जुनी नाटके आणि साहित्य व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या ध्वनिमुद्रणाचा अमूल्य खजिना मुंबई मराठी साहित्य संघाने जपला आहे. साहित्य संघात सुमारे १९४० पासून सादर झालेली विविध नाटके आणि विविध साहित्य व सांस्कृतिक कार्यक्रमांचा या खजिन्यात समावेश आहे. अभ्यासक आणि रसिकांसाठी हा अनमोल सांस्कृतिक ठेवा ठरला आहे.

ज्येष्ठ गायक-अभिनेते आणि ‘ललितकलादर्श’ या नाटय़संस्थेचे भालचंद्र पेंढारकर यांनी ‘मुंबई मराठी साहित्य संघात’ सादर झालेली विविध नाटके आणि अनेक साहित्य व सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत मैफली या कार्यक्रमांचे त्या काळात ‘स्पूल टेप’वर ध्वनिमुद्रण करून ठेवले होते. त्यांनी केलेल्या या ध्वनिमुद्रणामुळे जुनी नाटके व कार्यक्रमांचा हा ऐतिहासिक ठेवा आज उपलब्ध झाला आहे. साहित्य संघाकडे नाटके व कार्यक्रम यांच्या २०० हून अधिक ध्वनिफिती आहेत. स्पूल टेपवर केलेले हे ध्वनिमुद्रण साहित्य संघाने ‘सीडी’मध्ये रूपांतरित केले असल्याची माहिती मुंबई मराठी साहित्य संघाच्या नाटय़शाखेचे कार्यवाह सुभाष भागवत यांनी ‘रविवार वृत्तान्त’ला दिली.

स्पूल टेपवरून ‘सीडी’मध्ये रूपांतर करताना साहित्य संघाने याच्या तीन प्रती तयार केल्या असून त्याची प्रत्येकी एकेक प्रत भालचंद्र पेंढारकर यांच्या कुटुंबीयांकडे आणि राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालन विभागाकडे देण्यात आली आहे. मुंबई मराठी साहित्य संघाकडेही त्याची एक प्रत सुरक्षित ठेवण्यात आली असल्याचे सांगून भागवत म्हणाले, ललितकलादर्श, नाटय़संपदा, धी गोवा हिंदूू असोसिएशन, पूर्णिमा थिएटर्स, नाटय़मंदार, अविष्कार, चंद्रलेखा, कलावैभव आदी नाटय़संस्थांनी सादर केलेल्या काही नाटकांच्या प्रयोगांचे ध्वनिमुद्रण या ध्वनिफितीत आहे.

दूरदर्शनच्या मुंबई केंद्रावरील ज्येष्ठ निर्मात्या सुहासिनी मुळगावकर यांनी ‘संगीत स्वयंवर’ या नाटकाचा काही भाग एकपात्री स्वरूपात सादर केला होता. साहित्य संघात झालेल्या त्याच्या प्रयोगाचे दुर्मीळ असे ध्वनिमुद्रण या ठेव्यात आहे. ‘अविष्कार’ नाटय़संस्थेने सादर केलेले ‘शांतता कोर्ट चालू आहे’, ‘नाटय़मंदार’ संस्थेचे ‘घनश्याम नयनी आला’, ‘नाटय़संपदा’चे ‘महाराणी पद्मिनी’, ‘चंद्रलेखा’चे ‘गुड बाय डॉक्टर’, ‘कलावैभव’ संस्थेचे ‘महासागर’, ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’चे ‘लेकुरे उदंड झाली’, मुंबई मराठी साहित्य संघाचे ‘वाजे पाऊल आपुले’ तसेच ‘नटसम्राट’, ‘अश्रूंची झाली फुले’, ‘पती गेले गं काठेवाडी’, ‘पळा पळा कोण पुढे पळे तो’ ही नाटके आहेत. दादा कोंडके यांचे ‘विच्छा माझी पुरी करा’ आणि शाहीर साबळे यांचे ‘असूनी मालक खास घरचा’ या लोकनाटय़ांचे ध्वनिमुद्रणही संग्रहात आहे.

याबरोबरच नटवर्य केशवराव दाते यांच्या अमृतमहोत्सवी वर्षांचा सांगता समारंभ, आचार्य अत्रे यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने झालेला कार्यक्रम, मामा पेंडसे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार सोहळा, कुमार गंधर्व यांचे ‘मला उमजलेले बालगंधर्व’ या विषयावर केलेले भाषण, ‘अमर भूपाळी’ या चित्रपटाची ध्वनिफीत, अब्दुल जफार खान यांचे सतारवादन या आणि अन्य काही कार्यक्रमांचे ध्वनिमुद्रणही साहित्य संघाच्या संग्रहात असल्याचे भागवत यांनी सांगितले. हा दुर्मीळ सांस्कृतिक ठेवा अभ्यासक, संशोधक, संगीत व नाटय़प्रेमी रसिक यांना ऐकण्यासाठी साहित्य संघात उपलब्ध आहे. साहित्य संघाच्या कार्यालयात जाऊन आणि तेथेच बसून या ध्वनिफिती ऐकता येऊ शकतील.  साहित्य संघाच्या कार्यालयात सायंकाळी ५ ते ८ या वेळेत ०२२-२३८५६३०३ (विस्तारित क्रमांक २२, २३ किंवा २४) या क्रमांकावर संपर्क साधल्यास याबाबत अधिक माहिती मिळू शकेल.