एका चाहतीसोबत सेल्फी काढणे अभिनेता वरुण धवनला चांगलेच महागात पडले. रस्त्यात कारच्या खिडकीतून डोके बाहेर काढून सेल्फी काढल्याने मुंबई पोलिसांनी गुरुवारी त्याला दंड ठोठावला. त्यानंतर वरुणने ट्विटरवर पोलिसांची माफीही मागितली. त्याच्या माफीवर आता मुंबई पोलिसांनी ट्विटरच्याच माध्यमातून उत्तर दिले आहे.

मुंबईत ट्रॅफिकमध्ये अडकला असताना अभिनेता वरुण धवनने गाडीतून शेजारच्या रिक्षातील चाहतीसोबत सेल्फी काढला. सुरक्षेच्या दृष्टीने अशाप्रकारे सेल्फी काढणे चुकीचे असल्याचे सांगत पोलिसांनी त्याला गुरुवारी ई-चलनही पाठवले होते. वरुणने माफी मागितल्यानंतर ट्विटरवर पोलिसांनी त्याला उत्तर दिले की, ‘तू एक सेलिब्रिटी आहेस आणि अशा पद्धतीने कारच्या खिडकीतून डोके बाहेर काढल्याने इतरांचे लक्ष विचलित होऊ शकते. सिग्नलवर तुझा फोटो काढणाऱ्या त्या फोटोग्राफरचाही योगायोगच म्हणावा लागेल. फोटोग्राफरचा उद्देश जरी चांगला असला तरी यात धोका होता. आमच्या उत्तराला तू चांगल्या भावनेने घेतलंस याचा आनंद आहे.’

वाचा : ‘…तर अली असगरला माझ्या शोमधून काढलं असतं’

‘मी जे केलं त्याची मी माफी मागतो. आम्ही सिग्नल लागला होता म्हणून थांबलो होतो. आम्हा दोघांचेही वाहन एका जागी उभे होते. मला चाहत्यांच्या भावना दुखवायच्या नव्हत्या. पण यापुढे मी सुरक्षेबाबत अधिक सतर्क राहीन आणि अशी वागणूक पुन्हा होणार नाही याची खबरदारी घेईन,’ अशा शब्दांत वरुणने माफी मागितली होती.