वानखेडे स्टेडियमवर २०१२ मध्ये झालेल्या आयपीएल सामन्यांच्या वेळेस लहान मुलांच्या देखत शिवीगाळ केल्याप्रकरणी अभिनेता शाहरूख खान याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाने पोलिसांना दिले आहेत.
१६ मे २०१२ मध्ये झालेल्या या सामन्यादरम्यान शाहरूखची वानखेडेवर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांशी बाचाबाची झाली होती. त्या वेळी लहान मुलांदेखत शिवीगाळ केल्याची तक्रार आयोगाकडे दाखल करण्यात आली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने आयोगाचे सचिव ए. एन. त्रिपाठी यांनी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, असे अ‍ॅड. आभा सिंग यांनी सांगितले. तसेच, या प्रकरणात गुन्हा का दाखल करण्यात आला नाही, याचीही चौकशी करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. भारतीय दंड सहिता आणि बाल न्याय (संगोपन आणि संरक्षण) कायद्यातील २३ कलमाअंतर्गत शाहरूखवर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी पुस्ती त्यांनी जोडली.