अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर कलाविश्वात एकच खळबळ उडाली आहे. बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून सुशांतने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. यात अभिनेत्री कंगना रणौतने कलाविश्वातील अनेकांवर घराणेशाहीचा आरोप केला आहे. या प्रकरणी बॉलिवूडमधील दिग्गजांचे चौकशी मुंबई पोलिसांनी केली असून आता कंगनाचीदेखील पोलीस चौकशी होणार असल्याचं ‘इंडिया टुडे’च्या वृत्तात म्हटलं आहे.

सुशांतने १४ जून रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यामध्येच अभिनेत्री कंगना रणौतने सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्याच झाली आहे, असं म्हटलं होतं. तिच्या या वक्तव्यानंतर अनेकांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. सुशांतच्या मृत्युनंतर कलाविश्वातील जवळपास २० ते २५ जणांची चौकशी करण्यात आली असून आता कंगनाचीदेखील चौकशी होणार आहे.

बांद्रा पोलिसांनी जून महिन्यामध्ये कंगनाला चौकशीची नोटीस बजावली होती. परंतु, सध्या कंगना मुंबईत नसल्यामुळे ही नोटीस तिच्या घरी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकडे देण्यात आली होती. तसंच कंगना परत मुंबईत आल्यानंतर तिची चौकशी करण्यात येणार आहे.

दरम्यान, सुशांतच्या मृत्युनंतर कंगनाने या घटनेची सीबीआय चौकशी व्हावी अशीदेखील मागणी केली आहे. तसंच कलाविश्वात घराणेशाही, दुजाभाव करणं, स्टारकिडला प्राधान्य देणं अशा अनेक गोष्टी चालत असल्याचे आरोप कंगनाने केले आहेत. या प्रकरणी आतापर्यंत ३८ जणांची चौकशी करण्यात आली असून त्यात संजय लीला भन्साळी आणि आदित्य चोप्रा या दिग्गज दिग्दर्शकांचीही चौकशी करण्यात आलेली आहे.