मुंबई पोलीस मागच्या काही काळापासून त्यांच्या सोशल मीडियाद्वारे करण्यात येणाऱ्या कँपेनसाठी भलतेच प्रसिद्ध झाले आहेत. तरुणांमध्ये सर्वाधिक प्रसिद्ध असलेल्या मुंबई पोलिसांच्या ट्विटर अकांऊटवर नेहमीच काहीतरी भन्नाट पाहायला मिळतं. नागरिकांमध्ये वाहतूक विषयक जागरुकता निर्माण व्हावी यासाठी एखादी गोष्ट हटके पद्धतीनं लोकांना समजावून सांगण्याचं गणित त्यांना नेमकं जमलंय असं म्हणायला हरकत नाही. तर यावेळीही सुरक्षेचं महत्त्व पटवून देण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक खास पद्धत वापरली आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘धडक’ या चित्रपटाच्या ट्रेलरमधील एका संवादावरुन मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. पोलिसांनी एक मीम बनवले आहे, जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ट्रेलरमध्ये दाखविण्यात आलेल्या एका दृश्यात जान्हवी कपूर ईशान खट्टरला म्हणते, ”क्या नाटक कर रहा है…मुझे देख क्यो नही रहा” हाच संवाद आणि त्या दोघांचा फोटो वापरुन हे मीम तयार करण्यात आले आहे. यामध्ये या दोघांच्या फोटोच्या मध्ये सिग्नल दाखविण्यात आला आहे आणि त्याखाली ”क्या नाटक कर रहा है…मुझे देख क्यो नही रहा” हा संवाद लिहीण्यात आला आहे.

यामध्ये ट्रॅफिक सिग्नललाही भावना असतात असे लिहीण्यात आले आहे. तसेच ट्रॅफीक सिग्नल मॅटर्स असा हॅशटॅग देण्यात आला आहे. जान्हवी आणि ईशान या दोघांनीही मुंबई पोलिसांचे हे मीम आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहे. अनेकांनी हे मीम लाईक आणि शेअर केले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी धडक या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. धडक हा चित्रपट सैराट या मराठी चित्रपटाचा रिमेक असून ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच तो बराच चर्चेत आहे.