा मामुली ट्रक ड्रायव्हर आहे आणि एक बलात्कारी नराधम. पण हिमनगाचा पाण्याखाली बुडालेला ९०% भाग पाहायचं ठरवलं की इतर बरंच काही आपल्या हाती लागतं. अकरा लघुकथांच्या फ्लॅशबॅकमधून या टॅक्सी ड्रायव्हरचं आयुष्य उलगडत जातं. गुन्हय़ाच्या मानसशास्त्राचे विविध पदर उलगडून दाखवताना दिग्दर्शक जिजू अँटनीचा कॅमेरा मुंबई हे एक महत्त्वाचं पात्रही चित्रपटात उभं करतो.

एस दुर्गा

‘सेक्सी दुर्गा’ या नावाला आक्षेप घेत ते बदलून ‘एस दुर्गा’ या नावाने संमती मिळालेला चित्रपट हा मी या वर्षी मामिला पाहिलेला सर्वोत्कृष्ट चित्रपट होता. कबीर हा मल्याळी तरुण दुर्गासोबत पळून लग्न करण्याच्या तयारीत आहे. रात्री उशिरा हे दोघे एका निर्जन महामार्गावर स्टेशनला जाण्यासाठी वाहन शोधत आहेत. एक व्हॅन त्यांच्या मदतीला येते. व्हॅनमधले ते दोघे यांना त्रास देण्यास सुरुवात करतात. पण हा शारीरिक छळ नव्हे. एका वेगळ्याच स्तराचा, मरणयातनांपेक्षाही भयंकर असा मानसिक छळ. या परिस्थितीत हे दोघे सापडले असताना केरळात दुसऱ्या एका ठिकाणी देवीचा उरुस चालू आहे. तिथे शेकडो पुरुष स्वत:ला यातना देत, पाठीत हूक अडकवून लटकत त्या जल्लोषात आनंदाने सामील झाले आहेत. एकीकडे देवीची पूजा करायची आणि दुसरीकडे स्त्रीची विटंबना, या पाशवी मनोवृत्तीचं या चित्रपटात दर्शन घडतं. चित्रपट पाहताना ‘डय़ुएल’ची हटकून आठवण होते, पण हे प्रकरण त्यापेक्षाही भयानक आहे.

लघुपटांविषयी..

‘रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्स’ या शीर्षकांतर्गत मामिमध्ये दाखविण्यात आलेले लघुपट म्हणजे एक मेजवानीच होती. यातील काही लघुपटांवर तर सुप्रसिद्ध दिग्दर्शकांच्या नावाची मोहोर उमटल्यामुळे त्याबद्दल अधिकच उत्सुकता होती. ‘मसान’फेम नीरज घायवान यांचा ‘ज्यूस’ हा लघुपट स्त्री-पुरुष विषमतेवर एका छोटय़ाशा प्रसंगातून नेमकं भाष्य करतो. मंजू आणि तिच्या नवऱ्याने एक फॅमिली गेट-टुगेदर ठेवलं आहे. पुरुषमंडळी बाहेर कूलरसमोर बसून राजकारणावर आणि इतर विषयांवर शिळोप्याच्या गप्पा मारीत असताना स्त्रिया मात्र किचनमधल्या उकाडय़ात पंख्याशिवाय राबत जेवण बनविण्यात मग्न आहेत. मंजूच्या संतापाचा एका क्षणी उद्रेक होतो, ती फ्रीजमधून ज्यूसची बाटली काढते आणि बाहेर पुरुषांमध्ये कूलरसमोर येऊन बसते. मंजूची आणि तिच्या नवऱ्याची नजरानजर होते. तिची नजर त्याला बरंच काही सांगून जाते आणि लघुपट संपतो.

सोमनाथ पाल दिग्दर्शित ‘डेथ ऑफ अ फादर’ हा अ‍ॅनिमेटेड लघुपट बापाशी काहीही भावनिक संवाद नसलेल्या मुलाची कथा सांगतो. बापाचा मृत्यू झाल्यावर करायचे विधी तो शांतपणे पार पाडतो आहे. त्यात त्याचं मन कुठेच नाही. चैतन्य ताम्हाणे हे या लघुपटाचे क्रिएटिव्ह डायरेक्टर आहेत. बापमुलाच्या नात्यावरचा शिशिर कुमार साहू यांचा ‘फरचा’ हा लघुपट या नात्याच्या आणखी एका पैलूवर प्रकाश टाकतो. पत्नीच्या निधनानंतर एकाकी झालेल्या वृद्ध गृहस्थाची व्यथा हा लघुपट मांडतो.

