19 October 2019

News Flash

आता येतोय.. ‘मुंबई पुणे मुंबई-३’

दोन वर्षांपूर्वी जेव्हा चित्रपटाचा सिक्वल प्रदर्शित झाला तेव्हाही या यशाची पुनरावृत्ती झाली.

(संग्रहित छायाचित्र)

पाच वर्षांपूर्वी ‘मुंबई पुणे मुंबई’ला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर दोन वर्षांपूर्वी आलेल्या याच चित्रपटाच्या दुसऱ्या भागातील गौतम आणि गौरी जोडीची लग्नकथाही लोकांना भावली. आता या चित्रपटाचा तिसरा भाग म्हणजेच गौतम आणि गौरी यांच्या आयुष्याचा पुढील अंकही प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे. सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘मुंबई पुणे मुंबई- ३’ हा चित्रपट या वर्षी ७ डिसेंबरला प्रदर्शित होणार असून नुकताच त्याचा टीजर प्रदर्शित करण्यात आला आहे.

‘मुंबई पुणे मुंबई’ पाच वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला आणि त्याने इतिहास रचला. लोकप्रियता, चित्रपटगृह खिडकीवर केलेला व्यवसाय आणि या जोडीच्या घराघरात पोहोचण्याची प्रक्रिया या सर्वच बाबतीत या चित्रपटाने उत्तुंग परिमाणे स्थापित केली. चित्रपट राष्ट्रीय  आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुपर-डुपर हिट ठरला होता. दोन वर्षांपूर्वी जेव्हा चित्रपटाचा सिक्वल प्रदर्शित झाला तेव्हाही या यशाची पुनरावृत्ती झाली. आता हाच इतिहास पुन्हा गिरवला जाणार आहे. दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणतात, ‘मुंबई पुणे मुंबई’ला एवढे यश मिळेल असे आम्हाला सुरुवातीला वाटलेच नव्हते. ‘मुंबई पुणे मुंबई’ हा आता एक वेगळा कल झाला असून प्रेमकथेचा एक वेगळा बाज त्यातून गिरवला गेला आहे. प्रेक्षकांना या चित्रपटाची आता सवय लागली आहे. आता प्रेक्षकांनाही गौतम आणि गौरी यांच्या आयुष्यात काय घडणार आहे, त्याची उत्सुकता आहे. या जोडप्याच्या आयुष्यात ज्या गोष्टी घडतात त्यांचा संबंध लोक आपल्या आयुष्याशी जोडू लागले आहेत. ‘मुंबई पुणे मुंबई’चे चित्रीकरण करत असताना आम्हाला या चित्रपटाचा पुढचा भाग येईल असे वाटले नव्हते. पण दुसऱ्या भागाचे चित्रीकरण करत असताना या चित्रपटाच्या पुढच्या भागालाही वाव आहे, हे मात्र स्पष्टपणे जाणवले होते. येणाऱ्या चित्रपटाच्या कथेबद्दल अधिक काही बोलणे उचित होणार नाही, पण मी एक गोष्ट नक्की सांगू शकतो की, हा तिसरा भागही तेवढाच यशस्वी ठरणार आहे.

‘मुंबई पुणे मुंबई’ या चित्रपटाला मोठे यश मिळाले आणि त्याची अनेक भारतीय भाषांमध्ये पुन:निर्मिती झाली. या चित्रपटाची वाहवा संपूर्ण जगातील सिनेरसिकांकडून झाली. आता तिसऱ्या सिक्वलचे दिग्दर्शनही राजवाडे यांनीच केले आहे. तर स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे ही जोडी पुन्हा एकदा आपल्या हिट अवतारात रुपेरी पडद्यावर परतली आहे.

First Published on October 21, 2018 1:34 am

Web Title: mumbai pune mumbai 3 teaser revealed