सध्या सोशल मीडियावर पोलीसांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये करोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात ‘ऑन ड्युटी’ असणाऱ्या पोलिसांनी २१ दिवसात काय केले असते हे दाखवण्यात आले आहे. तसेच त्यांनी यासंदर्भातील आपल्या इच्छा व्यक्त केल्या आहेत. हा व्हिडीओ अनेक कलाकारांनी शेअर केला आहे. पण सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे आयुषमान खुरानाने. त्याने हा व्हिडीओ शेअर करत मराठीमध्ये ट्विट केले आहे.

‘तुम्हाला धन्यवाद देण्यासाठी मी नि:शब्द झालो आहे, परंतु मी आज तुम्हाला हृदयापासून धन्यवाद देत आहे. जय हिंद!’ असे ट्विट करत आयुषमानने पोलिसांचे आभार मानले आहेत. त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. तसेच मुंबई पोलिसांनी त्याच्या या ट्विटला लगेच फिल्मी अंदाजमध्ये उत्तर दिले आहे.

मुंबई पोलिसांनी आयुषमानला त्याच्याच स्टाइलमध्ये उत्तर दिले आहे. “धन्यवाद, ‘विकी’! आम्ही मुंबईकरांना ‘ज़्यादा सावधान’ ठेवण्यासाठी सर्व काही करू” असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

मुंबई पोलिसांच्या या व्हिडिओमध्ये काही महिला पोलीसांबरोबर पोलीस अधिकारीही ‘मी २१ दिवस घरी असतो तर काय केले असते?’ या प्रश्नाला उत्तर देताना दिसत आहेत. ‘आम्ही घरातून बाहेरच येणार नाही’ असे एका मास्क लावलेल्या महिला पोलीस हवालदारने सांगितले आहे. तर दुसऱ्या एका महिला पोलिसाने “जर मी घरी असते तर मी घरच्यांसोबत म्हणजेच माझी आईबरोबर, बहिणींबरोबर वेळ घालवला असता. पुस्तके वाचली असती. चित्रपट पाहिले असते,” असे म्हटले आहे.

व्हिडिओच्या शेवटी पोलिसांनी एक आवाहन केले आहे. “खूप साध्या इच्छा आहेत ना यांच्या. मात्र मुंबई सारख्या स्वप्न नगरीची कोणतीही स्वप्न अपूर्ण राहू नयेत म्हणून त्यांना या इच्छा पूर्ण करता येत नाही. तुम्हाला तुमची स्वप्न पुर्ण करता यावी म्हणून ते बाहेर आहेत. त्यामुळेच त्यांची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही मदत करणार नाही का? त्यांची सर्वात मोठी इच्छा हीच आहे की मुंबई आणि मुंबईकरांनी करोना आणि त्यासारख्या इतर सर्व धोक्यांपासून सुरक्षित रहावे. कराल ना त्यांना मदत?” असा सवाल पोलिसांनी मुंबईकरांना विचारला आहे.