विवाहबाहय़ संबंधांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणारे चक्क तीन लघुपट या विभागात होते. मानसी जैनच्या ‘छुरी’ या लघुपटात नवऱ्याच्या अफेअरबद्दल कळल्यानंतर तडक त्याच्या प्रेयसीकडे जाऊन ती कोणतेही दोन दिवस तिला निवडायला सांगते, ज्या दिवशी नवरा तिच्याकडे राहील. नर्मविनोदी शैलीतील या लघुपटात तिस्का चोप्रा, अनुराग कश्यप आणि सुरवीन चावला यांच्या सुंदर अभिनयाने रंगात आणली आहे. याच विषयावरच्या सुमित कुमार दिग्दर्शित ‘मीरा’ या लघुपटात मीरेप्रमाणे अविरत प्रेम करणाऱ्या पत्नीचं दर्शन होतं. तर अहमद रॉय दिग्दर्शित ‘द थॉट ऑफ यू’ या लघुपटात थंड रक्ताने नवऱ्यावरच्या संशयातून त्याचा खून करणारी पत्नी दिसते. कल्की, गुलशन देवैया, मोनिका डोग्रा या लघुपटात मुख्य भूमिकेत आहेत.

बापमुलाच्या नात्याप्रमाणेच मायलेकीचं वेगळं नातं उलगडून दाखवणारे दोन सुंदर लघुपट या विभागात होते. मानवी बेदी दिग्दर्शित ‘काउंटिंग स्टार्स’ या लघुपटात आपल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या आईच्या प्रेमासाठी भुकेली लहानगी आपल्याला भेटते. तर विनोद रावत दिग्दर्शित ‘मॅड’ अर्थात ‘मदर अ‍ॅण्ड डॉटर’ या लघुपटात ‘आई होते मुलगी माझी, मी आईची होते आई’ या भूमिकेतून एकमेकींच्या चुका सांभाळून एकमेकींना आधार देणाऱ्या एकाकी मायलेकींचं मैत्रीची व्याख्या बदलून टाकणारं हृद्य चित्रण दिसतं.

गौतम वझे दिग्दर्शित ‘आईशप्पथ’ या लघुपटात लहान मुलांचं भावविश्व कसं आकार घेतं, याची सुंदर कथा आहे तर स्नेहा निहलानी दिग्दर्शित ‘किडा’ या लघुपटात काही टारगट तरुणांनी केलेल्या मस्करीत किती जणांचे हकनाक बळी जातात, याचं चक्रावून टाकणारं चित्रण आहे. पुष्पक जैन दिग्दर्शित ‘अलक्ष’ हा लघुपट बॉम्बस्फोटानंतरच्या संशयित वातावरणात हकनाक बळी गेलेल्या एका तरुणाची मर्डर केस पुन्हा ओपन करणाऱ्या एका छायाचित्रकाराची कथा सांगतो. दुष्कृत्यं कधीही लपून राहत नाहीत, असा संदेश नेमक्या शब्दांत हा लघुपट देतो.

मराठीच्या पाठय़पुस्तकात एका वर्षी आम्हांला ‘राधिका’ या यंत्रमानवाची कथा अभ्यासाला होती. त्याची आठवण करून देणारा सुजॉय घोष दिग्दर्शित ‘अनुकूल’ हा लघुपट. सत्यजित रे यांच्या १९७६ साली लिहिलेल्या लघुकथेवर आधारित हा लघुपट भविष्यात यंत्रमानवाची जागा घेऊ  शकतात, या विदारक सत्याचं सूचन करतो. ‘अनुकूल’ नावाचा रोबोट आपला मालक निकुंज चतुर्वेदी याच्या हितासाठी भगवद्गीतेच्या आधाराने कसा चातुर्याने निर्णय घेतो, हे पाहण्यासारखं आहे. हा लघुपट यूटय़ूबवर उपलब्ध आहे.