बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयला विनाहेल्मेट आणि विनामास्क बाईक चालवणं महागात पडलंय. १४ फेब्रुवारी रोजी ‘व्हॅलेंटाइन डे’ला विवेक ओबेरॉयने बाईकवरुन पत्नीसोबत सैर केली होती. नंतर त्याने तो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला, त्यात विवेकने हेल्मेट घातले नव्हते, शिवाय चेहऱ्यावर मास्कही लावला नव्हता. याची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे.

विवेकने ‘व्हॅलेंटाइन डे’ला पत्नीसोबत बाईक राईडचा एक व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला होता. त्यासोबत त्याने “मी, माझी बायको आणि ती… रिफ्रेश करणारी जॉयराईड, ‘व्हॅलेंटाइन डेची काय मस्त सुरुवात झालीये”, असं कॅप्शन दिलं होतं. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला, नंतर सामाजिक कार्यकर्त्या डॉ. बिनू वर्गीस यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करत काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना टॅग करुन “विवेकने विनाहेल्मेट बाईक चालवून वाहतूक सुरक्षा नियम मोडला आहे, तसेच त्याने चेहऱ्यावर मास्क देखील घातलेले नाही…याद्वारे युवा पिढीसमोर चुकीचा संदेश जातो, त्यामुळे त्याला दंड आकारावा” असं लिहिलं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vivek Oberoi (@vivekoberoi)


वर्गीस यांच्या या ट्विटची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेतली. त्यानंतर विवेकवर गुन्हा दाखल करण्यात आला व शुक्रवारी संध्याकाळी विवेकला 500 रुपयांचे ई-चलान मोबाईलवर पाठवण्यात आलं आहे. तसेच जुहू पोलिस स्थानकात विवेक विरोधात आयपीसी कलम १८८ आणि २६९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.